केंद्राच्या अँप आणि सर्व्हरमुळे लसीकरण मोहीम अडचणीत
आम्ही पूर्णपणे केंद्रावर विसंबून आहोत – आरोग्यमंत्री
अतुल कुलकर्णी
मुंबई : लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ऍप नीट चालत नाही. ही बाब सतत निदर्शनास आणूनही त्यात म्हणावा तसा फरक पडत नाही. त्यासाठीचे सर्व्हर देखील अनेक ठिकाणी वेगाने चालत नाही. १८ ठिकाणी तर हे सर्व्हर बंदच पडले. त्यामुळे राज्यात लसीकरणाच्या मोहिम अडचणीत आली आहे. जाने लस घेतली त्या व्यक्तीला देखील ‘लस घ्यायला या’ असे निमंत्रण जात आहे. ज्यांना लस अद्याप मिळाली नाही त्यांना मेसेजच जात नाहीत, असे प्रकारही सातत्याने घडत आहेत.
महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी प्रतिव्यक्ती दोन डोस यानुसार १७ लाख लसींची गरज होती. मात्र केंद्र सरकारकडून प्रत्यक्षात साडेनऊ लाख लसीचे डोस मिळाले. केंद्र सरकारने महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांची संख्या देखील कमी केली. केंद्र शासनाने महाराष्ट्रातील लसीकरण केंद्रांची संख्या ५११ वरून ३५८ केली आणि त्यातही फक्त २८५ केंद्र सुरू करण्यासाठी मान्यता दिली. त्यातील १८ केंद्रे सर्व्हरमुळे सुरूच झालेली नाहीत. पहिल्या दिवशी १८,५७२ जणांना लस देण्यात आली तर मंगळवारी सकाळी 7 वाजेपर्यत 18,166 जणांना लस दिली गेली. आपल्यापेक्षा मोठे राज्य असणाऱ्या उत्तर प्रदेशात, लसीकरण केंद्रांची संख्या जास्त असूनही लस घेणाऱ्यांचे प्रमाण महाराष्ट्र पेक्षा कमी आहे.
याबद्दल सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना विचारले असता ते म्हणाले, आम्ही लसीकरणासाठी यादी केंद्र सरकारला कळवली होती. त्यातल्या अनेकांना परत परत मेसेज येत आहेत. ही बाब आमच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग मध्ये केंद्रीय आरोग्य मंत्री केंद्रीय, आरोग्य सचिव आणि संबंधितांना सातत्याने निदर्शनास आणून दिली आहे. डबल मेसेज जात आहेत. नावे डबल येत आहेत. केंद्राचे सर्व्हर अतिशय स्लो झाले आहे. त्यामुळे लसीकरण मोहिमेला आम्ही जे टार्गेट ठरवले आहे ते पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. रोज किमान २५ हजार आरोग्य दूतांना लस मिळावी असे ठरवण्यात आले असले तरी तेवढे प्रमाण अद्याप गाठता आलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे असेही टोपे म्हणाले.
अन्य देशांमध्ये त्या-त्या देशांच्या प्रमुखांनी तसेच महत्त्वाच्या नेत्यांनी स्वतः लस घेतली. जनतेपुढे आदर्श ठेवला. लोकांच्या मनातली भीती घालवली. आपल्याकडे मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री लस का घेत नाहीत? असा थेट सवाल विचारला असता आरोग्यमंत्री टोपे म्हणाले, आम्हाला केंद्र सरकारने यादी दिली आहे. लस मिळाली तर आत्ता या क्षणी घ्यायला आम्ही तयार आहोत. मात्र आधी आरोग्य दूतांना लस द्यायची अशा सूचना आहेत. आमची नावे त्यात नाहीत. ज्यांची नावे केंद्राच्या यादीत आहेत आणि ज्यांना मेसेज येतात त्यांना लस द्यावी असे आदेश आहेत. केंद्र सरकारमधील मंत्र्यांनी, नेत्यांनी जरी लस घेतली नाही पण आम्हाला घ्यायला सांगितली, तर लस घेणारा पहिला मंत्री मी असेल, पण आमच्या मर्यादा आहेत, असे टोपे यावेळी म्हणाले.
सिरम इन्स्टिट्यूटचे प्रमुख अदर पूनावाला यांनी स्वतः लस घेतली, तसे त्यांनी ट्विट केले, त्याचे काय? असे विचारले असता आरोग्यमंत्री म्हणाले, त्यांच्या संस्थेने लस बनवली आहे. ती सुरक्षित आहे की नाही असे प्रश्न उपस्थित होऊ लागल्यामुळे त्यांनी स्वतः घेतली व आमची लस सुरक्षित आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला असावा, असेही टोपे म्हणाले. मी स्वतः लस सुरक्षित आहे. ती घेण्याने कोणतेही आपाय होणार नाहीत, असा व्हिडिओ तयार करून सगळीकडे पाठवत आहे. त्यात मंत्री म्हणून मी लस का घेत नाही हे देखील सांगणार आहे, असेही टोपे यांनी स्पष्ट केले. (Date 21 Jan 2021)
Comments