मंगळवार, २४ डिसेंबर २०२४
24 December 2024

गुजरातची लोकसंख्या ६ कोटी, लसीचे डोस मिळणार १५ लाख
महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी, लसीचे डोस मिळणार १७ लाख

अतुल कुलकर्णी / लोकमत
मुंबई : ज्या महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी त्या राज्याला कोरोना लसीचे १७,४३,२८० डोस तर ज्या गुजरातची लोकसंख्या ६ कोटी आहे त्या राज्याला मात्र १५,५७,८७० डोस येत्या पाच दिवसात मिळणार आहेत. केद्र सरकारचा लगस वाटपातील पक्षपात केवळ महाराष्ट्रापुरता नाही तर ज्या ज्या ठिकाणी भाजपची सत्ता आहे त्या ठिकाणी जास्त तर अन्य ठिकाणी कमी लस दिली जात आहे. त्याची आकडेवारीच समोर आली आहे.

येत्या १५ ते २० एप्रिल या पाच दिवसासाठी कोणत्या राज्याला किती लस द्यायची याचे वाटप केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. त्याची यादी हाती आली आहे. भाजपची सत्ता ज्या राज्यात आहे तेथे रुग्ण संख्या किती आहे, लोकसंख्या किती आहे याचा कोणताही आढावा न घेता त्या राज्यात मोठया प्रमाणात लस दिली गेली तर ज्या राज्यात भाजप विरोधी पक्षांची सत्ता आहे त्या राज्यांची लोकसंख्या आणि तेथे दिलेले डोस पाहिले तर केद्राने लस वाटपात केलेला पक्षपात स्पष्टपणे समोर येत आहे. (सोबत भाजप व भाजपेतर पाच राज्यांची आकडेवारी दिली आहे.)

 

लोकमतशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, लसीवरुन राजकारण करणाऱ्या भाजपचे राज्यातील नेते दुर्देवाने महाराष्ट्र विरोधी भूमिका घेत राज्याचीच बदनामी करत आहेत. कोणत्या राज्यात किती लस वाया गेली हे पाहिले तर भाजप प्रणीत राज्यांमध्ये लस वाया जाण्याचे प्रमाण महाराष्ट्रापेक्षा कितीतरी अधीक आहे. गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दुप्पट लस वाया गेली पण बदनामी महाराष्ट्राची केली जात आहे. माणसं मरत असताना सत्तेसाठी हापापलेल्या भाजपला राजकारण महत्वाचे आहे, अशी ही टीका त्यांनी केली.

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भाजप नेत्यांना महाराष्ट्राचा अवमान करण्याचा रोग जडला असून, या रोगाला त्यांनी स्वतःहून नियंत्रणात न आणल्यास महाराष्ट्रातील जनताच त्यांचा इलाज करेल, अशी संतप्त प्रतिक्रिया सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी व्यक्त केली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांचे विधान महाराष्ट्रासाठी धक्कादायक, मानहानीकारक आणि मराठी माणसाच्या स्वाभिमानाला धक्का लावणारे आहे. त्यांची भाषा राजशिष्टाचाराला न शोभणारी आणि वस्तुस्थितीचा विपर्यास करणारी आहे, असेही अशोक चव्हाण म्हणाले.

राज्यात रोज सहा लाख लोकांना लसीकरण करण्याची तयारी आहे, मात्र केंद्र सरकारकडून लसीकरणाचा पुरवठा अद्याप झालेला नाही. तीन दिवस पुरेल एवढाच साठा सध्या शिल्लक आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांच्याशी आपले बोलणे झाले. ते लस देण्याबद्दल सकारात्मक आहेत, हे सांगायलाही टोपे विसरले नाहीत. राज्यात फक्त १४ लाख लसीचे डोस शिल्लक आहेत. हा साठा फक्त तीन दिवस पुरेल. दर आठवड्याला आम्हाला ४० लाख लसींची गरज आहे. तेवढी मागणी आम्ही केंद्राकडे केली आहे. आम्ही आज चार ते साडेचार लाख रुग्णांना डोस देत आहोत. ही क्षमता सहा लाखापर्यंत नेण्याची व्यवस्था आपण केल्याचे टोपे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्रात लस उपलब्ध नाही म्हणून अनेक केंद्र बंद ठेवावी लागली आहेत.

आज जाणीवपूर्वक केंद्र बंद करून लसीबद्दल चुकीच्या बातम्या पसरवण्याचे कारण काय? आज ज्या राज्यांना कोटा दिला आहे, तितक्या लस्सी पुरवठ्याच्या मार्गावर आहेत. तो पुरवठा ९ ते १२ एप्रिल या काळात होईल. यात महाराष्ट्राला पुन्हा अधिक १९ लाख लसी मिळतील, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांचे म्हणणे आहे. महाराष्ट्र, गुजरात आणि राजस्थान या तीन राज्यांना एक कोटीपेक्षा अधिक लसी प्राप्त झाल्या आहेत. लसींचा पुरवठा लोकसंख्येच्या आधारावर नाही, तर त्या-त्या राज्यांच्या लसीकरण कामगिरीच्या आधारावर होतो आहे,असेही फडणवीस म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *