भंडारा प्रकरणात सिव्हिल सर्जन, परिचालकांचे बळी
बड्या अधिकाऱ्यांना मात्र बाजूला ठेवण्याचा घाट
अतुल कुलकर्णी
मुंबई : भंडारा येथे हॉस्पिटलला लागलेल्या आगीत १० नवजात बालकांचा मृत्यू झाल्याच्या घटनेला भंडाऱ्याचे सिव्हिल सर्जन, दोन परिचारिका आणि काही कर्मचारी यांच्यावर बडतर्फीची कारवाई अहवालात सुचवण्यात आली असली तरी बड्या अधिकाऱ्यांना मात्र बाजूला ठेवण्याचा घाट घातला जात आहे.
नागपूरचे विभागीय आयुक्त संजयकुमार यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या चोकशी समितीने अहवालात म्हटले आहे की, नवजात बालके ठेवण्यासाठीच्या इन्क्युबेटरची वार्षिक तपासणी एम.कॉम. पास कर्मचाऱ्याकडे देण्याचे दिव्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले. फेबर सिंदुरी या कंपनीला इन्क्युबेटर मेंटेनन्स चे काम देण्यात आले होते. मात्र त्या कंपनीने कोणत्या दर्जाचे कर्मचारी तेथे ठेवावेत याविषयी कसलाही करार आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला नव्हता. परिणामी इन्क्युबेटरच्या स्फोटामुळे दहा नवजात बालकांचा बळी गेला, अशी धक्कादायक माहिती तपासणी अहवालातून पुढे आली आहे.
हे करार करणारे, व सदोष इन्क्युबेटर खरेदी करणारे मात्र नामानिराळे ठेवण्याचे घाटले जात आहे. त्यामुळे अहवाल सादर होऊनही यावर कसलीही चर्चा झालेली नाही. अहवाल आला असला तरी त्यावर कोणतीही चर्चा झाली नाही उद्या यावर चर्चा होईल असे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे मात्र हाती आलेली माहिती धक्कादायक आहे.
या स्टँडवर इन्क्युबेटर ठेवले होते त्याच्या आतील मुलासह ठिकऱ्या झाल्या
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या इलेक्ट्रिक विभागाने, तसेच आग लागू नये म्हणून जे मेंटेनन्स व्हायला पाहिजे ते सार्वजनिक बांधकाम विभागाने कधीही केलेले नव्हते. त्यांचा एकही माणूस कधी अशी तपासणी करायला आला नाही. ज्या इन्क्युबेटर चा स्फोट झाला त्याच्या मेंटेनन्सचे काम पुण्याच्या फेबर सिंदुरी या कंपनीला कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने कोणत्या दर्जाचे कर्मचारी मेंटेनन्स साठी ठेवावेत, याचा कसलाही उल्लेख करारनाम्यात केलेला नाही. शिवाय जी व्यक्ती तेथे होती एम. कॉम. पास होती. आग लागल्यानंतर धूर झाला, मात्र स्मोक डिटेक्टर काम करत नव्हते. तेथे कामावर असणाऱ्या दोन परिचारिका दार बंद करून बाहेर बसल्या होत्या. आगीच्या भडक्याने तेथे लागलेल्या टाईल्स खाली कोसळल्या. इनक्यूबेटरचा स्फोट झाला. त्याच्या आवाजाने जेव्हा त्या परिचारिका आत गेल्या, तेव्हा दोन इनक्यूबेटरच्या आत असणाऱ्या मुलांसह ठिकर्या उडाल्या होत्या. नवजात बालके धुरामुळे गुदमरून मेल्याचे निदर्शनास आले. त्यांचे चेहरे धुरामुळे पूर्णपणे काळे पडले होते. बाकी सगळे शरीर स्वच्छ व्यवस्थित होते, असेही तपासणीत आढळल्याचे समजते.
ज्या खोलीत आग लागली त्याच्या बाजूला नुकतीच जन्मलेली सात मुले ठेवली होती. मात्र त्याचे दरवाजे उघडून त्या मुलांना वेळीच बाहेर काढल्यामुळे ती मुले वाचली. याठिकाणी कोणत्याही यंत्रसामुग्रीची दुरुस्तीतच झालेली नाही. त्यासाठी कोणाशी करार केले? दुरुस्ती करायला कोण येत होते? कशा पद्धतीने दुरूस्ती होत होती? याचे कसलेही रजिस्टर ठेवण्यात आलेले नव्हते. करारनाम्यात कुठले तपशील नव्हते. कॉन्ट्रॅक्टर कोणी नेमला? त्याला काम कोणी दिले? त्याच्यावर कोण देखरेख करत होते? याचा देखील तपशील तेथे उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
ही संपूर्ण चौकशी “इन कॅमेरा” करण्यात आली असून प्रत्येकांचे म्हणणे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र या संपूर्ण प्रकरणात मुंबई पर्यंतचे बडे अधिकारी नामानिराळे ठेवण्यात आल्याचेही समजते. आरोग्य विभागाच्या संचालिका डॉ. साधना तायडे यांची समिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नेमली होती. मात्र त्यावरच आक्षेप घेतल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. प्रत्यक्षात डॉक्टर तायडे यांनी काल नागपूरला विभागीय आयुक्तांना अहवाल सादर केला आहे. त्यामुळे या अहवालातून काहीही निष्पन्न होणार नाही. केवळ धूळफेक करून वरिष्ठ अधिकाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विद्युत विभागाने लागलेली आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नाही, असा प्राथमिक अहवाल दिला होता. त्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी वेगवेगळे फोटो आणि तांत्रिक माहिती देखील त्यांच्या अहवालात दिली होती.
इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित न झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि त्यामुळे बालके दगावली असा प्राथमिक अहवाल असताना, याविषयी चौकशी समितीने नेमके कोणते निष्कर्ष दिले आहेत हे सांगण्यास कोणीही तयार नाही. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी हा अहवाल वेळ पडल्यास मंत्रिमंडळ बैठकीत पुढे ठेवण्यात येईल, आणि आजच कारवाई जाहीर केली जाईल असे सांगितले होते. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. मंत्रिमंडळात या विषयावर कोणतीही चर्चा झाली नाही. डॉक्टर तायडे यांना विचारले असता त्या म्हणाल्या, मी अहवाल विभागीय आयुक्तांना दिला आहे. तेच याविषयी सांगू शकतील. याचा अर्थ ही चौकशी विभागीय आयुक्तांनी केली की आरोग्य संचालकांनी हा प्रश्न तसाच शिल्लक आहे. अहवालात आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचेही नमूद करण्यात आल्याचे समजते. (Date 21 January 2021)
Comments