बुधवार, २२ जानेवारी २०२५
22 January 2025

सरकार राज ठाकरेंच्या घरी का गेले?
यातून टोलमुक्ती की उद्धव मुक्ती..?

अधून मधून / अतुल कुलकर्णी

रामरावांना बाबुरावांचा नमस्कार.
टोलच्या विषयावर चर्चा करण्यासाठी सरकार दस्तूरखुद्द राज ठाकरे यांच्या घरी गेले. या बातमीने मनात अनेक प्रश्नांची गर्दी केली आहे. कोणताही प्रश्न सोडवायचा असेल तर सरकार असे प्रत्येकाच्या घरी जाते का? हा प्रश्न मला आमच्या शेजारच्या आदेश भाऊजींनी बांद्रात राहणाऱ्या उधो साहेबांना विचारला. अशीच विचारणा करणारा मेसेज, तिकडे बारामतीच्या काकांनी पुतण्याला केल्याचे सोशल मीडियावर फिरत आहे. काहीही असो पण सध्या महाराष्ट्रात चर्चेसाठी अनेक विषय असताना एकच विषय सर्वत्र चर्चेला आहे. तो म्हणजे टोलसाठीची मीटिंग घेण्यासाठी सरकार राज ठाकरेंच्या घरी का गेले..? अनेक राजकीय विश्लेषक, धुरंदर राजकारणी या घटनेची त्यांच्या त्यांच्या परीने कारणमीमांसा करत राहतील.

ते काही असो. बरे झाले, राजनी सरकारलाच स्वतःच्या घरी बोलावले. ते स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटून आले होते. त्यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर झालेल्या चर्चेला अंतिम स्वरूप देण्याचे काम तर आपल्याच घरून व्हायला हवे असा विचार त्यांनी केला असेल तर त्यात त्यांच्या बाजूने चुकीचे काय..? कारण टोलचा प्रश्न त्यांनीच लावून धरला होता. त्यांच्यामुळे महाराष्ट्रातील अनेक टोल रद्द झाल्याचे होर्डिंग महाराष्ट्रभर आपण पाहिले होतेच. टोलचा विषय राज ठाकरे यांनी अर्धवट सोडून दिल्याचे आरोपही काहीजणांनी केले. मात्र काल सरकारच त्यांच्या घरी गेले. त्यातून ज्यांना जे उत्तर मिळायचे ते मिळाले. शासन आपल्या दारी हा सरकारचा लोकप्रिय कार्यक्रम. त्यामुळे शासन राज ठाकरे यांच्या घरी गेले, तर एवढा गहजब करण्याचे कारण नाही. विरोधी पक्षाच्या नेत्यांना चांगले काही बघवत नाही. जर विरोधकांनी एखादा विषय लावून धरला तर शासन त्यांच्या घरीही जाईल. कारण या नव्या पद्धतीवर आपण आता शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे सरकारने नवे पायंडे पाडले, घटनाबाह्य कृती केली, अशी ओरड करण्यापेक्षा विरोधकांनी सरकारला आपल्याही दारी बोलवावे. नव्या उपक्रमात सरकार त्यांच्याही दारी येईल.

विरोधकांना जनतेच्या दारी जाण्यापासून कोणी अडवले? काँग्रेस पक्षाचेच बघा. त्यांचे नेते सकाळी उठतात. माध्यमांना बाईट देतात. एखाद्या विषयावर पत्रक काढतात. त्यांचा तो दिवस सार्थकी लागला म्हणून शांत बसतात. काँग्रेसचे किती नेते आजपर्यंत लोकांच्या घरी गेले. नागपूर मध्ये काँग्रेसची स्थिती भक्कम असल्याचे सर्वे कोणी केले माहिती नाही. त्याच नागपुरात काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात विकास ठाकरे आणि नरेंद्र जिचकार यांच्यात कपडे फाडण्यापर्यंत मारामाऱ्या झाल्या. ते देखील जाहीर स्टेजवर. हे जर कोणाच्या घरीदारी जाऊ लागले आणि तिथे असे एकमेकांचे कपडे फाडण्याचा कार्यक्रम करू लागले तर कसले सर्वे आणि कसले काय..? त्यापेक्षा सरकार राज ठाकरेंच्या घरी गेले. टोलवर चर्चा केली. झालेले निर्णय माध्यमांना सांगितले. या सगळ्यात जिंकले कोण? पण हे काँग्रेसला सांगावे कोणी..? नागपुरात असे तर मुंबईत वेगळेच…! राहुल गांधी यांना रावणाची उपमा दिल्याबद्दल एकाच दिवशी मुंबई काँग्रेसच्या दोन नेत्यांनी दोन वेगवेगळे आंदोलने केली. मुंबई काँग्रेसचे नेते चंद्रकांत हंडोरे यांच्या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले सहभागी झाले. तर मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्या आंदोलनात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार सहभागी झाले. प्रदेश काँग्रेसचे दोन प्रमुख नेते मुंबई काँग्रेसच्या दोन नेत्यांनी मांडलेल्या दोन वेगवेगळ्या चुलीवर झालेला स्वयंपाक खायला जातात. कोण कोणाच्या बाजूने आहे हे सांगायला या आंदोलनाइतके उत्तम उदाहरण नाही.

सगळ्यांनी मिळून एकच आंदोलन केले असते तर… असे प्रश्न बाळबोध प्रश्न विचारण्याचा वेडेपणा करायचा का..?
काँग्रेसचे हेच नेते सरकार राज ठाकरेंच्या घरी का गेले म्हणून विचारत आहेत. प्रत्येक सरकारने नवीन प्रथा परंपरा पाडल्या पाहिजेत. हे सरकार आज राज ठाकरे यांच्या घरी गेले. उद्या एखाद्याने पाणी मिळाले नाही अशी तक्रार केली तर सरकार त्याच्या घरी जाऊन चौकशी करेल… एखाद्याने आपल्या गल्लीतले रस्ते चांगले नाहीत, कचरा उचलला जात नाही, असे सांगितले तर सरकार त्यांच्याही घरी जाईल. राज ठाकरे यांनी आंदोलन केले म्हणून सरकार त्यांच्या घरी गेले. उद्या तुम्ही कोणी आंदोलन केले तर मंत्री, अधिकारी तुमच्याही घरी येतील. अण्णा हजारे यांचे मन वळवण्यासाठी सरकार राळेगणसिद्धीला जातेच ना… ‘मै भी अण्णा’ म्हणणाऱ्या सगळ्यांकडेच आंदोलन केले की सरकार जाईल…

आता काहीजण यातून राजकीय अर्थ काढतील. राज ठाकरेंना मोठे केले की आपोआप उद्धव ठाकरे यांचे पंख छाटले जातील… टोलचा विषय काढायचा… राज ठाकरेंच्या घरी जायचे… राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या घरी जायचे… यामुळे चर्चा होतील… विद्वतजन आपापली मतं पाजळतील… त्यामुळे भ्रष्टाचार, महागाई, दुष्काळ अशा किरकोळ मुद्द्यांना अर्थ उरणार नाही. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यापेक्षाही राज यांच्या घरी सरकार गेले त्याची चर्चा जास्त होईल… असा जावई शोधही लावला जाईल… कोणाला काय समजायचे ते समजू द्या,
सरकार राज ठाकरेंच्या दारी
मज मौज वाटते भारी…
विरोधक करी आरडाओरडी
चर्चेचे फड रंगती दारी…
हेच आजच्या काळात महत्त्वाचे आहे. मूळ विषय सोडून आपल्याला हव्या त्या गोष्टीवर चर्चा घडवून आणण्यात सरकार पुढे आहे… विरोधक सुशेगात आहेत… तुम्हाला काय वाटते शामराव..?
तुमचाच
बाबुराव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *