स्वर्गीय गोपीनाथ मुंडे : स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
– अतुल कुलकर्णी
भाजपाचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा आज जन्मदिवस. मुंबईत पत्रकारिता करत असताना त्यांची माझी अनेकदा भेट होत असे. ज्यावेळी त्यांनी स्व पक्षात बंड केले, त्यावेळी अनेक पत्रकार मुलाखतीसाठी त्यांच्या मागे लागले होते. पण त्यावेळी पहिली मुलाखत त्यांनी मला दिली होती. विधानभवन ते वरळीला पोहोचेपर्यंत आम्ही दोघे त्यांच्या गाडीत बसून आलो. गाडीत त्यांनी मला मुलाखत दिली. ती मुलाखत दुसऱ्या दिवशी प्रचंड चर्चेचा विषय ठरली. मी अधून मधून हे राजकीय सटायर पुस्तक लिहिले, त्यावेळी त्यांनी मला आवर्जून प्रतिक्रिया दिली. (ती येथे देत आहे) पुस्तकावर त्यांचे कॅरिकेचर वापरले होते. ते पाहून त्या वेळी त्यांनी त्याचे कलर प्रिंट आउट माझ्याकडून मागून घेतले होते. इतके ते त्यांना आवडले होते.
विधानसभेत एकदा त्यांनी आंदोलन केले. सभागृह तहकूब झाले. मात्र सरकार आमचे ऐकून घेत नाही, आम्ही सभागृह सोडणार नाही, असे म्हणून सभागृहातच त्यांनी बैठा सत्याग्रह सुरू केला. चार-पाच तास त्यांचे आंदोलन सुरू होते. संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सत्याग्रह मागे घेण्यासाठी आग्रह धरला. त्यावेळी आम्ही पत्रकार प्रेस गॅलरीत बसून होतो. दिवसभर विधानसभेत गदारोळ होता, रात्री उशिरापर्यंत सत्याग्रह चालू राहिला. त्यावेळी आपल्यामुळे सगळे पत्रकार गॅलरीत बसून आहेत, त्यांची काळजी घ्या अशी आवर्जून आठवण करणारे गोपीनाथ मुंडे एकमेव नेते होते. आज असे नेते सापडणे कठीण आहे.
गोपीनाथ मुंडे यांनी मराठवाड्यात गोदा परिक्रमा चा उपक्रम केला. केशव उपाध्ये यांना सांगून त्यांनी आवर्जून आम्हा पत्रकारांना तेथे बोलावले. गोदा परिक्रमा करताना मला त्यांच्यासोबत काही भागात फिरता आले. एका गावातून दुसऱ्या गावात त्यांचा दौरा सुरू असायचा. जेवण गाडीतच घ्यायचे. आम्ही गेलो त्या दिवशी गाडीत पंडित अण्णा, म्हणजे धनंजय मुंडे यांचे वडील, मुंडेंजी, मी, उदय तानपाठक असे काही पत्रकार होतो. पंडित अण्णांनी त्यांना आग्रहाने गाडीत जेवायला लावले. आम्हालाही गाडीतच जेवण दिले. तो आपलेपणा, आणि गाडीतले ते जेवण आजही लक्षात आहे. त्यांचा जोश आणि तडफ वाखाणण्यासारखी होती. गोदा परिक्रमावर मी एक लेख लिहिला होता. एखादा लेख, एखादी बातमी छापून आली की ते आवर्जून फोन करायचे. त्यांची मतं सांगायचे. मोकळेपणा आणि दिलदारपणा हा त्यांचा मनस्वी गुण होता. त्यावेळी सोशल मीडिया असा आक्रमक नव्हता. एखादी गोष्ट किंवा एखादा लेख, बातमी आवडली नाही, तर गोपीनाथ मुंडे फोन करायचे. त्यांना जे वाटतं ते मोकळेपणाने सांगायचे. एखादी गोष्ट चांगली असेल तर तेही सांगायचे. हा दिलदारपणा त्यांच्याजवळ होता. हल्ली वाढदिवसाला ही शुभेच्छा देताना हे औचित्य पाळले जात नाही. महाराष्ट्र असा कधीही नव्हता. त्यामुळेच गोपीनाथ मुंडे यांच्यासारख्या नेत्यांची आज आवर्जून आठवण येते.
अत्यंत धाडसी नेत्यास त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन..!
माझ्या पुस्तकासाठी त्यांनी दिलेली ही प्रतिक्रिया :-
अतुल कुलकर्णी यांनी लोकमत मध्ये लिहिलेला अधून मधून हा कॉलम सोमवारी मुंबईत असतो तेव्हा आवर्जून वाचत असतो. राजकीय परिस्थितीवर अतुल आपल्या शैलीत उपरोधिक टीका करीत असतात. खुसखुशीत शैलीत त्यांनी केलेली टीका ही बोचरी असते, पण ती वाचनाचा आनंद ही देते. अतुल मध्ये असलेली पत्रकारितेबद्दलची आत्मीयता, विषयाला योग्य न्याय देण्याची पद्धत, यामुळे हा कॉलम वाचनीय झाला आहे.
– गोपीनाथ मुंडे, भाजपाचे लोकसभेतील उपनेते
Comments