आधी कोरोनाशी लढा, राजकारणासाठी आयुष्य पडले आहे..!
राज्यातच नाही तर देशभरात कोरोनाने धुमाकूळ घातलाय. सगळी राज्ये, देश, डॉक्टर्स यासाठी निकराचा लढा देत आहेत. अवघ्या जगाची अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. महाराष्ट्रात बाधीतांचा आकडा ३२० च्याही पुढे गेला आहे. १२ मृत्यू पावले. अशास्थितीत पक्षीय मतभेद विसरुन सगळ्यांनी एकत्र आल्याचे व या महामारीच्या विरोधात लढतानाचे चित्र दिसायला हवे. तरच जनतेच्या मनातील भीती कमी होईल, त्यांना दिलासा वाटेल. पण दुर्देवाने हे होताना दिसत नाही.
जेव्हा आपल्याकडे कोरोनाचे रुग्ण आढळले त्यावेळी सोशल मिडीयातून काही मेसेज फिरले. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असते तर ते अभ्यास करत बसले असते. अत्यंत हिणकस आणि दुर्देवी असे ते मेसेज होते. पण त्याचा बोलवता धनी समोर आला नाही. हा विषय तेथेच दुर्लक्ष करुन सोडून दिला असता तर पुढचे राजकीय हेवेदावे थांबले असते पण तसे झाले तर आम्ही राजकारणी कसले..? त्यानंतर भाजपचे आ. निरंजन डावखरे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. ”सध्या महाराष्ट्राला शुन्य प्रशासनाचा अनुभव असणाऱ्या मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची नाही तर आपत्ती व्यवस्थापनात अनुभवी असणाऱ्या प्रशासकाची म्हणजे देवेंद्र फडणवीस यांची गरज आहे” असे ट्विट डावखरेंनी केले. अशा ट्विटची गरज होती का? पण आधी कोणीतरी काही विधान केले म्हणून आपण लगेच प्रतीविधान करायचे हे अत्यंत चुकीचे आहे. डावखरे अत्यंत सुसंकृत आहेत, त्यांनी असे वागायला नको होते.
त्यानंतर काही दिवसांनी देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ दिवसांचे लॉकडाऊन जाहीर केले. ती देशाचीच गरज होती. मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर करण्याच्या दोन दिवस आधीच महाराष्ट्राने ३१ मार्च पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला होता. या ठिकाणी उध्दव ठाकरे यांचा विशेष उल्लेख केला पाहिजे. कारण त्यांनी अचानक हा निर्णय जाहीर केला नव्हता. त्यासाठी त्यांनी टप्प्याटप्प्याने ऐकेक गोष्टी बंद करत आणल्या होत्या. पंतप्रधान मोदी यांच्या निर्णयावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी ”लॉकडाऊन रात्री ८ वाजता जाहीर करायला ती काही नोटबंदी नव्हे, सकाळी या गोष्टी जाहीर करुन जनतेला तयारीसाठी वेळ द्यायला हवा होता,” असे ट्विट केले. पंतप्रधानांना टप्प्याटप्प्याने बंदी जाहीर करता आली असती. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्याचा आणि राज्याराज्यात अडकून पडलेल्यांचा प्रश्न निर्माण झाला नसता. ही त्या निर्णयाची दुसरी बाजू नक्कीच होती.
मात्र भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी यावर अत्यंत असंवेदनशिल, माणूसकी मातीत मिळवणारी प्रतिक्रीया दिली. ‘मोदींच्या विरोधात बोलण्यामुळेच सांगली जिल्ह्यात कोरोनाची लागण झाली’ असे विधान करुन वाघ यांनी स्वत:च्या बुध्दीची दिवाळखोरी जाहीर केलीच शिवाय संयम, स्वयंशिस्त शिकवणाऱ्या भाजपलाही खाली पहायला लावले आहे. गेले काही दिवस ते ज्या पध्दतीने ट्विटरवरुन भाषा वापरत आहेत ती देश आणि राज्य संकटात सापडल्यावर वापरायची भाषा नाही.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सहाय्यता निधीची घोषणा केली. त्यानंतर भाजपने स्वत:चा आपदा कोष तयार करुन आमदार, खासदारांना त्यांचे एक महिन्याचे वेतन त्यात जमा करण्याच्या सूचना केल्या. याआधी शिवसेनेने सांगली, कोल्हापूरच्या पुर प्रसंगी असा निधी गोळा केला होता म्हणून आम्ही आता केला हे त्याचे केले जाणारे समर्थन अत्यंत दुबळे आहे. त्यांनी चूक केली म्हणून माझ्या चुकीचे समर्थन कसे होईल..? निवडून आल्यानंतर लोकप्रतिनीधी सगळ्यांचे असतात आणि अशा संकटात तर ‘आधी देश, नंतर पक्ष त्यानंतर मी’ असे घोषवाक्य धारण करणाऱ्या पक्षाने तो निधी आधी आपण ज्या राज्यात निवडून आलो त्या राज्याच्या मुख्यमंत्री निधीसाठी दिला पाहिजे ही अपेक्षा चुकीची कशी असेल..? एकीकडे सगळे डॉक्टर्स, नर्सेस, पोलिस, वॉर्डबॉय, सरकारी अधिकारी, कर्मचारी अहोरात्र रुग्णांना बरे करण्यासाठी धडपड करत असताना असे राजकीय वाद घडणे हे कोणालाही शोभा देणारे नाही.
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे ज्या संयमाने परिस्थिती हाताळत आहेत, डॉक्टरांशी बोलत आहेत. त्यांच्या बोलण्याचा केंद्रबिंदू माणूस आहे, राजकारणापलिकडे जाऊन ते सगळ्या गोष्टी हाताळत आहेत अशावेळी सगळ्यांनी आपापले राजकीय झेंडे बाजूला सारुन देशाच्या तिरंग्याखाली एकत्र यायला हवे. या संकटातून वाचल्यावर राजकारण करण्यासाठी आयुष्य बाकी आहे.
Comments