महिन्याला अंदाजे दीड कोटी इएसआयपोटी जमा करणाऱ्या रुग्णालयात मात्र सुविधांची ओरडच
औरंगाबाद, दि. ५ – औरंगाबाद येथील राज्य कामगार विमा योजना रुग्णालयांतर्गत जवळपास ४0 ते ५0 हजार कामगार व त्यांचे अंदाजे दीड ते दोन लाख नातेवाईक यांना येथून आरोग्यविषयक सुविधा मिळू शकतात, पण केवळ कामगारांच्या पगारातून पैसे काढून घेण्याशिवाय अन्य सुविधांच्या नावाने येथील इस्पितळात सारा उजेडच आहे. महिन्याकाठी जवळपास दीड कोटी रुपये कामगारांच्या पगारामधून इ.एस.आय. महामंडळाकडे दिल्लीत जमा होतात व तेथून ते राज्य सरकारकडे ही रुग्णालये चालविण्यासाठी पाठविले जातात. असे असतानाही या इस्पितळाला अत्यावश्यक सुविधा पुरविण्यास आजपर्यंतच्या शासनाची कायम अनास्था राहिली आहे.
कामगार व मालक यांच्याकडून अंदाजे प्रत्येकी ४00 रुपये इएसआय वर्गणी म्हणून कपात केले जातात. अंदाजे ४0 ते ५0 हजार कामगार गृहीत धरले तर एकट्या औरंगाबादेतून ही रक्कम दीड कोटीच्या वर जाते. तसेच कामगारांना येथे उपचारासाठी आणल्यानंतर कोणतेही औषध बाहेरून विकत आणू देऊ नये, असा नियम आहे. सर्व औषधोपचार या इस्पितळात करावा. कारण तो विमेदार असल्यामुळे तो त्याचा हक्क आहे. पण अनेक कामगारांना औषधी बाहेरूनच आणावी लागतात. तसेच जी औषधी उपलब्ध नाहीत, ज्या सोयी येथे उपलब्ध नाहीत त्यासाठी शासकीय रुग्णालयात (घाटीत) रुग्ण पाठविला जातो. त्या वेळीही त्या कामगार रुग्णाकडून शासकीय रुग्णालयात वेगळे पैसे घेतले जातात. त्यासाठी कामगारांना पैसे खर्च करू देऊ नये, अशा स्पष्ट सूचना आहेत. मात्र त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. जर असा खर्च झालाच तर ते पैसे नंतर कामगारांना महिना-दोन महिन्यांत मिळावेत, अशा सूचनाही आहेत. मात्र, दोन-दोन वर्षें हे पैसे कामगारांना मिळत नाहीत.
हा दवाखाना जेव्हा नव्याने सुरू झाला तेव्हा काही रुग्णांना सुरुवातीला चुकीची उपचार पद्धती दिली गेली. त्यामुळेही कामगारांमध्ये याबद्दल शंकेचे वातावरण आहे. वानगीदाखल सांगायचे झाल्यास ए.पी.आय.मधील एम.एच. भाले व पी.बी. बिंद्रा या दोन कामगारांचे देता येईल. यांना चुकीचे उपचार दिल्यामुळे बाहेर जाऊन खाजगी रुग्णालयातून उपचार घ्यावे लागले. या साऱ्याचे मूळ येथे असणारा अपुरा कर्मचारी वर्ग हेच आहे. जर सर्व रिक्त पदे वेळीच भरली गेली असती तर ही वेळ आली नसती, असेही येथील काही जाणकारांचे मत आहे.
अत्यावश्यक वेळी एखाद्या रुग्णाला जर खाजगी दवाखान्यात उपचार घ्यावा लागला तर त्याच्या झालेल्या खर्चाची प्रतिपूर्ती (रिएम्बर्समेंट) मिळण्यास अनेक वेळा विलंब लागतो, याकडेही वेळीच लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
इएसआयअंतर्गत येणाऱ्या शहरातील चार सेवा दवाखान्यांमधील वेळा पाळल्या जाव्यात, अशीही मागणी अनेक कामगारांनी केली आहे. अनेक सेवा दवाखान्यांमधून निश्चित वेळेनंतरही डॉक्टर उपलब्ध नसतात. डॉक्टर आपल्या सोयीने येतात व जातात. त्यामुळे रुग्णांकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही, असेही काहींचे म्हणणे पडले. याबाबत काही विशिष्ट डॉक्टरांना ‘वेगळे’ वरदहस्त असल्याचे काहींनी बोलून दाखविले. इएसआय रुग्णालयासंदर्भात आज प्रसिद्ध झालेल्या वृत्तानंतर इस्पितळाचे भले व्हावे असे वाटणाऱ्या काही डॉक्टरांनी ऊर्जा व पर्यटन राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांची भेट घेतली व या प्रकरणात आपण लक्ष घालावे, अशी विनंती केली. त्या वेळी त्या शिष्टमंडळाला बोलताना राज्यमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आपण या प्रकरणी लवकरच योग्य ती कार्यवाही करू. प्रसंगी आरोग्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती देऊ, असे त्यांनी सांगितले.
Comments