झोत ३
बांधकाम खाते व गुत्तेदारांचे संगनमत आणि अतिक्रमणांचा विळखा
औरंगाबाद, दि. १६ – सार्वजनिक बांधकाम खात्याचे काही अधिकारी व गुत्तेदारांच्या परस्परातील प्रेमाच्या संबंधांमुळेच घाटी रुग्णालयाची अवस्था बिकट बनल्याचे स्पष्ट होत आहे. आज ‘झोत’ मालिकेतील दुसरा भाग ‘सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘औषधांनी’ घाटीचे आरोग्य बिघडले…’ प्रसिद्ध होताच सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी घाटीत धाव घेतली व आपण तीन वर्षांत बजेट नसताना कशी कामे केली याचे दाखले त्यांनी अधिष्ठाता व्ही.एल. देशपांडे यांना दिले. मात्र, वृत्तात नमूद केलेल्या एकाही प्रश्नाबाबत योग्य ते स्पष्टीकरण खात्याने अद्यापही दिलेले नाही.
घाटीच्या ९८ एकर जमिनीवर ठिकठिकाणी असणाऱ्या अतिक्रमणासही या खात्याने कसा हातभार लावला, याचे प्रत्यक्ष पुरावेच या परिसरात उभे आहेत.
घाटीच्या जागेला संरक्षक भिंत वारंवार बांधली जाते. त्याची गुणवत्ता कशी आहे, ते येथे दिलेल्या छायाचित्रावरून दिसून येईल. दगडी भिंत बांधताना निकृष्ट पिलर्स उभे केले. त्याला गेटही बसविले. मात्र, या दोन पिलर्सना जोडणारी संरक्षक भिंत कागदावरच उभी राहिली. (बाणांच्या साहाय्याने ती दर्शविण्यात आली आहे.) आता सदर पिलर्स कागदावरच्या भिंतीच्या आधारे तेथे उभे आहेत. लोकांनी देखील कागदावरची ती भिंत कधीच पाडून टाकली व आता बंद गेटकडे पाहत निवांत ये-जा सुरू केली आहे.
निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरले गेल्यामुळे सदर भिंत पडते (!)… पुन्हा त्याचे गुत्ते निघते… पुन्हा तेथेच पडलेले दगड वापरून ती भिंत बांधण्यात येते… बांधताना दगड तेथीलच असतात, पाणीही घाटीचेच असते… बिलात मात्र सर्व साहित्य नव्याने आणल्याचे दाखविले जाते… असेही वृत्त आहे. महाविद्यालयाच्या इमारतीतील काही कक्षांच्या फरशा बदलण्याचे काम मार्च २000 च्या आधी घाईघाईत करण्यात आले. ते करीत असताना ज्या कक्षात चांगल्या फरशा आहेत त्याही काढून टाकण्यात आल्या. काढताना त्या तिसऱ्या मजल्यावरून खाली फेकण्यात आल्याचे अनेक प्रत्यक्षदर्शींनी सदर प्रतिनिधीस सांगितले. अनेक कक्षात त्या वेळी वॉश बेसीन बसविण्यात आले, ज्यास आता आठ-नऊ महिने होऊन गेले तरी साध्या तोट्याही बसविण्यात आलेल्या नाहीत.
आज वृत्त प्रसिद्ध होताच कार्यकारी अभियंता, उपअभियंता, सेक्शन इंजिनीअर, वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिकारी आदींनी सकाळी १0.३0 वाजता अधिष्ठाता डॉ. देशपांडे यांची भेट घेतली व सुमारे १२.३0 पर्यंत बैठकही घेतली. आम्हाला आठ दिवसांची मुदत द्या, असेही या वेळी सांगण्यात आले. तसेच परिसरात पसरलेले बांधकाम साहित्य त्वरित उचलण्यात येईल, असेही सांगण्यात आले. आम्ही खूप कामे केली असे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी जी कामे सांगितलेली नव्हती तीदेखील कशी काय केली गेली याकडे डॉ. देशपांडे यांनी लक्ष वेधले असता, त्यावर मात्र ते समाधानकारक खुलासा करू शकले नाहीत. काम पूर्ण झाल्यानंतर ते पूर्ण झाले म्हणून त्याचे प्रमाणपत्र अधिष्ठातांकडून घ्यायला हवे, यावर अधिकाऱ्यांची चुप्पी विलक्षण आश्चर्यकारक आहे. देखभालीच्या कामांसाठी ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ची आवश्यकता नसते असा सा.बां. विभागाच्या अधिकाऱ्यांचा दावा आहे. त्यांच्या मते नवीन कामासाठी फक्त ही अट असावी. या अटीमुळे अधिकारी व गुत्तेदारांच्या ‘प्रेमळ’ संबंधांवरच गदा येत असल्याने त्यांना हे नको आहे.
अतिक्रमणाचा विळखा
एवढ्या मोठ्या जागेवर अनेक ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. याची सुरुवातच अगदी रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून होते. मुख्य प्रवेशद्वाराच्या बाजूने अर्धगोलाकार असणाऱ्या आरक्षित जागेत देखील अनेकांनी आप्लया टपऱ्या थाटलेल्या आहेत. मनपाने मध्यंतरी त्या टपऱ्या उठविण्याचा प्रयत्नही केला. पण त्यानंतर त्यांची स्थिती जैसे थे बनली आहे. यातील काही टपऱ्या सा.बां. विभागाच्या काही अधिकाऱ्यांच्या संगनमतानेच चालतात, अशी माहितीही हाती आली आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे काही अनुत्तरीत प्रश्न
- बास्केट बॉल मैदानाची दुरुस्ती करणे व त्यापोटी बील घेणे हे किती वेळा घडले?
- ३१ मार्च २000 चे बजेट पूर्ण होण्यापूर्वी घाटीत जानेवारी ते मार्च या महिन्यात किती कामाची बिले मंजूर झाली? त्या कामांची आजची स्थिती?
- घाटीला रंगरंगोटी करावी अशी अधिष्ठातांची मागणी होती का? त्याचा खर्च किती आला?
- देखभालीचे काम झाल्यानंतर अधिष्ठातांकडून ‘कम्प्लिशन सर्टिफिकेट’ गेल्या तीन वर्षांत घेतलेले आहे का?
- ड्रेनेज साफसफाईचे निश्चित वेळापत्रक आहे का?
- बांधकाम झाल्यानंतर उरलेले साहित्य नेले जाते का?
- महाविद्यालयातील इमारतीत असणारी स्वच्छतागृहे साफ केली जातात का?
- ९८ एकर परिसरात किती सार्वजनिक स्वच्छतागृहे आहेत?
Comments