गुरुवार, २ जानेवारी २०२५
2 January 2025

राज्यात चालूयं समांतर वीजपुरवठा केंद्र !

एक निलंबित, नऊ अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल,
४५ अभियंत्यांचे कोंबींग ऑपरेशन
प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राजकीय नेत्यांचे दबावतंत्र

मुंबई दि. २३ – ‘तुम्ही योजना आखा, कशा राबवायच्या ते आम्ही ठरवू’ या वृत्तीने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी स्वतची टोळीच बनवून ११ केव्ही उच्च दाबाची लाईन उभारली, त्यावर बिनदिक्कत तब्बल पाच ट्रान्सफॉर्मरही बसवले, रोहीत्रांची उभारणी करुन वीज घेणे शक्य व्हावे यासाठी लघूदाब वाहिनीही खाजगीरित्या उभारली व बिहार स्टाईल स्वतचे समांतर वीज पुरवठा केंद्रच सुरु केले.

गेली तीन-चार वर्षे हा प्रकार अव्याहतपणे सुरु होता. महाराष्ट्रातील शेवगाव येथे असे हे अफलातून केंद्र सुरु केल्याची खळबळजनक घटना उघडकीस येताच त्याचा करंट थेट मुंबईपर्यंत बसला असून महावितरणने तातडीने एकास निलंबित केले आहे. एकाची बदली करण्यात आली असून नऊ अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

वैतरणा-गोदावरी नदीच्या काठावरील नगर भागातील शेवगाव शिवाय, श्रीगोंदा, कर्जत, बेलवाडी, पाथर्डी, नेवासा, संगमनेर, अकोले, राजूर, घोडेगाव या उपविभागात असे आणखी काही प्रकार असण्याची शक्यता वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बोलून दाखविली आहे. या प्रकाराने हादरुन गेलेल्या महावितरणने कोल्हापूर परिमंडळातील ४५ अभियंते व तंत्रज्ञांच्या नऊ तुकड्या केल्या असून संपूर्ण परिसरात मोठ्या प्रमाणावर कोंबींग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे.

नागपूरच्या अधिवेशनाच्या तोंडावर हा प्रकार उघडकीस आला असून हे प्रकरण चव्हाट्यावर येऊ नये म्हणून राजकीय नेत्यांनी दबावतंत्र अवलंबिले असले तरी महावितरणने स्वतच्याच कर्मचारी अधिकाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल केल्याने आता ज्यांनी ही चोरटी वीज वापरली त्यांच्याविरुध्दही गुन्हे दाखल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

अत्यंत धक्कादायक असे हे समांतर वीजपुरवठा केंद्र कर्मचाऱ्यांनी महावितरणचेच सर्व साहित्य वापरुन उभारले होते. या समांतर वीज केंद्रातून वीज गळतीच्या नावाखाली वीज वापरली जात होती. महावितरणने वीज चोरीविरुध्द मोहिम उघडल्यानंतर अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव भागातील कर्मचारी अधिकाऱ्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. एका अधिकाऱ्याने ही बाब टिपली व बारकाईने लक्ष ठेवले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला. ज्याने हा प्रकार उघडकीस आणला त्याला कौतुकाची थाप पडायला हवी पण त्याचेच शत्रू महावितरणमध्ये वाढू लागल्याने आता चोरांना सोडून चांगले काम करणाऱ्यास संरक्षण देण्याची वेळ महावितरणवर आली आहे.

या प्रकरणी कार्यकारी अभियंता ए.बी. काटेकर, सहाय्यक अभियंता व्ही.एस. आव्हाड, कनिष्ठ अभियंता व्ही.एस. दासरी, बी.के.पांगरे, एस.ए. कुलकर्णी, एस.जी. बुजरे, मदतनीस आर.के. साठे, झेड.आर. चव्हाण यांच्या विरुध्द एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्यातील पांगरे हे निवृत्त झाले आहेत तर दासरी व कुलकर्णी यांनी राजिनामा दिलेला आहे.

याशिवाय झुंबर चौधरी या मदतनिसास निलंबित करण्यात आले असून एम.एस. वाघमारे या उपकार्यकारी अभियंत्याची चाळीसगाव येथे बदली करण्यात आली आहे.

हे समांतर वीजपुरवठा केंद्र गेल्या किती वर्षापासून सुरु होते याविषयी मतभिन्नता असली तरी गेल्या तीन ते चार वर्षापासून हे चालू असावे असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले. या पाच ट्रान्सफॉर्मरवरुन सुमारे ४४ कृषीपंपांना अनधिकृतपणे वीज पुरवठाही होत असल्याचे आढळून आले आहे.

कोल्हापूर परिमंडळाचे ४५ वरिष्ठ अधिकारी सध्या या भागात नगर आणि वैतरणा-गोदावरीच्या काठावर तळ ठोकून असून कोणती लाईन अधिकृत व कोणती बेकायदेशीय हा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे आ वासून उभा आहे.

ही सर्व यंत्रणा महावितरणच्याच साहित्यातून, महावितरणचाच पगार घेऊन तेथे काम करणाऱ्यांनी उभी केली. त्यातून
अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

  • ज्यांना वीज दिली गेली अशांकडून दिलेल्या वीजेचे किती पैसे घेतले गेले ?
  • ते पैसे घेताना कोणती पध्दती वापरली गेली ?
  • व्यवहारात कोणाचे बिनसले म्हणून हा प्रकार उघडकीस आला का ?
  • या समांतर वीज पुरवठा केंद्राला कोणत्या राजकीय पुढाऱ्याचा पाठिंबा होता का ?
  • ज्या काळात हे वीज केंद्र चालू होते त्या तीन-चार वर्षाच्या काळात या भागातील किती कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या ?
  • बदलून आलेल्या अधिकाऱ्यांनी कार्यालयीन सुत्रं देताना या समांतर केंद्राची सुत्रंही दिली का ?

असे टोकदार प्रश्न कोंबींग ऑपरेशन करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तपासावे लागणार आहेत.यातून आणखी किती सुरस कथा बाहेर येतात हे माहिती नाही पण हे संपूर्ण प्रकरण इतके गंभीर आहे की राज्यात असे किती समांतर वीज केंद्र आणखी कोठे चालू आहे याचीही राज्यभर चौकशी केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *