कोकणातली कोंबडी आणि कोंबडीचोर
काय, दबक्या पावलानं येऊन कोंबड्या चोरताय की काय दादाराव…
वाट्टेल ते बोलू नका वास्करशेठ… सांगून ठेवतोय… आधीच आपलं डोकं गरम. त्यात आपल्या दोन पोरांन ऐकलं ना तर मग काय खरं नाय तुमचं…
अहो पण एवढं चिडायला काय झालं… मी काय म्हणलं तुम्हाला… कोंबडी चोर ही काय शिवी झाली की काय…
शिवी नाय तर काय… आमच्या कोकणात भुरट्या चोरांना कोंबडी चोर म्हणतात माहितीयं का…
आता कोकणात कशाला काय म्हणतात हे काय तुमच्याकडून शिकायचं की काय आम्ही… माहितीयं आम्हाला तुम्ही शेठ कसे झाले ते… कशाला तोंड उघडायला लावताय सकाळी सकाळी…
अहो, तुम्हाला भूरटे चोर म्हणालो म्हणून राग आला की तुम्हाला मोठे दरोडे टाकता येत नाहीत याचं वाईट वाटलं सांगा बरं मला…
पुन्हा पुन्हा तेच… आता गप्प बसता की दाखवू हिसका…
अरारा… फारच गरम झाले तुम्ही साहेब… तुम्ही एक गरम तर तुमचे पोट्टे दहा गरम… आम्ही बघा बरं… कसे सोबरपणे बोलतो, वागतो… तुम्हाला ना तुमचा पंथ वाढवता येईना त्याचा राग आमच्यावर कशामुळे काढू लागले बरं तुम्ही…
तुम्हाला ना हात मोडक्या खूर्चीवर बसून सावकारी करायची सवय लागलीय… त्यात ती मोडकी खूर्ची डोक्यात गेलीय तुमच्या…
ओ, काय पण नका बोलू… सांगून ठेवतोय… आपण शेठगिरी करतो ते आपल्या दमवर… तुमच्यासारखं दुसऱ्यांच्या कोंबड्या चोरुन नाय शेठगिरी करत…
अरे तिच्या… पुन्हा तेच बोलतोय हा वासकऱ्या… कोण रे तिकडं…
साहेब, साहेब… आम्ही दोघचं आहोत इकडं… काय करु सांगाच तुम्ही…
प्रत्येक गोष्ट काय मीच सांगायची काय रे… तुमचं डोकं वापरलं तर काय बिघडलं की काय…
पण साहेब, काय घडलं तेच कळलं नाय तर बिघडलेलं कसं कळणार ना…
तू गप्प रे… काय करावं तेच कळेना मला या दोघांच…
मी पण तेच म्हणतो दादाराव… उगाच तुम्ही फार अपेक्षा ठेवता आणि पंचाईत करुन घेता स्वत:ची आणि या दोघांची पण… आमचं बघा बरं… याचे घ्यायचे, अन् त्याला द्यायचे… घेताना दोन जास्ती घ्यायचे, देताना दोन कमी द्यायचे… पुन्हा सगळा गाव आपल्याला शेठ म्हणतो की नाय… नायतर तुमचं बघा… कोणाचं घेता, कोणाला देता काय पत्ता लागत नाही… पण तुम्हाला कोंबडी चोर म्हणलं की राग येतो…
आता पुन्हा जर का तू कोंबडी चोर म्हणालास ना वास्कऱ्या… तर जीभ हासडून हातात देईन…
बरं राहीलं दादाराव… पण चिडून काय होणार सांगा बरं… तुम्हाला ना गल्लीत कोणी बोलेना, ना दिल्लीत कोणी पुसेना… आता उगा जे मिळालयं ते हरी हरी करीत सांभाळा म्हणजे झालं…
तू रे कोणत्या कष्टानं मिळवलसं… तूझी लफडी काढू का बाहेर… मगं फिरशील तोंड लपवीत सगळ्या गावभर…
मी काय म्हणतो दादाराव… हे असं किती दिवस याची लफडी काढू का, त्याची काढू का… म्हणत बसणार तुम्ही… त्यापेक्षा एकदा होऊनच जाऊद्या ना…
साहेब, हा होऊन जाऊद्या म्हणतोय… करू का राडा…
अरे तुमच्या या अशा राडेबाजीमुळं तर मला सोन्याची कोंबडी मिळता मिळता राहीली… तुमच्यामुळेच माझं…
बघा दादाराव सोन्याची सुध्दा कोंबडीच हवी की नाय तुम्हाला… मग कोणी कोंबडी चोर म्हणलं तर काय बिघडलं…
तेवढ्यात राडेबाजीला सुरुवात झाली तरी दोघेही पिंगाट पसार झाले…
Comments