दै. ‘लोकमत’च्या वृत्तमालिकेची खंडपीठाने दिवाणी अर्ज म्हणून दखल घेतली !
दि. ५ मे ते ८ मे २००१ या कालवधीत औरंगाबादच्या मेडीकल कॉलेज व हॉस्पीटलचेच आरोग्य कसे बिघडले आहे याची ‘झोत’ या नावाने मालिका प्रकाशित केली. त्यात अनेक विषयांना स्पर्श केला होता. त्यानंतर दि. ११ जून २००१ रोजी औरंगाबाद खंडपीठाने त्या वृत्तांनाच दिवाणी अर्ज म्हणून दाखल करुन घेतले. वैद्यकीय महाविद्यालयातील रिक्त जागांबद्दलचा एक खटला त्यावेळी चालू होता. त्या मूळ याचिकेत तो दाखल केले गेले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात अनेक सोयी सुविधा दिल्या गेल्या. खटला चालूच होता. नंतरही २९ ते ३१ ऑगस्ट २००१ रोजी पुन्हा एकदा ‘झोत’ मध्ये घाटीत काय झाले काय नाही याचा वेध घेतला होता.
औरंगाबाद, दि. ११ (लो.वा.से.) – येथील घाटी रुग्णालयातील विविध प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या दै. ‘लोकमत’च्या वृत्तांची दखल खंडपीठाने घेतली असून ‘त्या’ वृत्तांना दिवाणी अर्ज म्हणून वैद्यकीय जागांच्या मूळ याचिकेत दाखल करून घेतले आहे. त्यावर दि. १३ जूनला सुनावणी होणार आहे.
दै. ‘लोकमत’चे वरिष्ठ उपसंपादक अतुल कुलकर्णी यांनी ‘झोत’ या मालिकेद्वारा घाटी रुग्णालयातील आरोग्यविषयक समस्या, सार्वजनिक बांधकाम खात्याची अनागोंदी, कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, अतिक्रमणे यासंदर्भात वृत्तमालिका प्रकाशित केली होती. तर उपसंपादक प्रभुदास पाटोळे यांच्या ‘ऑपरेशन मेडिकल’ या मालिकेतील खाजगी व्यवसाय करणाऱ्या २१ डॉक्टरांच्या वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून दखल घेतली आहे.
या वृत्तांना दिवाणी अर्ज म्हणून मूळ याचिकेत दाखल करून घेतले आहे. या वृत्तासंदर्भात येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांना उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
‘झोत’ वृत्तमालिकेद्वारे वैद्यकीय महाविद्यालयातील गैरसोयी तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने घाटी इस्पितळात अर्धवट सोडलेली काम, कामांचा दर्जा, अनेक दिवसांपासून पडून राहणारे बांधकाम साहित्य, विविध संवर्गात काम करणाऱ्या १५८ कर्मचाऱ्यांची रिक्त पदे, बांधकाम खाते व गुत्तेदारांचे संगनमत आणि अतिक्रमणाचा विळखा घाटी इस्पितळातील दुरवस्थेमुळे येणाऱ्या रुग्णांची होणारी मानसिकत कुचंबणा या साऱ्या पैलूंवर प्रकाश टाकला होता.
तर ‘ऑपरेशन मेडिकल’ या मालिकेत व्यवसायरोध भत्ता घेऊनही खाजगी व्यवसाय करणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील २१ डॉक्टरांच्या चौकशीबाबतचे वृत्त प्रकाशित केले होते.
Comments