आमची मुलगी… आमची शक्ती..!!
– अतुल कुलकर्णी
लॉकडाऊन लागू झाले, आणि विमानसेवा बंद झाली. परदेशातून येण्याजाण्यास बंदी झाली. याला आता आठ महिने झाले. या काळात आमची मुलगी गार्गी, कॅनडा देशातील टोरोंटो येथे एकटी रहात आहे. तिला आलेला एकटेपणा ती आमच्याशी बोलून घालवत आहे. शिवाय घरातली, तिची सगळी कामं तीच करत आहे.
स्वत: एका कॉफी शॉपमध्ये काम करुन पैसे कमावते आहे. आम्हाला म्हणते, लागले तर तुम्हालाच मागेन ना मी पैसे… मी कमावते आहे, तुम्ही काळजी करु नका… पै पै चा हिशोब ठेवत आहे. एक पैसा देखील चुकीचा खर्च होणार नाही, याची काळजी घेत आहे. तिच्या शिक्षणासाठी घेतलेले कर्ज देखील कसे फेडायचे याची सुध्दा तयारी करत आहे…!कधी कसली तक्रार नाही, वाईट वाटलेच तर अनेकदा भरुन आलेले डोळे देखील आम्हाला दाखवत नाही…!! अभिमानाने ऊर भरुन यावा अशी आमची मुलगी गार्गी… आमच्यासाठी ती आमची शक्ती आहे…!!!
नवरात्रीच्या निमित्ताने आज तिच्यातल्या स्त्री शक्तीची ओळख तुम्हाला करुन देताना मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतोय… आम्हाला एकुलती एक मुलगी. बारावी नंतर टोरोंटो येथे शिकायला गेली. पहिले दोन वर्षे हॉस्टेलवर राहीली. पण तिथे तुमची रुममेट कोण असावी हे तुम्हाला ठरवता येत नाही, तिला एक मराठी मुलगी तिच्याच कॉलेजमध्ये भेटली आणि दोघींनी तिसऱ्यावर्षी एक रुम भाड्याने घेतली. आता कॉलेज संपले. १९ जून रोजी तिचा पदवीदान समारंभ होता. आम्ही कितीतरी स्वप्न रंगवली होती. पण कोरोनाने सगळ्यांवर पाणी टाकले. तिची पदवी तिच्या रुमवर कुरीयरने आली. दरम्यान तिला तेथे एका कंपनीत जॉब मिळाला. सप्टेंबर पासून जॉब सुरु होणार होता. पण कोरोनाने तो देखील लांबला. त्यासाठी म्हणून तीने स्वत: एक रुम शोधली. स्वत:चे सामान स्वत: शिफ्ट केले. एकटी राहू लागली. सुरुवातीच्या काळात कोठे बाहेर जाता येत नव्हते.
नंतर हळू हळू काही गोष्टी सुरु झाल्या तसे तिचा कॉफी शॉपचा जॉबही सुरु झाला. आजही ती आमच्याशी तास भर तरी गप्पा मारते. विमानसेवा सुरु होणार असेल, तर तुम्ही या किंवा मी तरी येते असे म्हणते… पण हिंमतीने सगळं काही करत आहे. आपण इथे कोणाच्या ना कोणाच्या सोबत असतो. फिरतो. भेटतो एकमेकांना. पण गार्गीला अनेकदा खूप एकटेपणा येतो. पण तीने त्यातही स्वत:ला सावरले आहे. हिंमतीने उभी आहे. मला अनेकदा म्हणते, कुठे फार फिरत जाऊ नकोस… मास्क घेऊन जात जा… स्वत: मास्क लावून कॉफी शॉपच्या जॉबला जातानाचे फोटो दाखवते.
या काळात तिने भरपूर पुस्तक वाचली. आत्तापर्यंत मी १४ हजार पेजेस वाचून काढले असा हिशोबही सांगते. कधी लायब्ररीतून तर कधी विकत, कधी किंडलवर पुस्तकं घेते आणि वाचत बसते… पुस्तकातल्या गोष्टी आम्हाला सांगते.
मध्यंतरी तिच्या काही वस्तू आम्ही एका बॉक्समध्ये घालून तिला कुरीयर केल्या, तर तो बॉक्स उघडल्यावर मला घराचा, तुमचा सगळ्यांचा स्पर्श जाणवला, तुमच्या हातांचा वास आला… असे सांगताना, मी मग काल रात्री खूप रडले… असेही सांगून ती मोकळी झाली… या नवरात्रीच्या निमित्ताने तिच्याएवढी शक्ती मला अन्य कोणाकडून मिळेल… मी आणि माझी पत्नी दीपा, दोघांनाही म्हणूनच तिचा सार्थ अभिमान आहे…! बेस्ट लक बच्चा…!!
Comments