स्वच्छ मनाने जेजे मध्ये काम करणारी डॉक्टर
(नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने)
– अतुल कुलकर्णी
खरे तर तिला कधीच जे जे हॉस्पिटल मध्ये नोकरी करायची नव्हती. शिकताना देखील या हॉस्पिटलच्या ऐवजी दुसरे हॉस्पिटल मिळाले तर बरे, असे तिला वाटत असे. मात्र ज्या कॉलेजमध्ये आपण शिकलो, त्याच कॉलेजमध्ये डोळ्याच्या विभागाचे विभाग प्रमुख होण्याची संधी तिला मिळाली. या संधीचे तिने सोने केले. लॉकडाउनच्या काळात ७० दिवस ती जेजे हॉस्पिटलमध्ये राहिली. प्रशासनाचे आणि रुग्णसेवेचे काम केले. आजही तिच्यासमोर एखादा वयोवृद्ध रुग्ण आला तर त्याच्यात ती स्वतःच्या आजोबांना पाहते. तथाकथित व्यवहार तिला कधीच कळला नाही. मात्र रुग्णसेवेचा व्यवहार तिच्या अंगात ठासून भरला आहे. तिचे नाव डॉक्टर रागिनी पारेख.
मध्यमवर्गीय कुटुंबातील ही मुलगी. जेवढे जवळ पैसे आहेत तेवढ्या विषयाची ट्यूशन आपण लावू शकतो, अशा वातावरणात रागिनी आलेली. १९८४ मध्ये तिला एम बी बी एस साठी जेजे हॉस्पिटलमध्ये गुणवत्तेवर प्रवेश मिळाला. रागिणीला स्त्रीरोगतज्ञ व्हायचे होते, पण ते सोडून बाकी सगळ्या ठिकाणी तिला प्रवेश मिळत होता. ज्युपिटर हॉस्पिटल चे सीईओ डॉक्टर अजय ठक्कर हे रागिणीच्या ओळखीचे होते. त्यांनी तिला ओप्थोमोलॉजी हा विषय घ्यायला सांगितला. त्या काळात जे जे मध्ये डॉक्टर किरीट मोदी, आणि डॉक्टर आर सी पटेल हे दोन खूप मोठे नावाजलेले डॉक्टर होते. त्यांचे मार्गदर्शन रागिणीला मिळाले. १९८८ मध्ये एमबीबीएसची परीक्षा दिली. त्या काळात तिच्या आजोबांना मोतीबिंदू झाला. त्यांची शुगर वाढल्यामुळे दिसेनासे झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. ही गोष्ट रागिणीच्या मनावर खूप खोलवर रुतून बसली. त्यामुळे आजही एखादा वयोवृद्ध पेशंट दिसला की रागिनी या रुग्णांमध्ये स्वत: च्या आजोबाला पाहते.
पुढे एम. एस. देखील रागिनी ने जेजे मधून केले. त्यानंतर एक वर्ष राजावाडी मध्ये प्रॅक्टिस केली. जुलै १९९४ मध्ये डॉ. तात्याराव लहाने यांची अंबाजोगाईहून मुंबईत बदली झाली. त्यावेळी काही मित्रांनी रागिणीला सांगितले, की तू जे जे मध्ये जॉईन होऊ नकोस. तिची देखील दुसऱ्या रुग्णालयात जाण्याची इच्छा होती. मात्र योगायोगाने ती जेजेमध्ये कामाला आली. सरकारी हॉस्पिटलचे जे राजकारण असते, त्यातून रागिनीही गेली. त्याचा फटका बसला. मात्र मन लावून काम करणे एवढा एक सद्गुण तिच्या जवळ होता. १९९६ मध्ये जेव्हा जेजे हॉस्पिटलमध्ये फेको मशीन आली तेव्हापासून रागिनी ने प्रचंड काम सुरू केले.
राजावाडी हॉस्पिटल मधील डॉक्टर अंजना खोकानी तर सेंट जॉर्ज हॉस्पिटल मधील यास्मिन भगत यांनी रागिणीला खूप मदत केली. १९९४ पासून आजपर्यंत आपण किती ऑपरेशन केले, याची सगळी नोंद रागिनी कडे आहे.आजपर्यंत तिने ७५,००० ऑपरेशन्स केले आहेत. जे जे हॉस्पिटल आणि वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या नेत्र शिबिरांमधून वर्षाला १ लाख रुग्ण तपासण्याचे कामही तिने केले आहे.
डॉक्टर तात्याराव लहाने जेव्हा जेजेमध्ये आले, त्यावेळी त्यांना अनेकांनी रागिनी विषयी आणि रागिणीला डॉक्टर लहाने यांच्या विषयी उलट-सुलट सांगितले होते. मात्र निष्ठेने काम करणाऱ्या रागिणीला पाहून डॉक्टर लहाने यांनी तिला एकेदिवशी सांगितले, तू मला छोट्या बहिणीसारखी आहेस. मन लावून काम कर, कोण काय बोलतो याकडे लक्ष देऊ नकोस… आणि त्या एका प्रसंगाने रागिनी आणि डॉक्टर लहाने यांचे नाते मजबूत झाले. दोघांनी मिळून जे जे हॉस्पिटल मध्ये डोळ्यांचा विभाग राज्यभर गाजवला. डॉक्टर लहाने आपले आदर्श आहेत. त्यांच्याकडून रुग्णांशी कसे बोलावे, रुग्णांना कसे तपासावे, याचे ज्ञान मी घेतले. हे सांगताना तिच्या चेहर्यावर सतत कौतुक असते. डॉक्टर लहाने यांनीदेखील रागिणीला काम करण्याचे स्वातंत्र्य दिले, त्यामुळे रागिनीने विविध ठिकाणी आपल्या ज्ञानाचे कौशल्य दाखवले. गेल्या तेरा वर्षापासून रागिणी पारेख बॉम्बे ओप्थोमोलॉजी असोसिएशनची सायंटिफिक चेअरमन आहे. आजपर्यंत रागिने ५५ वेळा लाईव्ह सर्जरी केल्या आहेत.
कोरोनामुळे लॉक डाऊन लागू झाले, तेव्हा सलग ७० दिवस रागिनी जेजे हॉस्पिटलमध्ये राहिली. तिथेच एका रूममध्ये बेड बनवला. स्वयंपाक बनवण्याची सोय केली. सकाळचा ब्रेकफास्ट, रात्रीचे जेवण तिथेच बनवायचे. दुपारचा डबा फक्त घरून यायचा. घरी वयोवृद्ध आई-वडील असल्यामुळे त्यांना त्रास होऊ नये यासाठी रागिने हा मार्ग निवडला. या काळात रागिने जे रुग्ण येतील त्यांना तपासले प्रशासनाचे काम केले. शनिवार रविवार डॉक्टर्स आपापल्या घरी आराम करत असतात त्या काळात देखील रागिनी वेगवेगळ्या ग्रामीण भागात जाऊन रुग्ण तपासणी चे कॅम्प करत असते.
रागिनी खोटे बोलत नाही. जे आहे ते तोंडावर बोलते. अनेकांना त्या बोलण्याचे वाईटही वाटते. मात्र तिच्या बोलण्यात कोणतेही राजकारण नसते. अत्यंत स्वच्छ मनाने ती जेजेमध्ये काम करताना दिसते. येणाऱ्या रुग्णांशी हसत-खेळत बोलताना दिसते. रुग्णांवर प्रेम करणारी डॉक्टर, अशी तिची ओळख आहे. जगात वावरण्यासाठी आवश्यक असणारे व्यवहारज्ञान तिच्याकडे कदाचित नसेलही, मात्र रुग्णांवर प्रेम करण्याचा अतिशय सुंदर असा गुण रागिनी कडे आहे. सरकारी हॉस्पिटल मध्ये असे डॉक्टर्स पाहायला मिळणे हा आजच्या काळातला दुर्मिळ गुण. मात्र तो अशा चांगल्या रीतीने दिसला की अशा रणरागिनी ना नमन करावे वाटते. नवरात्रीच्या आठव्या माळेच्या निमित्ताने ही स्टोरी तुम्हाला नक्की आवडेल…
Comments