रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

शब्दाला जागणाऱ्या वित्तमंत्र्यांनी दिले १५ कोटी रुपये !

– अतुल कुलकर्णी

एक अनोखी घटना घडली आणि ती मला आपल्याला आवर्जून सांगावीशी वाटली. लातूर माझे जन्मगाव. तिथे असणाऱ्या गुणवंतीबेन ठक्कर सेवाभावी संस्थेचे प्रमुख अजय ठक्कर, डॉ. गिरीष मैंदरकर, डॉ. चेतन सारडा आणि लातूरमधील सगळ्या मित्रांनी मिळून हा कार्यक्रम १७ जून २०१८ रोजी आयोजित केला होता. कार्यक्रमास राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार आले. त्यांच्याच हस्ते मी लिहीलेल्या ‘बिनचेहऱ्याची माणसं’ या माझ्या पुस्तकाच्या तिसऱ्या एडिशनचे प्रकाशन झाले.

त्यावेळी भाषणात बोलताना मी काही मुद्दे मांडले. लातूर हे माझे गाव. गेली अनेक वर्षे तेथे सुसज्ज असे नाट्यगृह नाही. फार पूर्वी कधीतरी मी लातूरला प्रख्यात गायक पं. हृदयनाथ मंगेशकर यांना घेऊन गेला होतो. त्यांच्या गाण्याचा कार्यक्रम उत्साहात झाला. त्यावेळी महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाच्या मागे असणाऱ्या तळ्याच्या जागेत नाट्यगृह उभे करण्याचा निर्णय त्यावेळी नगरपालिका चालवणाऱ्या नेत्यांनी घेतला होता. मंगेशकरांचा त्याच जागेवर सत्कार झाला. त्यांना देखील ही कल्पना सांगण्यात आली. त्यांनी ती उचलूनही धरली. ते म्हणाले, तुम्ही नाट्यगृह बांधा, मी लतादिदीला येथे घेऊन येतो. त्यावेळी नाट्यगृहाचे नाव देखील लता मंगेशकर नाट्यगृह दिले जाईल असे सांगण्यात आले. मात्र या गोष्टीला किमान २५ वर्षे होऊन गेली. त्या जागेवर नंतर एक पार्क झाले. नाट्यगृह काही झाले नाही.

ही आठवण मी माझ्या भाषणात सांगितली. प्रत्येक जिल्ह्याला नाट्यगृह असावे असे शासनाचे धोरण आहे, तेव्हा तुम्ही लातूरला नाट्यगृह उभारण्यासाठी निधी द्या असा आग्रह मी त्यांना केला. जर नाट्यगृह झाले तर लातूर सारख्या सांस्कृतिक शहराची कलेची भूक भागेल असेही म्हणालो. शिवाय लातूरला नियोजन भवनची चांगली इमारत नाही, ती देखील देता आली तर बरे होईल असे मी म्हणालो.
त्यानंतर बोलताना सुधीरभाऊंनी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ जागेचा शोध घ्यावा आणि प्रस्ताव पाठवावा, त्यासाठी निधी दिला जाईल, अशी घोषणा केली. शिवाय नियोजन भवनाचाही आराखडा सादर करा असे आदेश दिले. अन्य राजकीय पक्ष घोषणा करतात तशीच मलाही ती घोषणा वाटली. या सगळ्या घटनाक्रमाचे कार्यक्रमास उपस्थित असणारे कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार साक्षीदार होते. त्यांनी देखील मी ही मागणी केल्याबद्दल माझे अभिनंदनच केले.
आम्ही कार्यक्रम करुन परत मुंबईत आलो. मी माझ्या कामाला ही लागलो.

१७ जूनला रविवार होता. १८ जून सोमवारी मला सुधीरभाऊंच्या ऑफिसमधून फोन आला. तुम्हाला एक मेल पाठवला आहे, बघून घ्या असे सांगण्यात आले. मी मेल पाहिला तर त्यात सुधीरभाऊंचे पत्र होते. ते त्यांनी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांना लिहीले होते, ते पत्र येथे देत आहे.

त्या पत्रात, जिल्हाधिकाऱ्यांनी नाट्यगृहाचे व नियोजन भवनाचे आराखडे, अंदाजपत्रक तयार करुन तातडीने प्रस्ताव सादर करावा असे सांगितले. त्या पत्राची प्रत माझे नाव टाकून मलाही त्यांनी पाठवली होती. हा माझ्यासाठी सुखद धक्का होता.

काही दिवस गेले. मी ही ती घटना कामाच्या गर्दीत विसरुन गेलो. मात्र नागपूरला पावसाळी अधिवेशनात त्यांनी मला बोलावून घेतले आणि म्हणाले, अतुलभाऊ, तुमची मागणी मी पूर्ण केलीय. लातूरच्या नाट्यगृहासाठी मी १५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. हा माझासाठी खूपच मोठा धक्का होता. मी खूष झालो. मात्र तेवढ्यावर थांबतील ते सुधीरभाऊ कसले…? त्यांनी त्याचेही पत्र मला दिले. त्याचीही प्रत येथे जोडली आहे.

त्यात त्यांनी म्हटले होते की, मी तुमच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात नाट्यगृहासाठी निधी देईन अशी घोषणा केली होती. ते आश्वासन पूर्ण झाले असून जुलै २०१८ च्या पुरवणी अर्थसंकल्पात नाट्यगृहासाठी मी १५ कोटींची तरतूद केली आहे…!


माझ्या शहरातली २५ वर्षे जुनी मागणी एका क्षणात पूर्ण झाली, त्यासाठी निधीची तरतूदही केली गेली, यापेक्षा आणखी आनंद तो काय असावा..? या कामी लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी जी गती दाखवली त्याबद्दल त्यांचेही कौतुक. दिलेल्या आश्वासनाला जागणारा असा नेता आणि ज्यांना शब्द दिला त्यांना विश्वासात घेऊन त्या आश्वासनाच्या प्रवासात मला त्यांनी साक्षीदार करुन घेतले त्याबद्दल त्यांचे आभार मानण्यास माझ्याकडे शब्द नाहीत. एवढंच म्हणेन, सुधीरभाऊ, यु आर सिम्पली ग्रेट…!

वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत, मुंबई

९८६७५२१०२२


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *