बुध्दीबळाच्या सारीपाटावरील मुत्सदेगिरी
साधारणपणे २०१४ ची गोष्ट. राज्यात नेतृत्व बदलाची चिन्हे दिसत होती. निवडणुकांच्या प्रचारसभा शिगेला गेल्या होत्या. त्याचवेळी नागपुरात एका सभेत नरेंद्र मोदींनी असे काही संकेत दिले की हा माणूस मुख्यमंत्री होणार अशा बातम्या येऊ लागल्या आणि पक्षातल्या अन्य नेत्यांच्या महत्वाकांक्षांनी डोके वर काढणे सुरु केले. काहींनी जातीवरुन टीकास्त्र सोडले, कधीही मंत्री न झालेला माणूस थेट मुख्यमंत्री कसा होणार असाही सूर उमटला. मात्र ‘ते’ मुख्यमंत्री होणार हे जाहीर झाले आणि आजवर ज्याला आपण अरे तुरे करत होतो त्याला जाहीरपणे ‘सीएम साहेब’ म्हणणे काहींना जमेना, काहींना रुचेना… पण ‘ते’ शांत होते, संयमाने सगळ्या गोष्टी हाताळत होते. कोणाला काही सांगायचे असेल तर एकट्याला बोलावून समजावून सांगत होते… अगदी आपल्या सख्ख्या नातेवाईकापासून ते राजकारणात ज्यांच्यासोबत अनेक वर्षे खांद्याला खांदा लावून काम केले अशा अनेकांना ‘ते’ संयतपणे आपली बाजू पटवून देत होते.
पहिल्या मंत्रीमंडळ विस्तारात अगदीच मोजक्या लोकांना घेता आले. मात्र त्यातही प्रत्येकाचा मान सन्मान कसा राहील याचा विचार करत ‘त्यांनी’ बुध्दीबळाचा डाव मांडला. सगळे सैन्य शिस्तीने सारीपाटावर मांडून ठेवले… कधी घोड्याच्या अडीच घराच्या चालीने, तर कधी उंटाच्या तिरकस गतीने, कधी हत्तीच्या सरळ रेषेने तर कधी प्याद्याच्या एक घराच्या चालीने ‘त्यांची’ खेळाला सुरुवात झाली… पहिले काही दिवस एकनाथ खडसे ऐकेरी उल्लेख करुन बोलायचे… पण अचानक तसा उल्लेख जाहीरपणे बंद झाला… पक्षांतर्गत नेत्यांना हा बदल फारसा लक्षात आला नाही… दरम्यान दुसऱ्यांदा मंत्रीमंडळ विस्तार झाला. काही नवीन चेहरे आले. जर आपण चाल केली नाही तर आपल्याला कायमचा खेळ गुंडाळावा लागेल असे शिवसेनेच्या गोटात वारे शिरले. हे वारे कोठून आले कोणाला फारसे कळाले नाही पण मिळालेल्या विरोधीपक्षाचा त्याग करत शिवसेना सत्तेत सहभागी झाली… ‘त्याच्या’ बुध्दीबळाच्या खेळाला रंग भरु लागला होता…
दरम्यान राष्ट्रवादीचे ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भूजबळ टप्प्यात आले. परदेशातून परत येताच वाजत गाजत पक्ष कार्यालयात आलेल्या भूजबळांना अटक होणार नाही असे वाटत असताना त्यांची रवानगी ऑर्थर रोड जेलमध्ये झाली आणि आता कोणाचा नंबर? अशी विचारणा सुरु झाली पण काहीही न बोलता, स्मित हास्य करत ‘ते’ आपल्याच खेळात मग्न राहीले…
राजकीय डावपेचात कमालीची गती असणाऱ्या शरद पवार यांच्यासारख्या नेत्याला राज्यात फडणवीसांचे सरकार आहे, असा शब्दप्रयोग वारंवार करावा वाटू लागला तसे बुध्दीबळाच्या सारीपाटावर आणखी एक खेळी खेळली गेली. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभा दिली गेली. तेव्हा पवार म्हणून गेले, ‘पूर्वी फडणवीसांची नेमणूक छत्रपती करायचे, आता फडणवीस छत्रपतींची नेमणूक करत असतील तर आनंद आहे…’ या एका विधानात पवारांच्या मनातील खदखद लख्खपणे राज्यासमोर आली. मात्र आम्ही फक्त लखोटा पोहोचविण्याचे काम केले असे म्हणत सारीपाटावर एक प्यादे हलकेच कधी पुढे सरकले हे कोणाला कळाले देखील नाही…
बुध्दीबळाच्या खेळाला पहाता पहाता वर्ष लोटले. अचानक तुफान राजकीय वादळ आले. एकनाथ खडसे नावाच्या जुन्या जाणत्या बिनधास्त राजकारण्याला सत्तेबाहेर घेऊन वादळ निघून गेले… पण बुध्दीबळाच्या सारीपाटावरील राजा एक घरही जागचा हलला नाही. राजकीय तुफानी वादळ मात्र शांत होताना अनेकांच्या तंबूतील बांबूही हलवून गेले… मंत्रीमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील यांच्याकडील सहकार खाते काढून त्यांना महसूल मिळाले. ही चाल नेमकी कोणती याचा दादांना अजूनही अर्थ लागलेला नसताना त्याच खातेबदलात पंकजा मुंडेंच्या खात्यावर संक्रांत आली. आम्ही पंकूताईचे कार्यकर्ते आहोत असे म्हणणाऱ्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीगत नालस्ती करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयातून सुरु केल्या. पुन्हा एकदा राजकीय वादळ तापले. पण यावेळी ते पडद्याआडूनच आले. राजनीती निर्दयता से करनी चाहिये… असे अमीत शहा बोलल्याचे दाखले काहींनी देणे सुरु केले. अचानक पंकजा मुंडेंनीही शस्त्र म्यान केली… फडणवीसांचे सरकार असा उल्लेख होणाऱ्या ‘त्यांच्या’ कारभारात आता महादेव जानकर, सदाभाऊ खोत खांद्याला खांदा लावून उभे राहीले तर दिल्लीच्या तख्तास रामदास आठवलेंचा हात लागला…
हळूहळू ते बिनधास्त होत गेले. आता त्याला चार वर्षे होत आली. या काळात अनेक निर्णय त्यांनी घेतले. मात्र काही बाबतीत ते काँग्रेस सारखे वागू लागल्याचे आक्षेप होऊ लागले. काँग्रेसच्या कार्यकाळात नाही का, तीन चार मंत्रीपदं रिकामी ठेवायची, काही महामंडळाच्या नियुक्त्या रखडवत ठेवायच्या आणि कार्यकर्त्यांना झुंजवत ठेवायचे. तसे बुध्दीबळाच्या या राजाकडूनही होऊ लागले. कारण बुध्दीबळाच्या सारीपाटावर आता त्यांचा हात बसलाय. कोणतीही चाल, कशीही खेळली तरी माघार घेण्याची वेळ समोरच्याच खेळाडूवर कशी येईल याचे कसब आता ‘त्यांना’ पक्के आत्मसात झाले आहे. बुध्दीबळाच्या सारीपाटावर आजतरी विरोधातही फारश्या चाली उरलेल्या नाहीत…
बुध्दीबळाच्या खेळाला पहाता पहाता वर्ष लोटले. अचानक तुफान राजकीय वादळ आले. एकनाथ खडसे नावाच्या जुन्या जाणत्या बिनधास्त राजकारण्याला सत्तेबाहेर घेऊन वादळ निघून गेले… पण बुध्दीबळाच्या सारीपाटावरील राजा एक घरही जागचा हलला नाही. राजकीय तुफानी वादळ मात्र शांत होताना अनेकांच्या तंबूतील बांबूही हलवून गेले… मंत्रीमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील यांच्याकडील सहकार खाते काढून त्यांना महसूल मिळाले. ही चाल नेमकी कोणती याचा दादांना अजूनही अर्थ लागलेला नसताना त्याच खातेबदलात पंकजा मुंडेंच्या खात्यावर संक्रांत आली. आम्ही पंकूताईचे कार्यकर्ते आहोत असे म्हणणाऱ्या अती उत्साही कार्यकर्त्यांनी पुतळे जाळण्याचा प्रयत्न केला. व्यक्तीगत नालस्ती करणाऱ्या पोस्ट सोशल मिडीयातून सुरु केल्या. पुन्हा एकदा राजकीय वादळ तापले. पण यावेळी ते पडद्याआडूनच आले. राजनीती निर्दयता से करनी चाहिये… असे अमीत शहा बोलल्याचे दाखले काहींनी देणे सुरु केले. अचानक पंकजा मुंडेंनीही शस्त्र म्यान केली… फडणवीसांचे सरकार असा उल्लेख होणाऱ्या ‘त्यांच्या’ कारभारात आता महादेव जानकर, सदाभाऊ खोत खांद्याला खांदा लावून उभे राहीले तर दिल्लीच्या तख्तास रामदास आठवलेंचा हात लागला…
नाही म्हणायला भाजपेतर चेहरे पक्षात प्रभावी होऊ लागले. काही कार्यकर्ते, नेते भाजपाशी निष्ठावंत असले तरी ते निवडणूक जिंकून देऊ शकत नाहीत, त्यासाठी एक वृत्ती लागते, ती वृत्ती असणारे चेहरे जवळ आले. युध्द करायचे तर दाणापाणी लागणारच. सैन्य शेवटी पोटावरच चालते आणि पोटासाठी जे हवे ते देणारी माणसं कधी कधी निष्ठावंत नसली तरी गरजेची असतात हे गणित बुध्दीबळाच्या राजाला जमले आहे. म्हणूनच तर त्याची पावले आता कधी कधी मळलेल्या वाटावरुनही जातात मात्र मूळ वाट ते कधीही सोडत नाहीत. ती वाट त्याने मजबूतपणे धरुन ठेवलीय…
प्रशासन घोड्यासारखे असते. घोड्यावर मजबूत मांड ठोकणारा आहे की नाही हे घोड्याला बरोबर समजते. आपल्यावर मांड ठोकून बसलेले थोडा जरी कमकुवत आहे असे वाटले तर घोडा उधळायला वेळ लागत नाही. हे त्याला बरोबर समजले आहे. म्हणूनच राज्याच्या माजी पोलिस महासंचालकांनी काही अधिकाऱ्यांना अमूक अमूक पोस्टींग देतो म्हणून आश्वस्त केल्याचे समजतात, या राजाने काहीही न बोलता ते पोलिस महासंचालक घरी जाईपर्यंत शांत बसणे पसंत केले. काहींना हा शांतपणा चुकीचा वाटतो तर काहींना चांगला… अर्थात राजा कसाही वागला तरी अर्थ तर लोक काढतातच… मात्र राजाची मांड पक्की आहे कारण कोणी आता या राजाला गृहीत धरत नाही…!
२४ तास राज्याच्या भल्याचा विचार करणारा मुख्यमंत्री या राज्याला मिळालाय. फार पूर्वी, मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याआधी देवेंद्र फडणवीस या सुहृदयी मित्राला एक मेसेज पाठवला होता, तो असा – ‘‘आपल्यासारख्या चांगल्या, सत्तशिल माणसांची महाराष्ट्राला गरज आहे. आपल्याला राज्यात यशस्वी व्हावेच लागेल. जर आपण अपयशी ठरलात तर लोकांचा आपल्यावरचा नाही तर चांगूलपणावरचा विश्वास उडून जाईल. तो विश्वास जपण्याची मोठी जबाबदारी आपल्यावर आहे….’’ त्याला त्यांनी काही उत्तर दिले नाही पण आज चार वर्षानंतर त्यांनी आपल्या वागण्यातून, कृतीतून तो विश्वास जपलाच नाही तर वृध्दींगतही केलाय…. आपल्याला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा..!
– अतुल कुलकर्णी
वरिष्ठ सहायक संपादक, लोकमत
Comments