जीव वाचविणारे इन्क्युबेटरच ठरले चिमुकल्यांसाठी जीवघेणे
प्राथमिक पाहणी अहवाल मंत्रालयात सादर
अतुल कुलकर्णी / लोकमत
मुंबई : भंडारा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दहा चिमुकली नवजात मुलं सदोष इनक्यूबेटरमुळे दगावल्याचा प्राथमिक पाहणी अहवाल समोर आला आहे. सदर आग शॉर्ट सर्किटमुळे लागलेली नव्हती. इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित न झाल्यामुळे त्याचा स्फोट झाला आणि त्यात ही दुर्दैवी घटना घडली असे समोर आले आहे. हा अहवाल आज मंत्रालयात सादर करण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम विद्युत विभागाने प्राथमिक पाहणी अहवाल तयार केला आहे. त्यात पहिल्या इनक्यूबेटरचा जो स्फोट झाला त्याची लावलेली थ्री पिन, वायर, ज्या स्विच वर लावण्यात आली होती, ते स्वीच, त्याची वायरिंग असलेले पाईप जळालेले निदर्शनास आले नाहीत, असे म्हटले आहे. त्याच्या पुष्ट्यर्थ त्याचे फोटो देखील विद्युत विभागाने अहवालासोबत जोडले आहेत. मंत्रालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या इनक्यूबेटर चे तापमान नियंत्रित झाले नाही. त्यामुळे त्याचा स्फोट झाला. त्या स्फोटामुळे त्या इन्क्युबेटरच्या ठिकर्या झाल्या. त्यातील लहान शिशुचे अवयव देखील हाती आले नाहीत, हे सांगताना संबंधित अधिकारीही आपल्या भावना रोखू शकले नाहीत. त्या स्फोटामुळे खोलीमध्ये धूर पसरला. दरवाजा बाहेरून बंद होता. तो उघडला गेला नाही आणि धुरामुळे बाकीची बालके दगावली, असेही संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चौकशी समिती नेमली आहे. त्यातून आणखी बाबी समोर येतील. मात्र प्राथमिक पाहणी अहवालाने इनक्यूबेटर खरेदीचे वास्तव समोर आणले आहे.
संबंधित रूमची वातानुकुलित यंत्रणा बंद पडली, त्यात स्फोट झाले, अशी चर्चा सुरू होती. त्यावर संबंधित अधिकाऱ्याने सांगितले, थंडीचे वातावरण असल्यामुळे नवजात शिशु करता वॉर्मर चालू केले होते. गेल्या तीन महिन्यापासून वातानुकूलन यंत्रणा बंद ठेवण्यात आली होती. एसीचा वीज पुरवठा एमसीबी बोर्डामधून खंडित करण्यात आला होता. मात्र तपासणीमध्ये वातानुकूलन यंत्रे जळालेली आढळून आली आहेत. ही यंत्रे बंद असल्यामुळे वातानुकूलन यंत्रामध्ये झालेल्या बिघाडामुळे आग लागली नाही असेही प्राथमिक अहवालात म्हंटले आहे.
सुरक्षेच्या दृष्टिकोनातून बसवण्यात येणारी विद्युत यंत्रणा याठिकाणी होती. ही घटना घडली तेव्हा ती यंत्रणा ट्रिप झाल्याचे आढळून आले. मुख्य पॅनल मधील यंत्रणा ट्रिप झाली याचा अर्थ विद्युत संच मांडणीमध्ये दोष नव्हते असेही हा अहवाल म्हणतो. शिवाय इन्क्युबेटरला जोडण्यात येणारी वायर, स्विचेस, वायरिंगचे पाईप जळालेले नव्हते. याचा अर्थ इन्क्युबेटरचे तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा बिघडली आणि त्याचा स्फोट झाला व दुर्दैवी घटना घडली असावी असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले. भंडाऱ्याच्या हॉस्पिटलला जे इनक्यूबेटर देण्यात आले होते, ते कोणत्या वर्षी खरेदी केले होते? कोणत्या कंपनीकडून घेतले होते? आणि ही खरेदीची प्रक्रिया कोणत्या अधिकाऱ्यांनी राबवली? याचा शोध घेणे गरजेचे बनले आहे. चौकशी समितीने याचाही शोध घेतला पाहिजे असे संबंधित अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
Comments