शनिवार, २३ नोव्हेंबर २०२४
23 November 2024

बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘त्या’ सिंहासनाचा अनोखा प्रवास..!

अतुल कुलकर्णी
२६ ऑगस्ट २००६. पंधरा वर्षांपूर्वीची ही गोष्ट. शनिवारचा दिवस होता. साधारणपणे कोणत्याही दैनिकाच्या कार्यालयात दुपारी एक ते दीड या वेळात जे वातावरण असते तेच लोकमतच्या मुंबईतील चिंचपोकळी कार्यालयात होते. गणेशोत्सवाच्या आधीचा दिवस. सगळ्यांचा सुट्टीचा मूड. तेवढ्यात एका पत्रकाराचा फोन आला. शिवसेनेचा मोर्चा येतोय लोकमतवर… सोबत बाळासाहेब ठाकरे यांचे सिंहासन आहे… क्षणभर विचारात पडलो. खात्री करून घेण्यासाठी एक दोन ठिकाणी फोन केले. बातमी खरी आहे हे कळतात तेव्हाचे संपादक आणि आत्ताचे सल्लागार संपादक दिनकर रायकर यांना फोन केला. ते औरंगाबादला बैठकीसाठी गेले होते. इतक्या वर्षाच्या अनुभवातून आलेल्या सहजपणातून ते म्हणाले, ‘ठीक आहे, मी बघतो, फोन करतो ‘मातोश्री’वर…’ त्यानंतर दहा-पंधरा मिनिटे अशीच गेली. दरम्यान ‘लोकमत’चे तेंव्हाचे सरव्यवस्थापक तुषार श्रोत्री यांनी उद्धव ठाकरे यांच्या पीए ला फोन केला. ते ठाण्यात होते. त्यांनी तसे काही नाही असे सांगितले. ‘सामना’चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांचा फोन नो रिस्पॉन्स येत होता. पुन्हा रायकरांशी बोललो, ते म्हणाले ‘जर सिंहासन मातोश्रीवरून निघाले असेल, तर ते कसे थांबवणार..?’ हे बोलणे होऊन फोन ठेवतो न ठेवतो तोच ऑपरेटरने निरोप दिला, बाहेर काही शिवसैनिक आले आहेत… किती जण आहेत असे विचारल्यावर पाच-सहा जण आहेत असे उत्तर आले… त्यावेळी पूर्ण ऑफिसमध्ये मी, ऑपरेटर, सेक्युरिटी गार्ड आणि दोन कर्मचारी तेवढेच लोक होतो… त्यातील दोघा-तिघांना आत बोलावून घेतले. त्यात एक सूर्यकांत महाडिक होते. कणखर पण सुसंस्कृत नेता. शांतपणे ते आत आले, बसून म्हणाले, साहेबांचा आदेश आहे… सिंहासन आणलंय… ते ठेवून घ्या, आणि आम्हाला रिसीव्हड म्हणून सही द्या… मी म्हणालो, हा माझ्या अधिकारातला भाग नाही. आपण दहा पंधरा मिनिटे बसा, चहा घ्या, मी संपादकांशी बोलून सांगतो… ठीक आहे म्हणत पुन्हा ते बाहेर रिसेप्शनमध्ये जाऊन बसले…

मी पुन्हा रायकरजींना फोन केला. सिंहासन, महाडिक व पाच-सहा शिवसैनिक आले आहेत, असे सांगितले. त्यावर ते तात्काळ म्हणाले, ते बाळासाहेबांचे सिंहासन आहे. त्याचा अनादर झाला नाही पाहिजे… तेवढ्यात पुन्हा महाडिक आत आले. मी फोनवर बोलतोय, बाळासाहेबांच्या स्वाक्षरीचे पत्र वाचून दाखवतोय, हे पाहून त्यांच्यासोबत आलेल्या छायाचित्रकारांनी फोटो काढणे सुरू केले… अत्यंत टपोऱ्या हस्ताक्षरातील त्या पत्राचा मजकूर तीन चार ओळींचा होता… भाषा अत्यन्त संयमी…


बोलल्या प्रमाणे व आपण छापल्या प्रमाणे मी माझे ‘चांदीचे सिंहासन’ आपल्या कडे रवाना करीत आहे. कृपया पोचपावती द्यावी.
आपला नम्र
आणि खाली लफ्फेदार सही
बाळ ठाकरे
(शिवसेना प्रमुख)

मुंबईत पत्रकारिता करताना असाही अनुभव आपल्याला येईल हे ध्यानीमनी तर नव्हतेच पण स्वप्नातही नव्हते… मी रायकरजींचे आणि महाडिक यांचे बोलणे करून दिले. त्यांनी आणलेल्या पत्राच्या झेरॉक्स प्रतीवर कोपऱ्यात मी रिसिव्हड म्हणून सही करून दिली… त्यावर शिक्का मारून द्या, अशी त्यातील एकाने मागणी केली. शिक्का ही उमटवला… तर पत्र खाली येऊन सिंहासनाजवळ द्या, आणि सिंहासन ताब्यात द्या, अशी गळ महाडिकांनीं घातली. मी खाली गेलो, पत्र दिले, पुन्हा त्यांनी फोटो काढले, आणि पाच मिनिटात सगळेजण निघूनही गेले…

त्यांच्या सोबत सामना दैनिकाचा छायाचित्रकार होता. तो पुन्हा वरती आला, आणि त्याने मला विचारले सिंहासन खाली ठेवणार की वरती नेणार? मी म्हणालो, ते बाळासाहेबांचे सिंहासन आहे. असे खाली कसे ठेवणार..? तो हसला, आणि निघून गेला… नंतर पाच सहा जणांनी ते सिंहासन उचलून वरती आणले. लोकमतच्या मुख्य दरवाजातून ते आत येईना… कारपेंटरला बोलावले. दरवाजा बाजूला काढला, सिंहासन आत घेतले… एवढे सगळे होईपर्यंत मीडियामध्ये ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. कॅमेरामन, पत्रकार, फोटोग्राफर सगळ्यांची गर्दी लोकमत कार्यालयात होऊ लागली. काही वेळात आग्रीपाडा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी देखील आले. आल्याबरोबर वरिष्ठ पोलीस निरीक्षक पाटील यांनी सोबतच्या लोकांना पोझिशन दिल्या. गर्दी वाढू लागली. सगळ्यांनी पप्रश्नांचा भडिमार सुरू केला… किती शिवसैनिक होते..? काय म्हणाले..? घोषणा काय दिल्या..? पत्र काय दिले..? इथे तर घोषणाबाजी झालीच नव्हती… पाच-सहा जण शांतपणे आले… चहा घेतला… सिंहासन दिले… रिसिव्हड म्हणून सोबतच्या पत्रावर सही घेतली… आणि निघून गेले… बाळासाहेबांच्या स्वाक्षरीचे पत्र दाखवले तर त्यातील भाषा पाहून अनेकांचा विश्वास बसेना… कदाचित त्या सार्‍यांना शिवसेना या नावाभोवती जोडल्या गेलेल्या आक्रमकतेची उणीव भासत असावी…

एकदा एक भूमिका पक्की केली की त्यावरून हटणार नाही, आणि दिलेल्या शब्दाला जागण्याची ठाम भावना, त्यातून बाळासाहेबांनी ते सिंहासन पाठवून दिले होते. आलेल्या पोलीस इन्स्पेक्टर पाटील यांनी स्वतःच्या मोबाईलने त्या सिंहासनाचा फोटो काढला… तर ते दृश्य आपल्या कॅमेऱ्यात एक चैनलवाला टिपत होता… त्यांच्यात नव्हे तर लाखो शिवसैनिकांच्या मनात, त्या स्नेहाबद्दलची भावना एका कृतीतून समोर आली…

सायंकाळी लगेचच लोकमतच्या व्यवस्थापनाने ते सिंहासन बाळासाहेबांना सन्मानपूर्वक परत करण्याचा निर्णय घेतला होता…! दिवसभराचे काम, गडबड संपून रात्री घरी निघताना त्या सिंहासनाकडे नजर गेली… वाटले क्षणात बाळासाहेबांचा तोच आवाज येईल… कणखरपणे… “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो, आणि भगिनींनो…” त्या नुसत्या कल्पनेनेही अंगावर रोमांच उभे राहिले… शेवटी ते सिंहासन चांदीचे की लाकडाचे हा प्रश्न बाळासाहेबांनी घेतलेल्या भूमिकेमुळे अगदीच केविलवाणा झाला होता…. साईबाबांच्या सोन्याच्या सिंहासनासाठी कशाला हवी पैशांची उधळपट्टी ही भूमिका न पटण्याचे कोणालाही काही कारण नव्हते…. त्यातून बाळासाहेबांच्या सिंहासनाचा चांदी किंवा लाकडाचा मुद्दा गौण ठरला होता… सिंहासनाच्या सभोवती लाखो शिवसैनिकांच्या प्रेमाची आभा मला जाणवत होती… ती नाकारण्याचा अधिकार खुद्द बाळासाहेबांनाही नव्हता…
तेथे बाळासाहेबांविना सिंहासन… त्याचे काय मोल…? त्यांच्या स्पर्शाने त्याचे अस्तित्व होते… आणि त्याला अनेकांच्या प्रेमाचे पाय लागले होते… बाळासाहेबांनी देखील पाठवले ते निर्जीव सिंहासन… त्या सिंहासनावरचा आत्मा मात्र तेथे मातोश्री पाय घट्ट रोऊन उभा होता…

२९ ऑगस्ट २००६. सिंहासन बाळासाहेबांना मातोश्रीवर सन्मानपूर्वक परत नेऊन देण्याचा दिवस… लोकमतचे चेअरमन विजयबाबू दर्डा आणि संपूर्ण लोकमतची टीम सिंहासन घेऊन मातोश्रीकडे रवाना झाली… गाड्यांच्या मागेपुढे कॅमेरामनची गर्दी… वेगवेगळ्या चॅनलचे लोक तो सगळा माहोल कव्हर करत होते… आम्ही मातोश्रीवर गेलो…

हा सगळा प्रकार घडला कशामुळे असा प्रश्न आता १५ वर्षांनी तुम्हाला पडणे स्वाभाविक आहे. शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण सिंहासन तयार करण्यासाठी पाऊण कोटी रुपये जमा केल्याची बातमी १९ ऑगस्ट २००६ रोजी लोकमतने प्रसिद्ध केली होती. त्यानंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिर्डीच्या साईबाबांना सुवर्ण सिंहासन देण्यास विरोध केला होता. सुवर्ण सिंहासनासाठी जमवलेले २२ कोटी रुपये लोककल्याणासाठी वापरा, अशी ठाम भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतली होती. त्या विरोधाचीही बातमी २१ ऑगस्ट २००६ लोकमतमध्ये प्रकाशित झाली.

सिंहासनावरून दोन गट पडल्याचे चित्र तयार झाले. एक गट सिंहासन हवे म्हणणारा होता, तर दुसरा नको म्हणणारा… त्यात बाळासाहेबांची भूमिका रास्त होती. ९ एप्रिल २००२ रोजी शिर्डीमध्ये भारतीय कामगार सेनेचे महाशिबीर झाले होते. त्या शिबिरात शिवसेनाप्रमुखांना चांदीचे सिंहासन देण्यात आले होते. ‘साईबाबांना सोन्याचे सिंहासन नको’ ही बाळासाहेब ठाकरे यांची सामाजिक हिताची भूमिका लोकमत’ने पहिल्या पानावर छापली होती. त्यावर राज्यभरातून प्रतिक्रियाही उमटल्या होत्या. मात्र काही साई भक्तांनी भक्तांनी २००२ साली देण्यात आलेल्या व बाळासाहेबांनी स्वीकारलेल्या चांदीच्या सिंहासनाचा फोटो लोकमतला पाठवला, आणि साईबाबांना सिंहासन नाही मग बाळासाहेबांना का? असा आमचा सवाल, तुम्ही लोकमटमधून मांडावा, अशी विनंती अनेक भक्तांनी त्यावेळी केली होती. त्यामुळे ‘दुसरी बाजू’ म्हणून लोकमत’ने या सिंहासनाचा फोटो आणि बातमी पहिल्या पानावर २२ ऑगस्ट २००६ रोजी प्रसिद्ध केली. त्यावेळी तो फोटो अहमदनगर आवृत्तीचे प्रमुख नंदकुमार पाटील यांनी पाठवला होता. नंदकुमार पाटील यांनी त्याचे शिर्डीतील मित्र नितीन कोते नावाच्या नगरसेवकाच्या बैठकीतील ‘तो’ फोटो काढून ( कॅप्शनसह) लोकमतला पाठवला. तो पान एकवर प्रसिद्ध झाला अन् पुढचे रामायण घडले….

“साईबाबांना सोन्याचे सिंहासन नको, पण बाळासाहेब, तुमच्या चांदीच्या सिंहासनाचे काय.?” असा प्रश्न या वृत्तात विचारण्यात आला होता. बातमी छापून आल्यानंतर २३ ऑगस्ट २००६ रोजी बाळासाहेब ठाकरे यांनी, “मला दिलेले सिंहासन चांदीचे नसून त्याला केवळ चांदीचा मुलामा दिलेला आहे,” अशी भूमिका मांडली. शिवाय “हवे तर हे सिंहासन तुम्हाला पाठवून देतो” असे त्यांनी लोकमत’ला उद्देशून सांगितले.

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी ज्येष्ठ पत्रकार मुंबई लोकमतचे तेव्हाचे संपादक दिनकर रायकर यांना फोन करून सांगितले होते, “शिर्डीच्या महाशिबिरात शिवसैनिकांनी मला ते सिंहासन दिले. आतून सारे लाकूड, वरतून चांदीचा मुलामा ठोकलेला पत्रा… तो वारंवार निघतो आणि हाताला लागतो, म्हणून मी त्यावर आच्छादन घालून बसतो. शेवटी माझ्या गोरगरीब शिवसैनिकांनी मोठ्या प्रेमाने ते मला भेट दिले आहे. पण शिर्डीतील कोट्यवधी रुपयांचे सिंहासन रोखण्याचा मोठा विचार मी मांडला, त्यात हे चांदीचे सिंहासन आडवे येत असेल, तर पाठवून देतो तुमच्याकडे… मी स्वतः व्यवस्था करून ते तुमच्या पर्यंत पोहोचवतो… त्यावर शिपाई बसवला तरी चालेल…”

ही घटना सुरू असताना २५ ऑगस्ट २००६ रोजी शिर्डीच्या साईबाबा संस्थानने साईबाबांना सोन्याचे सिंहासन घडवण्याचा निर्णय रद्द केला… त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे २६ ऑगस्ट २००६ रोजी शिवसेनाप्रमुखांनी आपला शब्द खरा करत त्यांना मिळालेले सिंहासन लोकमत’ला मुंबईच्या कार्यालयात पाठवून दिले… आणि वरती सांगितलेले सगळे नाट्य घडले. आता तुम्हाला प्रश्न पडेल ते सिंहासन बाळासाहेबांना परत पाठवले का…?

लोकमत व्यवस्थापनाने ते सिंहासन पुन्हा मातोश्री’वर बाळासाहेबांना सन्मानपूर्वक देण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देशभर सिंहासनपर्वाने खळबळ उडाली होती. २९ ऑगस्ट२००६ रोजी लोकमत समूहाचे चेअरमन विजयबाबू दर्डा, संचालक करण दर्डा, दिनकर रायकर हे सगळे सिंहासन घेऊन मातोश्री कडे निघाले. त्यावेळी लोकमत मुंबईचे तत्कालीन कार्यकारी संपादक विवेक गिरधारी, व्यवस्थापक तुषार श्रोत्री आणि सिंहासन स्वीकारणारा मीदेखील त्यावेळी मातोश्रीवर गेलो…

बाळासाहेब मातोश्री मधून स्वतः बाहेर आले. सिंहासनाकडे पहात त्यांनी फोटोही काढले. त्यावेळी ते म्हणाले होते, लोकमतची माझा कोणताही वाद नाही. मी सिंहासनाचा प्रेमाने स्वीकार करत आहे. आता हे सिंहासन मी जयदेवला देणार आहे… विशेष म्हणजे लोकमतने, सिंहासन परत देताना एक पत्र बाळासाहेबांना दिले. त्या पत्रावर “आभारी आहे, आपला नम्र,” असे म्हणत त्यांनी लफ्फेदार सही देखील केली.

मातोश्री’वर दुपारी एक वाजता हा सिंहासन सोहळा टिपण्यासाठी देशभरातल्या दूरचित्रवाहिन्याची प्रचंड गर्दी झाली होती. बाळासाहेबांनी जयदेव ठाकरे यांचे नाव कसे घेतले? असा प्रश्न त्यावेळी प्रत्येकाला पडला. त्याचेही उत्तर शिवसेनाप्रमुखांनी दिले. ते म्हणाले होते, “जयदेवनेच हे सिंहासन मला मागितले. तो ते स्वच्छ करून जपून ठेवेल. त्यावर तो बसणार नाही, आणि कोणालाही बसू देणार नाही,” असे त्याने मला सांगितले आहे.

उपस्थित काही पत्रकारांनी बाळासाहेबांना सवाल केला होता, “तुम्ही तुमचे राजकीय सिंहासन तर उद्धव ठाकरे यांना दिले आहे मग हे सिंहासन जयदेव यांना कसे..?”
त्यावर हसतहसत बाळासाहेब म्हणाले होते, “आमच्याकडे सिंहासनाचे वाद नाहीत. मी स्वतः खुर्चीचा हव्यास कधी धरला नाही… मी या सिंहासनाचा स्वीकार केला आहे. पण त्यावर बसणार मात्र नाही. ते जयदेवने मागितले आहे. त्याला देईन. आमच्याकडे सिंहासन हा काही वादाचा मुद्दा नाही. मी ज्यावर बसतो ते सिंहासन… माझ्याकडे आणखी एक सिंहासन आहे… बायको नाही, नाहीतर हे आणि ते शेजारी शेजारी ठेवून दोघेही बसलो असतो… म्हणून हे आता जयदेवला देईन… माझ्याकडे जे आहे ते मला उद्धव-रश्मीने वाढदिवसाची भेट म्हणून दिलेले आहे… त्याचाही पत्रा निघतो, आणि हाताला लागतो… कारपेंटरला बोलवलं आहे… तो या सिंहासनाचा पत्रा काढून लाकडाचे पॉलिश करेल, म्हणजे ते चांगले दिसेल….”

असे होते बाळासाहेबांचे व्यक्तिमत्त्व…!! बिनधास्त, स्पष्टवक्तेपणा आणि कोणताही आडपडदा न ठेवता, जे मनात आहे ते बोलून दाखवायची वृत्ती त्यांनी आजन्म जपली. सिंहासन पर्वाच्या निमित्ताने मला बाळासाहेबांना खूप जवळून ऐकता आले, पाहता आले… आणि त्यांनी सिंहासन लोकमतला जेव्हा पाठवले, त्यावेळी त्यांच्या हस्ताक्षरातील त्या पत्रावर मला रिसिव्हड म्हणून सही करता आली… माझ्यासाठी माझ्या पत्रकारितेच्या आयुष्यातला एक अतिशय संवेदनशील आणि कायम स्मरणात राहणारा प्रसंग आहे… पंधरा वर्षांनंतरही आज मला ती घटना काल घडल्यासारखी स्पष्ट आठवते… बाळासाहेबांच्या ९५ व्या जयंती दिनानिमित्त माझे विनम्र अभिवादन..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *