कोरोना झाल्यास लहान मुलांसाठी निश्चितच औषधेच नाहीत
सणावारापेक्षा आजाराचे स्वरूप बघून शाळा सुरू कराव्यात
टास्क फोर्स चे अध्यक्ष डॉक्टर संजय ओक यांची मुलाखत
अतुल कुलकर्णी / लोकमत
मुंबई : कोरोना बाधित लहान मुलांमध्ये हृदय, मूत्रपिंड, फुप्फुस आणि यकृत या चार ठिकाणी सूज येण्याचे प्रमाण दिसून येत आहे. कोरोना आणि डेल्टा प्लस विषाणूमुळे अशी लक्षणे असणारी मुले संखेने जास्त नसली, तरी गेल्या सहा ते आठ आठवड्यात बऱ्यापैकी समोर आली आहेत. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले. सुदैवाने त्यातील एकही मूल दगावले नाही. मोठ्या माणसांसाठी जी औषध वापरली ती आपण लहान मुलांसाठी वापरू शकत नाही. अशा मुलांना औषध उपचाराची नेमकी पद्धती जगासमोर आलेली नाही. त्यामुळेच आपण शाळा सुरू करण्याआधी दहा वेळा विचार करून आम्ही आमची मतं देत आहोत, अशी माहिती महाराष्ट्र टास्ट फोर्सचे अध्यक्ष डॉ. संजय ओक यांनी लोकमतशी बोलताना दिली.
गणपती नंतर, दिवाळीनंतर शाळा सुरू करणे किंवा सणावाराची शाळांचे वेळापत्रक जोडणे योग्य होणार नाही. रुग्णांची संख्या आणि मुलांमध्ये त्याचे होणारे परिणाम वैद्यकीय गणित मांडूनच ठरवावे लागतील. म्हणून टास्क फोर्सने सातत्याने याविषयी स्पष्ट भूमिका घेतल्याचे डॉ. ओक म्हणाले. शाळा सुरु करण्यास टास्क फोर्सचा विरोध आहे, अशा चर्चा सुरू असताना हाच प्रश्न थेट टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. ओक यांना विचारला, तेव्हा त्यांनी या विषयीची माहिती दिली. लहान मुलांसाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुहास प्रभू आणि आमच्या टास्क फोर्सच्या सातत्याने बैठका झाल्या. अनेक निष्कर्ष तपासून पाहिले गेले. त्यानंतरच आम्ही सरकारला आमची निरिक्षणे कळवली आहेत. ती पूर्णपणे वैद्यक शास्त्रावर आधारित आहेत. कोणाला काय वाटते यावर नाहीत. असे सांगून
डॉ. ओक म्हणाले, लहान मुलाने सतत किरकिर करणे, सतत रडत राहणे, जेवायला नकार देणे, डायरिया, सर्दी-पडसे, नाक चोंदणे, खोकला किंवा ताप येणे, ही साधारणपणे लहान मुलांमध्ये कोरोनाची मूलभूत लक्षणे आहेत. वातावरणात होणाऱ्या बदलामुळे लहान मुलांमध्ये अशी लक्षणे दिसतात. मात्र पालकांनी घाबरून न जाता अशी लक्षणे जर दोन ते तीन दिवस मुलाच्या अंगात सतत दिसू लागली, तर त्याची कोविड तपासणी करणे आवश्यक आहे. झाएडस कॅडीलाची नवी लस वापरण्यासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. ही लस लहान मुलांसाठी उपयोगी ठरणारी आहे. तसे निष्कर्ष पुढे आले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर ही लस लहान मुलांना उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लहान मुलांमध्ये एकाला जर लागण झाली तर ती वर्गात अनेकांना होऊ शकते. लहान मुले मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे याविषयी फारशी जागरूक नसतात. त्यांना डेल्टा प्लस या विषाणूची देखील भिती आहे. डॉ. सुहास प्रभू यांच्या समितीने अतिशय अभ्यासपूर्ण असे पेपर्स तयार केले आहेत. रेमेडीसिविर, टोसिलिझुमॅब, प्लाझा अशा गोष्टी आपण मोठ्यांसाठी वापरल्या. त्या मुलांसाठी वापरता येणार नाहीत. त्यामुळे लहान मुलांना जर कोविडची बाधा झाली, तर आपल्या हातात अत्यंत मर्यादित औषधे उपलब्ध आहेत. त्यामुळेच मुलांच्या बाबतीत निर्णय घेताना अत्यंत काळजी घ्यावी लागत आहे असेही डॉ. ओक यांनी स्पष्ट केले.
तुम्हाला जर सगळ्यात चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करायची असेल तर, तुम्ही त्या व्यक्तीला तो आजार प्रत्यक्ष सौम्य स्वरूपात झाल्याची भावना, त्याच्या शरीरात निर्माण केली पाहिजे. जेणेकरून त्याचे शरीर त्या आजाराला प्रतिसाद देऊ लागते, आणि त्याच्या शरीरात अँटीबॉडीज तयार होऊ लागतात. यासाठी वैद्यकीय शास्त्रात जे करावे लागते त्या पद्धतीची रचना झायडस कॅडीलाच्या व्हॅक्सिनमध्ये तयार करण्यात आली आहे, असे सांगून डॉ. संजय ओक म्हणाले, हे व्हॅक्सिन इंट्रा डरमल पद्धतीचे आहे. आपल्या त्वचेच्या आवरणावर हे व्हॅक्सीन विशिष्ट पद्धतीने दिले जाते. त्यामुळे हे व्हॅक्सिन विना इंजेक्शन दिले जाणार आहे. याचे मुलांसाठी चांगले परिणाम समोर आलेले आहेत असेही त्यांनी स्पष्ट केले.
बूस्टर डोस कधी घ्यायचा, किंवा एक डोस घेतलेल्याने दुसऱ्या कंपनीचा डोस घेणे योग्य आहे की नाही याविषयीचा म्हणावा तेवढा डेटा अजूनही उपलब्ध नाही. शरीरातल्या अँटीबॉडीज कमी होऊ लागल्या, तर बूस्टर डोस घ्यायचा आहे. मात्र अँटीबॉडीज स्वतः तपासून घ्यायच्या, आणि स्वतः बूस्टर डोसचा निर्णय घ्यायचा, असे जर आपण करू लागलो, तर आपला जीव आपण धोक्यात टाकू शकतो. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असे निर्णय घेऊ नये. आठ ते नऊ महिन्यानंतर बूस्टर डोस विषयीची आणखी माहिती उपलब्ध होईल. त्यानंतरच याबाबतचे निर्णय घ्यावेत, असे डॉ. ओक म्हणाले.
(ही संपूर्ण मुलाखत लोकमत युट्युब आणि लोकमत फेसबुक वर उपलब्ध आहे)
Comments