मेरी आवाज ही पहचान है…;
सप्तसूर पोरके झाले…
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई – दाही दिशा, अष्टौप्रहर, तिन्ही बाजूंनी पाण्याने वेढलेल्या जगाच्या पल्याड, सात सूरांच्याही पलिकडे नेणारा एक सूर म्हणजे लता मंगेशकर. करोडो रसिकांनी निगुतीने ९२ वर्षे जपून ठेवलेला हा स्वर रविवारी परमात्याने स्वत:कडे नेला. निर्मळ मनाने गायलेल्या साडेतीन मिनिटांच्या गाण्याला ज्यांनी अजरामर केले, अंगाई गीतापासून पसायदानापर्यंत सर्व भावभावनांना आपल्या गायकीने एका सूत्रात बांधले असा भारतरत्न लता मंगेशकर नावाचा अजरामर इतिहास क्रूर काळाने मर्त्य मानवांच्या हातून हिसकावून नेला. कोरोनाचे निमित्त झाले आणि दीदींचे सूर आसमंत पोरका करून गेले. अनादी, आदिम असा हा सूर होता. ज्याने मानवी जीवनाचे समग्र, सर्वंकष दर्शन घडवले. भावभावनांचे असंख्य पदर दूर करत, निर्मळ सूख दिले. कधी मनाला हूरहूर लावणारे तर कधी हवेहवेसे वाटणारे हे जीवंत सूर आज घराघरातल्या प्रत्येकाला पोरके करून गेले.
गेले महिनाभर दीदी मुंबईतील ब्रीच कॅण्डी रुग्णालयात कोरोना, न्यूमोनिया यांच्याशी झुंज देत होत्या. अखेर रविवारी सकाळी ८ वाजून १२ मिनीटांनी त्यांनी आयुष्याची भैरवी पूर्ण केली त्याचवेळी जगाच्या पाठीवर प्रत्येक मिनिटाला कुठेना कुठे दीदींचा सूर निनादत होता… त्यांच्या पश्चात, आशा भोसले, मीना खडीकर, उषा मंगेशकर आणि हृदयनाथ मंगेशकर ही चार भावंडे आणि अगणित चाहता परिवार आहे.
लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झाल्याने ८ जानेवारी रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयातच त्यांना न्युमोनियाचे निदान झाले. तेव्हापासून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू होते. २२ जानेवारी रोजी त्या कोरोना आणि न्युमोनियामुक्त झाल्या. त्यांच्या प्रकृतीत बरीच सुधारणा होत होती. त्यामुळे व्हेंटिलेटर काढण्यात आले. पण त्यांचे वय लक्षात घेऊन आयसीयूमध्येच ठेवण्यात आले होते. शनिवारी त्यांची खालावल्याने त्यांना पुन्हा व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.
देशात दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर
लता मंगेशकर यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने दोन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला. या काळात सर्व शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रीय ध्वज अर्ध्यावर उतरवले जातील. कोणतेही शसकीय कार्यक्रम होणार नाहीत.
अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान आले
लता मंगेशकर यांच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले. त्यांनी त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. परिवारातील सदस्यांकडे आपल्या संवदेनाही त्यांनी व्यक्त केल्या.
आम्हा दोघीत साम्य होते तरी काय..?
माझी मते आणि तिची मते यात दोन टोकांचे अंतर आहे. मी बॉब करते. ती दोन वेण्या घालते. मी रुंद गळ्याचे ब्लाऊज घालते तर ती बंद गळ्याचे. ती सारखी पांढऱ्या रंगाचा पोशाख करते. तर मला गुलाबी रंग प्रिय. माझ्या तिच्या राहणीत, विचारात, फार फरक आहे. एवढेच काय, मी एकदम फटकळ, तर ती सगळे मनात ठेवणारी. ती बारीक सडसडीत, तर मी चांगली गरगरीत. ती नाजूक, सॅड गाणी गाते, तर मी सगळ्या ढंगांची गाणी गाते. ती म्हणते मी कलेसाठी जगते. मी म्हणते कला माझ्यासाठी आहे. सगळे म्हणतात, या दोघी जणी दोन डोळ्यांसारख्या आहेत. दोन डोळे शेजारी, भेट नाही संसारी. पण त्यांना हे माहिती नाही की या दोन्ही डोळ्यांना प्रकाशाची जाणीव देणाºया नसा एकच आहेत. म्हणून एका डोळ्यात काही गेले, तर दुसऱ्याच्या डोळ्यातून आपोआप पाणी येते…
– आशा भोसले
हिंदी आणि मराठीसह देश विदेशातील सुमारे ३६ भाषांमध्ये हजारो गाणी गायलेल्या लता मंगशेकर यांचा जन्म २८ सप्टेंबर, १९२९ रोजी मध्य प्रदेशातील इंदोर येथे झाला. मास्टर दीनानाथ मंगेशकर आणि शेवंती मंगेशकर यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. वयाच्या पाचव्या वषार्पासून त्यांनी संगीत नाटकात कामे केली. मा. दीनानाथ मंगेशकर यांच्या निधनानंतर, १९४२ मध्ये त्यांनी मा. विनायक यांच्या मार्गदर्शनाखाली सिनेमात काम करण्यास सुरुवात केली. पुढे त्यांनी पार्श्वगायनाच्या प्रातांत प्रवेश केला आणि तब्बल पाच दशके क्षेत्रावर अधिराज्य गाजवले.
Comments