सुप्रियाताई विरुद्ध सुनेत्राताई असा सामना झाला तर..?
अधून मधून / अतुल कुलकर्णी
प्रिय सुप्रियाताई,
नमस्कार.
लोकसभेच्या निवडणुकांचे वारे वेगाने वाहू लागले आहेत. आपल्याविरोधात कोण उभे राहणार, याची चर्चा जोरात आहे. गेल्या काही दिवसांपासून एक नाव वेगाने चर्चेत आले आहे. सुनेत्राताई पवार आपल्याविरोधात लोकसभेला उभ्या राहतील, असे सत्तेत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या गोटातून सांगितले जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ‘मास्टर स्ट्रोक’ मारण्याचे निश्चित केले आहे, असे त्यांच्या नजीकचे लोक सांगत आहेत. तर आपणच कसे निवडून याल, असे आपल्या पक्षाचे लोक सांगत आहेत.
आपल्या लोकसभा मतदारसंघात भोर वेल्हाचे आ. संग्राम थोपटे आणि पुरंदरचे आ. संजय जगताप या दोघांचे आणि अजितदादांचे सख्य अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे. तुमच्या राष्ट्रवादीत असताना अजितदादांनी या दोघांच्या निवडणुकीत किती आणि कसे प्रयत्न केले, हे देखील सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे या दोघांच्या मनात अजितदादांविषयी आणि आपल्याविषयी कोणत्या भावना आहेत, हे आपण चांगल्या पद्धतीने जाणता. या दोघांनी आपल्याला कायम लीड दिली आहे. ते दोघे आता आपल्यासोबत राहणार का? याची एकदा खात्री करून घ्या. हल्ली कोण, कोणासोबत, कधी आणि कुठे जाईल, याचा काही नेम नाही. इंदापूरमध्येही फार काही वेगळे नाही. अजितदादा आणि हर्षवर्धन पाटील यांचे सख्य उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ते किती मोकळेपणाने कोणाचा प्रचार करतील हा भाग एकीकडे आणि त्यांनी इंदापूरमध्ये धनगर समाजाविषयी व्यक्त केलेले विचार अजूनही लोक विसरलेले नाहीत. त्यातल्या त्यात दत्ता भरणे आता दादांसोबत असल्यामुळे ते सुनेत्राताईंचा जेवढा जोरदार प्रचार करतील, तेवढे बाकीचे मतदार आपल्या बाजूने येतील, असा दावा केला जात आहे. खरे-खोटे आम्हाला माहिती नाही.
राहुल कुल यांना राष्ट्रवादी पक्षातल्याच काही नेत्यांनी त्यावेळी पाडायचा प्रयत्न केला. त्यामुळे कंटाळून ते भाजपमध्ये गेले आणि आमदार झाले. ते आता कोणाला? कशी? व किती? मदत करणार, यावर दौंड मतदारसंघाचे मताधिक्य कोणाच्या बाजूने झुकणार हे महाराष्ट्राला कळेल. खडकवासला मतदारसंघ हा तसा पुण्याच्या जवळचा. त्यामुळे तिथे भाजपचे प्राबल्य राहिलेले आहे. भाजपचे आ. तापकीर आणि दादांचे संबंध कसे आहेत हे देखील या मतदारसंघाच्या निर्णयात परिणाम करणारे ठरेल. तसेही हा मतदारसंघ तुम्हाला कधीही जास्तीचे मताधिक्य देत नव्हताच. राहिला प्रश्न बारामतीचा. मोठ्या साहेबांनी श्रीनिवास पवारांचे चिरंजीव योगेंद्र पवार यांना दादांच्या विरोधात उतरवण्याचे योजले आहे, असे समजते. योगेंद्र पवार हल्ली आपण साहेबांसोबत आहोत, असे म्हणत बारामतीमध्ये ॲक्टिव्ह झाले आहेत. त्यांचा हा सक्रियपणा लोकसभेत प्रभावी ठरला तर विधानसभेच्या त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होऊ शकते.
असे चित्र असले तरी आपण ही निवडणूक सोपी समजू नये. शेवटी ते नात्याने जरी दादा असले तरी राजकारणातही दादा आहेत. ते काहीही करू शकतात. शिस्त, नियोजन, जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे. देशाचे पंतप्रधान मोदी साहेब, धुरंदर राजकारणी देवेंद्र फडणवीस दादांच्या बाजूने आहेत. दादांचे अनेक चांगले गुण आहेत. त्यातला एक म्हणजे, एकदा एखादा माणूस भेटला की, तो दादांच्या कायम लक्षात राहतो. आपल्या बाबतीत असे होत नाही, असेही लोक म्हणतात. आपण लोकांना भेटता खरे पण त्यांना लक्षात ठेवत जा. लोकांना ते बरे वाटते. मोठे साहेब गावागावात लोकांना पहिल्या नावाने हाक मारतात. हा त्यांचा बँक बॅलन्स आजपर्यंत कोणालाही पळवता आलेला नाही. जी चर्चा सुरू आहे ती आपल्याला सांगितली. आपल्या पहिल्या राज्यसभेच्या निवडीवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला पाठिंबा दिला आणि आपल्या विजयाचा मार्ग मोकळा केला. त्यावेळी बाळासाहेबांची आणि शरद पवारांची मैत्री उभ्या महाराष्ट्राने पाहिली. पवार साहेबांची अशीच मैत्री दिल्लीतही आहे. ती आयत्यावेळी काय करेल हे कोणास ठाऊक..? काही असो महाराष्ट्रात यावर्षी लोकसभेच्या निमित्ताने बारामतीत आगळीवेगळी लढाई बघायला मिळेल, हे नक्की. तुम्हाला आणि सुनेत्राताई यांनाही खूप खूप शुभेच्छा !
– आपलाच बाबूराव
Comments