लोकसभा निवडणूक २०२४ विशेष लेख: नणंद विरुद्ध भावजय आणि भाऊ-बहीण नेमके कुठे..?
नेते हो,
नमस्कार.
पाच वर्षांतून एकदा येणाऱ्या तुमच्या सणाची घोषणा कालच झाली. धुमधडाक्यात तुमचा सण सुरू होत आहे. त्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. त्यानिमित्ताने सर्वसामान्य अशा, पाच वर्षांतून एकदा ज्याला भाव येतो त्या मतदाराकडून तुम्हाला हे पत्र.
राजकारण म्हणजे काय? अशक्य ते शक्य करून दाखवण्याचा खेळ म्हणजे राजकारण. असे कोणीतरी लिहून ठेवले आहे. गेले काही महिने अनेक अशक्य गोष्टी शक्य होताना उभा महाराष्ट्र आडवा होऊन पाहत आहे. कधी कोणी कल्पना केली नसेल असे नातेसंबंध तुटताना, जुळताना दिसत आहेत. पाच वर्षांच्या एकाच टर्ममध्ये तुम्ही आम्हा मतदारांना काय काय दाखवणार आहात? आमचा जीव केवढा..? आमची बुद्धी केवढी..? आणि तुम्ही दाखवता केवढं… त्यामुळे तुमचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे.
जे कोणाला शक्य झाले नाही ते या निवडणुकीत होताना दिसत आहे. शरद पवार हे राजकारणातले एक मातब्बर घराणे. घरातली भांडणं कधी दाराबाहेर गेली नाहीत. मात्र या निवडणुकीत घरातली भांडणं दाराबाहेर अवघा देश आणि महाराष्ट्र बघेल. शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या नणंद-भावजयीमधील सामना या निवडणुकीतील लक्षणीय असेल. यानिमित्ताने अजित पवारांची दोन्ही मुलं पार्थ आणि जय आईच्या प्रचारार्थ बारामती पिंजून काढताना दिसतील. त्याच वेळी रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार, बहीण सई पवार आणि पत्नी कुंती पवार या सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ मैदानात उतरलेल्या दिसतील. अख्खे पवार कुटुंब पूर्वी राष्ट्रवादी पक्षाच्या एकाच छत्राखाली होते. ते आता विभागले गेले. आता एकमेकांच्या विरोधात मैदान जिंकण्यासाठी पवार विरुद्ध पवार मैदानात समोरासमोर दिसतील. भाजपने बारामतीची निवडणूक भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी करता करता, पवार विरुद्ध पवार कशी करून टाकली हे कोणाला कळलेही नाही.
या प्रचाराच्या निमित्ताने पार्थ पवार यांनी लोकांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत. गाठीभेटीत ते थेट पुण्यातला गुंड गजा मारणेच्या घरी पोहोचले. गजा मारणेने पार्थ पवार यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्राच्या इतिहासात ही भेट लक्षणीय ठरली. त्याच गजा मारणेला काही दिवसांनी पुण्याच्या पोलिस आयुक्तांनी रस्त्यावर उभे करून झाप झाप झापले. निवडणुकीचे निकाल काहीही लागू देत… राजकारणातल्या अत्यंत सभ्य आणि घरंदाज पवार कुटुंबात या निवडणुकीने उभी फूट पाडली हे खरे. निवडणुकीचे वातावरण जसे तापत जाईल, मतदानाची तारीख जवळ येत जाईल, तसे घराघरात… रस्त्यावर… दोन समाजातील फूट उघडपणे दिसू लागेल..! जातीधर्मात नेमके काय चालू आहे हे देखील उभा महाराष्ट्र अस्वस्थपणे पाहात राहील..!
तिकडे बीड जिल्ह्यात एक वेगळीच निवडणूक महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरुद्ध लढलेले भाऊ-बहीण आता एकाच बाजूने लढताना दिसतील. पंकजा मुंडे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली आहे. आपल्यासाठी जे काम करतील त्यांच्यासाठी आपणही काम करू, असे विधान त्यांनी केले. हे विधान त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांच्यासाठी होते हे वेगळे सांगायची गरज नाही. यावेळी धनंजय मुंडे यांना आधी पंकजाताईंसाठी काम करावे लागेल. तरच त्यांना त्यांच्या विधानसभेच्या वेळी मदत होऊ शकेल, असा इशाराच मिळाला आहे. धाराशिव मतदारसंघात ओमराजे निंबाळकर उद्धव सेनेत आहेत, तर पद्मसिंह पाटील यांचे चिरंजीव राणा जगजीत सिंह भाजपकडे. दोन चुलत भावांमधील लढाई या निवडणुकीच्या निमित्ताने महाराष्ट्राला पाहता येईल. तर उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे हे साताऱ्याचे दोन चुलत भाऊ राजघराण्याचा वारसा ठेवून आहेत. गेल्या निवडणुकीत शिवेंद्रराजे यांनी उदयनराजेंना मदत केली होती, मात्र पाच वर्षांत दोघांमधील संबंध पुन्हा बिघडले आहेत. दोघेही भाजपमध्ये आहेत, त्यामुळे या दोन चुलत भावांमधील लढाई कोणते वळण घेईल हे निकालच सांगेल. रावेरमधून भाजपने रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या त्या सुनबाई. खडसे राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) आमदार आहेत. ते कोणती भूमिका घेणार? ते कोणत्या पातळीवर जाऊन टीकाटिप्पणी करणार हे पाहण्यासाठी फार वेळ वाट पाहावी लागणार नाही.
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आजकाल फार पटकन मित्र होतात. फार पटकन शत्रू होतात, असा हा काळ असल्याचे वास्तवदर्शी विधान केले आहे. त्यांनी कबीर आणि बशीर बद्र यांच्या काही ओळी ऐकवल्या.
रहिमन धागा प्रेम का, मत तोड़ो चटकाय।
टूटे से फिर ना जुड़े, जुड़े गाँठ परि जाय॥
या ओळी वाचायला चांगल्या आहेत. मात्र महाराष्ट्राच्या राजकारणात नात्यानात्याची वीण विस्कटली आहे. नात्यात पडलेल्या गाठी सोडवणे अशक्य झाले आहे. काही गाठी सोडवायला जाल तर आणखी गुंता होईल, अशी सगळी स्थिती आहे.
दुश्मनी जम कर करो, लेकिन ये गुंजाइश रहे,
जब कभी हम दोस्त हो जाएँ, तो शर्मिंदा न हों…
या ओळी जेव्हा बशीर बद्र यांनी लिहिल्या तेव्हा त्यांना, एकाच व्यासपीठावर काकाकडे दुर्लक्ष करून पुतण्या दुसरीकडेच बघत जाईल… किंवा ज्या बहिणीकडून भाऊ राखी बांधून घ्यायचा ती बहीण भावाकडे ढुंकूनही बघणार नाही… असे वाटले नसावे. जिथे नातीगोती पणाला लावण्याचे दिवस आहेत, तिथे बशीर बद्रचा विचार कोण करणार..?
तेव्हा नेत्यांनो, तुमचा सण उत्साहात साजरा करा. भरपूर फटाके उडवा… गुलाल उधळा… मात्र ज्या मतदारांच्या जीवावर तुम्ही हे सगळे करणार आहात, त्या मतदाराला या पंचवार्षिक सणाच्या व्यतिरिक्तही वेळात वेळ काढून भेटत जा. पाच वर्षांपूर्वी भेटलेले तुम्हीच का..? असे विचारायची वेळ त्याच्यावर आणू नका… तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
– तुमचाच,
बाबूराव
Comments