बुधवार, ११ डिसेंबर २०२४
11 December 2024

दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

अतुल कुलकर्णी

ज्या गोष्टी लोकांना नको वाटतात, त्याच दिशेने मुंबईत लोकसभा निवडणुकीचा प्रचार जाताना दिसत आहे. मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीदरम्यान दगडफेक झाल्याचे सांगत प्रकरण पोलिसात गेले आहे. निवडणुकीला आणखी वीस दिवस बाकी आहेत. आताच निवडणूक जर दगडफेकीच्या दिशेने जाणार असेल, तर येत्या काळात ही निवडणूक कोणते रंग दाखवणार हा चिंतेचा आणि विचार करायला लावणारा विषय आहे. मुंबई-ठाण्यात गेल्या काही काळात ज्या पद्धतीच्या राजकीय हिंसाचाराच्या घटना घडत आहेत, त्या घटना कधी काळी बिहार, उत्तर प्रदेशमध्ये घडत होत्या. भर दिवसा पोलिस ठाण्यामध्ये फायरिंग करणे, पोलिसांच्या देखत दुसऱ्या व्यक्तीवर गोळ्या झाडणे, नागरिकांना चालण्यासाठी असलेल्या फुटपाथवर कंटेनरच्या माध्यमातून कार्यालय उघडणे, एखाद्या पक्षाचे कार्यालय जमीनदोस्त करणे, त्यावरून होणारी राडेबाजी, दोन पक्षांचे एकमेकांच्या समोर युद्धभूमीवर उभे राहिल्यासारखे उभे राहणे, अशा गोष्टी महाराष्ट्रात कधीही घडत नव्हत्या.

विधिमंडळात एकमेकांच्या विरुद्ध प्रचंड टीका करणारे आमदार लॉबीमध्ये एकत्र येऊन हास्यविनोद करायचे. एकमेकांचे डबे खायचे. गावाकडून येताना तेथे बनवलेला एखादा वेगळा पदार्थ सर्व सदस्यांसाठी आठवणीने घेऊन यायचे. अशा गोष्टी आता दिवसेंदिवस दुर्मीळ होत चालल्या आहेत. याच्या उलट गोष्टी घडत आहेत. पैशांचा अतोनात वापर, एकमेकांचे कार्यकर्ते पळवणे, पदाधिकारी पळवणे, धमक्या देणे हे प्रकार फार किरकोळ झाले आहेत. लोकशाहीचा उत्सव म्हणून ज्या निवडणुकांकडे पाहिले जाते. त्यांचा वापर एकमेकांच्या विरुद्ध अर्वाच्य भाषेत खालच्या पातळीवर जाऊन उद्धार करण्यासाठी होत आहे. लोकांनी आपल्याला कशासाठी निवडून द्यायचे? हे सांगण्याचे कष्ट कोणीही घेत नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भावनिक गोष्टींचे भांडवल करणे आणि त्या आडून धार्मिक ध्रुवीकरण करता आले, तर ते करण्याकडे सगळ्यांचा कल दिसत आहे.

मुंबई उत्तर पूर्वमध्ये या गोष्टीची झलक नुकतीच पाहायला मिळाली आहे. या मतदारसंघातील मानखुर्द शिवाजीनगर परिसरात भाजपचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या प्रचार फेरीदरम्यान दगडफेक करण्यात आल्याचा आरोप केला गेला. पोलिसांच्या मते एक विटकरीचा छोटासा तुकडा त्या दिशेने आला होता. त्याला दगडफेक म्हणायची का, हा पहिला प्रश्न. जरी कोणी एखादा दगड भिरकावला असेल, तरी त्याचा शोध पोलिसांनी तत्काळ घ्यायला हवा. वस्तुस्थिती समोर आणायला हवी, मात्र या घटनेनंतर जे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले, त्या मागचे हेतू लक्षात येणार नाहीत, इतके मतदार वेडे नाहीत. आमच्या प्रचार फेरीवर दगडफेक करून वातावरण बिघडवण्यापासून ते मानखुर्द परिसराला मिनी पाकिस्तान बनवण्याच्या आरोपापर्यंत विषय वाढवला जात आहे. मानखुर्द परिसरातील आपल्या बाजूचे मतदान भारतीयांचे आणि विरोधी मतदान मिनी पाकिस्तानचे, अशी भूमिका कशी घेता येईल? याच मानखुर्द परिसरामध्ये एक टॅक्सी ड्रायव्हर आणि एका मुलीने लग्न केले. दोघांमध्ये वाद झाला. त्याने मुलीला मारून टाकले. त्यावरून या घटनेला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला गेला. एका पक्षाचे दोन नेते थेट मुलीच्या घरापर्यंत गेले. जर मुलगा, मुलगी एकाच धर्माचे असते, तर हेच नेते तेथे गेले असते का? निवडणुकीच्या तोंडावर आपल्या प्रत्येक कृतीवर लोकांचे लक्ष असते. आपण जे करू त्यातून धार्मिक भावना दुखावल्या जातील का?, समाजात तेढ निर्माण होईल का? याचा विचार सगळ्यात आधी राजकीय लोकांनी करायला हवा. दुर्दैवाने तो होताना दिसत नाही.

निवडणूक काळात जात, धर्म या गोष्टी का आणि कशासाठी काढल्या जातात, हे लोकांना चांगले समजते. एखादा उमेदवार उभे राहण्याने सत्तेपासून कोण ‘वंचित’ राहू शकतो, हे ही मतदारांना समजते. मत देणाऱ्याला काही समजत नाही. आपण काहीही केले, तरी ते खपून जाऊ शकते, असे समजण्याचे दिवस गेले. कोण?, कोणासोबत?, कशासाठी जातो? त्यातून कोणाचा, कसा विकास होतो? हे लोकांना चांगले समजू लागले आहे. त्यामुळेच लोकांचा मतदानावरचा निरुत्साह वाढत चालला आहे.

मुंबई, ठाणे, पालघर भागांतील दहा लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुका होण्यासाठी २० दिवस बाकी आहेत. या काळात दगडफेक, हाणामाऱ्या अशा गोष्टी वाढल्या, तर या भानगडीतच जायला नको, असे म्हणून लोक मतदानाकडे पाठ फिरवतील. मतदान करण्याची इच्छा आहे, अशांनाही आपण मतदान केंद्रापर्यंत येऊ देणार नसू, तर त्यासारखे दुर्दैव नाही.

मुंबईसारख्या शहरात यावर्षी पहिल्यांदा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ज्या ठिकाणी एक हजार मतदारांची संख्या असेल, त्या ठिकाणी मतदान केंद्र नेण्याचा निर्णय घेतला. मात्र, आमच्या बिल्डिंगमध्ये बाहेरचे मतदार येणार असतील, तर आमच्याकडे केंद्रच नको, अशी भूमिका घेणारे लोक ज्या शहरात आहेत, त्या ठिकाणी सामाजिक सलोखा बिघडवणाऱ्या घटना घडू लागल्या, तर लोक मतदान केंद्राला नाही, तर स्वतःच्या घराला टाळे ठोकून बाहेर निघून जातील. तसेही निवडून येणाऱ्यांचा आणि मतदारांचा ‘कनेक्ट’ कुठल्याही प्रकारे उरलेला नाही. उमेदवार आणि मतदार यांच्यात संवाद नाही. त्यात अशा गोष्टी घडू लागल्या, तर ५० टक्क्यांचा आकडा गाठणे कठीण होईल. एकमेकांशी पडद्याआड आर्थिक व्यवहार करणारे, व्यवसायात मदत करणारे राजकारणी, जनतेसमोर मात्र एकमेकांच्या जीवावर उठल्यासारखे वागतात. यामागचे हेतू जनतेला लक्षात येतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *