गायकवाडांना तारेल का खरगेंची कृपा ‘वर्षा’
मुंबई डायरी / अतुल कुलकर्णी
मुंबई उत्तर मध्य लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिलेल्या वर्षा गायकवाड यांच्याविषयी स्थानिक नेत्यांची नाराजी कमी होण्याचे नाव घेत नाही. मुंबई उत्तर मधील काँग्रेसचे उमेदवार भूषण पाटील यांच्या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी ही नाराजी आणखी उफाळून आली. खा. चंद्रकांत हंडोरे आणि वर्षा गायकवाड यांच्यात फारसे सख्य नसले तरी त्यांनी मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात हंडोरे यांची विचारपूसही केली नाही त्यामुळे ते कार्यक्रम स्थळावरून निघून गेल्याची माहिती आहे.
आपल्यावर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा भक्कम पाठिंबा असल्यामुळे वर्षा गायकवाड वेगळ्या झोनमध्ये गेल्याची चर्चा आहे. त्यामुळेच त्यांनी माजी मंत्री सुरेश शेट्टी, भाई जगताप, अमरजीत मनहास अशा नेत्यांसोबत संवादही साधलेला नाही. मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी यापैकी उपस्थित नेत्यांची विचारपूसही केली नसल्याचे उपस्थितांचे म्हणणे आहे. या नेत्यांची स्वतःची व्होट बँक नसली तरी निवडणुकीत कोण, कधी, कसे काम करेल सांगता येत नाही.
दुसरीकडे एकही मुस्लीम उमेदवार मुंबईतून दिला नाही, अशी नाराजी नसीम खान यांनी व्यक्त केल्यामुळे या मतदारसंघात एमआयएमला उमेदवार उभा करण्याची संधी मिळाली असाही सूर आहे. एमआयएमचे रमजानअली चौधरी यांचे वडील आणि नसीम खान यांची जवळीक हा या मतदारसंघात चर्चेचा विषय बनला आहे. नसीम खान हे मागच्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे दिलीप लांडे यांच्याकडून पराभूत झाले होते. आता लांडे हे शिंदे गटासोबत गेल्यामुळे चांदीवलीतून नसीम खान यांना पुन्हा संधी आहे. मात्र वर्षा गायकवाड यांना मदत झाली नाही तर थेट खरगे यांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल, असेही काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे आहेत. त्यामुळे नसीम खान आता कोणती भूमिका घेतात यावर विधानसभेचे गणित अवलंबून असेल.
मंगळवारी झालेल्या कार्यक्रमात उद्धव गटाचे विनोद घोसाळकर यांना वर्षा गायकवाड यांनी, ‘मला मदत केली पाहिजे’, अशी गळ घातली. पण शेजारीच बसलेल्या खा. चंद्रकांत हंडोरे यांच्याकडे त्यांनी साधे स्मितहास्यही केले नाही, याची चर्चा कार्यक्रमाच्या ठिकाणी रंगली होती. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी असलम शेख, अमीन पटेल या काँग्रेसच्या दोन आमदारांना आणि समाजवादी पक्षाचे रईस शेख यांना मदतीला घेतले आहे. हे तिन्ही लोक वर्षा गायकवाड यांच्यासाठी काम करतील असे सांगितले जाते. त्याशिवाय आसिफ झकेरिया, ब्रायन मीरांडा, ट्यूलिप मिरांडा हे ही वर्षा गायकवाड यांच्या टीम मध्ये दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचा हा मतदारसंघ, आणि तीन महिन्यातच विधानसभा निवडणुकांना सामोरे जावे लागणार आहे त्यामुळे ठाकरे गटाचे अनिल परब आणि वरुण सरदेसाई हे वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी शिवसेना उभे करतील, असे चित्र आहे. या दोघांनाही विधानसभेचे वेध लागलेले आहेत. बांद्रा ईस्ट मधील आ. झिशान सिद्दिकी काँग्रेसमध्ये असले तरी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी अजित पवार गटात गेले आहेत. सध्याचे मतदारांमधील बदलते वातावरण पाहून झिशान सिद्दिकी काही वेगळी पावले उचलतील असे चित्र दिसत नाही.
- काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी सगळ्यांची मोट बांधली त्यावेळी नसीम खान, खा. संजय राऊत, वर्षा गायकवाड, भूषण पाटील, विनोद घोसाळकर यांनी हातात हात घातले खरे. मात्र या हातांमध्ये खा. चंद्रकांत हंडोरे, सुरेश शेट्टी, भाई जगताप यांचे हात दिसलेच नाहीत.
- कुर्ला, कलिना, चांदीवली, बांद्रा ईस्ट हे चार विधानसभा मतदारसंघ जर वर्षा गायकवाड यांच्या पाठीशी गेले तर विलेपार्ले आणि बांद्रा वेस्ट या दोन विधानसभांच्या जीवावर लोकसभा जिंकणे भाजपाचे उज्ज्वल निकम यांना कठीण जाईल, असे आज तरी चित्र आहे.
- निवडणुकीत उमेदवाराने कायम वधू पित्याची भूमिका बजावली पाहिजे. ती भूमिका वर्षा गायकवाड यांच्याकडून पार पाडली गेली नाही, तर काँग्रेसला काँग्रेसच हरवू शकते हा पूर्वापार चालत आलेला प्रघात याहीवेळी खरा ठरला तर आश्चर्य नाही.
Comments