बाळाने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
अधूनमधून / अतुल कुलकर्णी
प्रिय बाळा,
तू काळजी करू नकोस. देशात रोज असे अपघात घडत असतात. एकट्या मुंबईत रोज कोणत्या ना कोणत्या अपघातात १० – २० लोक मरतातच. त्यामुळे पोर्शेसारखी भारी कार चालवताना, तुझ्या कारचा धक्का लागून दोन मुलं गेली. याचे तू वाईट वाटून घेऊ नकोस… वाईट वाटून घ्यायला त्यांचे नातेवाईक समर्थ आहेत… तुझे वडील श्रीमंत आहेत, यात तुझा काय दोष..? त्यांनी तुला एकदम भारी गाडी दिली. क्रेडिट कार्ड दिलं. आता तू मित्रांसोबत रंगीत पाणी प्यायला गेलास. त्यात तुझा दोष नाही. सगळा दोष रंगीत पाण्याचा आहे. इतिहासापासून आजपर्यंत या रंगीत पाण्याने अनेकांना मोहित केले. त्यामुळे तू एकटाच मोहात पडणारा नाहीस हे लक्षात ठेव. तुझी एवढी भारी गाडी वेगाने येणार हे रस्त्यावरून चालणाऱ्यांना माहिती असायला हवे होते. त्यांनी आधीच रस्ता मोकळा केला असता तर काय बिघडले असते? विनाकारण तुझ्या गाडीच्या मध्ये आले. तुझ्या बाबांनी तुला सगळ्या सुख सुविधा देण्याचे ठरवले.
अपघातानंतर तुला पोलिस ठाण्यात नेले. नोंदणी नसणारी गाडी तू घरातून नेली… इथपासून ते अपघात होऊन दोन जण ठार होईपर्यंतचा घटनाक्रम एकच असताना, याचे वेगवेगळे दोन एफआयआर दाखल करणाऱ्या त्या पोलिसांनी एफआयआर कसा दाखल करावा? याचे राज्यभर प्रशिक्षण वर्ग घेतले पाहिजेत. तुझा विषय मिटला की आपण हा प्रस्ताव स्पॉन्सरशिपसह सरकारला देऊ.
एक गोष्ट तू लक्षात घेतली का… हुशार पोलिस अधिकाऱ्यांनी तुला लगेच बर्गर, पिझ्झा खायला दिला. त्यानंतर तुझ्या रक्ताचे नमुने घेतले गेले. चिंता करू नकोस. त्यामुळे तुझ्या रक्तातील रंगीत पाण्याचे प्रमाण निश्चित कमी झाले असणार… ज्या पोलिस काकांनी हे केले त्यांचा तर शनिवार वाड्यासमोर सत्कार केला पाहिजे, असे आमचे एक पुणेकर मित्र सांगत होते. मी म्हणालो, सत्कार करण्यासारख्या खूप गोष्टी आणि खूप व्यक्ती आहेत. तेव्हा एकदाच सगळे सत्कार करू…
ते जाऊ दे, १७ वर्षे ६ महिन्यांपेक्षा जास्त वय असेल तर तो मुलगा किंवा मुलगी सज्ञान समजली पाहिजे. ज्या गुन्ह्यात ७ किंवा ७ वर्षांपेक्षा जास्त शिक्षेच्या तरतुदीचे कलम लावले असेल ते देखील सज्ञान समजले जातात. हे मुद्दे जे पोलिस काका न्यायालयात मांडू शकले नसतील त्यांचा देखील आपण सत्कार केला पाहिजे… तुझ्या फायद्याच्या गोष्टी या लोकांनी केल्या त्यामुळे उगाच त्यांच्यावर राग धरू नकोस. आपल्या बाबाची, आजोबाची पार्श्वभूमी पोलिस दप्तरी असतानाही, त्यांनी मन मोठे करून तुझ्या जामिनासाठी त्यांचाच हवाला स्वीकारला… यापेक्षा त्यांनी अजून काय करायला हवे..? त्यामुळेच तुला पोलिस ठाण्यात पिझ्झा, बर्गर खायला घेणारे आणि तुझ्यामुळे या पोलिस काकांनाही पिझ्झा, बर्गर चुकून मिळाला असेल, तर त्याचे वाईट वाटून घेऊ नको. रक्तदान आणि अन्नदान महान दान असते. हल्ली चांगल्या गोष्टी कोणी लक्षातच घेत नाही… तुझ्यासाठी पिझ्झा बर्गर मागवणाऱ्यांचे चुकलेच. तिथे जमलेल्या सगळ्या मीडियासाठी देखील त्यांनी पाच पंचवीस बर्गर मागवले असते, तर त्यांनाही तेवढेच बरे वाटले असते. पुढच्या वेळी असं काही करशील तेव्हा हे लक्षात ठेव…
तुझे बाबा उगाच डबड्या १५ लाखांच्या गाडीत छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने पळाले. त्यांच्याकडे इतक्या आलिशान गाड्या असताना त्यांनी कोटी, दोन कोटींची गाडी घेऊन थेट दुबईच्या दिशेने जायला हवे होते. पुणेकरांनी दिलेला हा सल्ला त्यांनी का ऐकला नाही माहिती नाही… मध्यंतरी पुण्यनगरीच्या पोलिस आयुक्तांनी सगळ्या आरोपींची रस्त्यावर उभे करून हजेरी घेतली होती. यावेळी त्यांनी तुझ्या गाडीच्या रस्त्यात जे कोणी आले त्या सगळ्यांची रस्त्यावर उभे करून अशीच हजेरी घ्यायला हवी होती… बाळराजे गाडी चालवतात आणि त्यांच्यामध्ये तुम्ही येता… समजता काय तुम्ही स्वतःला…? असे खडसावून विचारायला हवे होते… ज्या पोलिस ठाण्यात तुला सन्मानाची वागणूक मिळाली. पिझ्झा बर्गर मिळाला. ज्या वेगाने तुला रविवार असतानाही जामीन मिळावा म्हणून जे पोलिस झटले… त्या पोलिस ठाण्याचा राज्यातले आदर्श पोलिस ठाणे म्हणून देशातल्या सर्वोच्च पदकाने सन्मान करण्याची शिफारस पुणेकरांनी करायला हवी..! तुझे बाबा त्यांना स्पॉन्सरशिप नक्की देतील. कारण यामुळे असे अनेक आदर्श पोलिस ठाणे तयार होतील, असे काही पुणेकरांनी वैशालीमध्ये इडली खाताना आम्हाला सांगितले…
तुझ्यासाठी स्थानिक आमदार काका धावत आले. त्यामुळे किती तरी गोष्टी सहज सोप्या झाल्या, असे दुसरे स्थानिक आमदार काका सांगत होते… तुला ज्या न्यायालयात नेले त्या काकांनी देखील तुला निबंध लिहायला सांगितला… किती छान ना… खरे तर खून, बलात्कार, अपघात या सगळ्या शिक्षांमध्ये कविता करायला लावणे, निबंध लिहायला सांगणे, बा. सी. मर्ढेकरांची ‘पिपात मेले ओल्या उंदीर’ ही कविता पाठ करायला सांगणे, अशाच शिक्षा द्यायला हव्यात. बलात्काराच्या आरोपीला एखाद्या पॉर्न फिल्मची कथा लिहायला सांगावी… दरोडा टाकणाऱ्यांना वाल्याचा वाल्मिकी कसा झाला, ही कथा लिहायला सांगावी… मंगळसूत्र चोरांना माहेरची साडी सिनेमा पन्नास वेळा बघायला लावावा… यामुळे समाज आणखी जास्त संवेदनशील होईल… सरकार उगाच वेगवेगळ्या तुरुंगात ठासून ठासून कैदी भरत असते. तो खर्च किती तरी वाचेल. ज्यांनी कोणी तसा निकाल दिला त्यांनी फार विचारपूर्वक निकाल दिला, असे नाही वाटत तुला… आम्हाला तर तसेच वाटले. ज्या दिवशी तुला निबंध लिहायची शिक्षा दिल्याचे वाचले, त्याच दिवशी आम्ही व्ही. शांताराम यांचा ‘दो आँखे बारा हाथ’ हा सिनेमा तीन वेळा पाहिला…
तेव्हा बाळा तू चिंता करू नको. सगळे तुझ्या मदतीसाठीच, सगळं काही करत आहेत. आता तू जिथे थांबणार आहेस, तिथल्या मुलांनाही रंगीत पाणी कसे प्यायचे, अपघात झाल्यास त्यातून कसे बाहेर यायचे, याचे धडे दे… जसे तू एका आमदार काकाच्या मुलाला दिले होते तसेच…
– तुझाच, बाबूराव
Comments