रविवार, २४ नोव्हेंबर २०२४
24 November 2024

स्वतंत्रपणे लढण्यास शिवसेनेचा विरोध; प्रसंगी ‘वर्षा’ वर जाण्याची तयारी

शिवसेनेच्या विधानसभा सदस्यांमध्ये तीव्र खदखद

– अतुल कुलकर्णी

मुंबई – जनतेतून निवडून आलेल्या शिवसेना आमदारांमध्ये सध्या टोकाचा असंतोष धुमसत आहे. आम्हाला मंत्रीपदे न देता विधान परिषदेच्या सदस्यांना ती दिली गेली आहेत, हे मंत्री शिवसेना आमदारांचीच कामे करत नाहीत, नेतृत्वाकडून नाराज आमदारांना विश्वासात घेतले जात नाही, यामुळे नाराज आमदारांचा एक गट बैठक घेऊन वेगळा निर्णय घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे.

आम्हाला मंत्रीपदे व महामंडळावरील नियुक्ती मिळणार नसेल तर नागपूर अधिवेशनाला जायचे तरी कशाला? असा संतप्त सवालही या आमदारांनी केला आहे. पक्षनेतृत्व एकीकडे स्बळाची भाषा करत असताना त्या भूमिकेलाच सुरुंग लावण्याचे काम काही आमदारांनी हाती घेतले आहे. आम्हाला जर न्याय मिळणार नसेल तर आम्ही पक्षबांधणी कशी करायची व मतदारसंघ सांभाळायचे कसे? अशी उद्विग्नता या आमदारांनी बोलून दाखवली आहे.

शिवसेनेच्या काही आमदारांनी नाव न छापण्याच्या अटीवर आपल्या मनातील खदखद व्यक्त केली. स्वतंत्रपणे लढण्याची भाषा परवडणारी नाही. स्वतंत्र लढायचे ठरवले तर आमच्या मतदारसंघातून आम्हाला निवडून येणे अवघड आहे. पण लोकांमधून निवडून न येणारे काही नेते मातोश्रीवर जाऊन साहेबांना चुकीची माहिती देतात असेही काही आमदार म्हणाले.

आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांना यावेळी विधान परिषेदसाठी पुन्ही तिकीट दिले नसले तरी त्यांचे मंत्रीपद कायम आहे. त्यांना आणखी ६ महिने कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसतानाही मंत्रीपदी कायम ठेवण्याचे घाटले जात आहे. तसे झाल्यास आमच्या जनतेतून निवडून येण्याला काहीच अर्थ उरत नाही असे सांगून पश्चिम महाराष्ट्रातील एक आमदार म्हणाले, त्या जागी तातडीने विधानसभेतून कोणाला तरी संधी दिली पाहिजे. पण ते होत नाही.

ज्यावेळी विधान परिषद सदस्यांना मंत्रीपदे दिली, त्यावेळी सांगण्यात आले होते की निवडणुकीच्या एक वर्ष आधी त्यांचे राजीनामे घेऊन आम्हाला मंत्री पदे दिली जातील. पण ते ही होताना दिसत नाही. सध्याचे मंत्री मातोश्रीपेक्षा ‘वर्षा’वर जास्त निष्ठा दाखवतात. मातोश्रीवर झालेल्या बैठकांची माहितीही लगेच ‘वर्षा’वर देण्यात धन्यता मानतात. आम्ही निष्ठेने मतदारसंघात शिवसेना बांधून ठेवण्याचे काम करतो आहोत पण आम्हाला कोणी विचारत नाही. महामंडळाच्या नेमणुकाही चार वर्षे होत आली तरी केल्या जात नाहीत. अशी खंतही त्या आमदाराने व्यक्त केली.

– अतुल कुलकर्णी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *