तू नसता तर आम्ही काय केले असते…?
अधूनमधून / अतुल कुलकर्णी
प्रिय मोबाइलराव,
आज तुझे जाहीर कौतुक करावे म्हणून हे पत्र. तू नसतास तर काय झाले असते..? हा प्रश्न मी दिवसातून एकदा तरी मनाला विचारतो. त्याची उत्तरे मला इतकी भीती घालू लागतात की, मी पुन्हा तुझ्यात हरवून जातो… तू आधी छोट्याशा डबीच्या रूपात पेजर नावाने आलास. त्यावर आधी तू फक्त एकमेकांचे नंबर एकमेकांना पाठवत होतास… नंतर तू शब्दांची देवाण-घेवाणही सुरू केलीस… तुझ्या बदलाचा वेग प्रचंड होता. तू दोघांमध्ये मध्यस्थ म्हणून बोलणे घडवून आणत होता. पुढे एकमेकांना फोटो पाठवू लागलास… तुझ्या मदतीला व्हॉट्सॲप, फेसबुक, ट्विटर धावून आले… बघता बघता तू अक्राळ-विक्राळ रूप धारण केलेस, पण एवढे करूनही तू आमच्या मुठीतच राहिलास…
आम्ही तुला मुठीत घेऊन जग कवेत घेण्याच्या गप्पा मारतो. तुझ्यामुळे आमच्या जीवनात नवीन क्रांती आली. तुझे गुगल अंकल आम्हाला जगाचे ज्ञान देऊ लागले. शाळेतल्या गुरुजींपेक्षा तेच मुलांवर भारी ठरले. तुला प्रश्न विचारायचा अवकाश, तू फटाफट उत्तरे देऊ लागलास… आता तुझ्या मदतीला चॅट जीपीटी आले आहे. मनातल्या प्रत्येक गोष्टी ते क्षणार्धात तुझ्या माध्यमातून आम्हाला देत आहेत. कोणतीही क्रांती उपाशीपोटी होते, असे म्हणणाऱ्यांचे दिवस गेले. आम्ही आता भरल्यापोटी एसी रूममध्ये बसून तुझ्यामुळे जगात क्रांती घडवून आणू शकतो…
कोणता सिनेमा चांगला, नाटक वाईट इथपासून ते आमच्या व्यक्तिगत आयुष्यातील बँकांचे व्यवहार, आमच्या शरीरातील साखरेचे प्रमाणही तू सांगू लागलास… आमचा रक्तदाब आमच्या आधी तुला कळू लागला… दिवा घासला की अल्लाउद्दीनला हव्या त्या गोष्टी दिव्यातला राक्षस आणून द्यायचा… तुही तसाच… कदाचित त्या जादूच्या दिव्याचा तू नातेवाईकच… नव्या रूपाने तर आमच्या आयुष्यात आला नाहीस ना..?
यासाठी आम्हाला काही जुन्या वाईट सवयी सोडायला तूच मदत केलीस… शुद्ध हवा शरीराला चांगली म्हणून सकाळी उठून आम्ही मोकळ्या हवेत चालायला जायचो… चालल्यामुळे आरोग्याला फायदे होतात हे तू खोटे ठरवलेस… तुझ्यामुळे चालण्याची सवय मोडली हे बरे झाले… आता योगासुद्धा आम्ही तुला समोर ठेवूनच करतो. आम्ही किती पावलं चाललो हे एका क्षणात तू सांगतोस… पूर्वी हजारो नंबर पाठ असायचे… नंबर स्टोअर करून ठेवण्याचा एक पार्ट उगाच आमच्या मेंदूत नको तेवढा ॲक्टिव्ह झाला होता… तुझ्यामुळे तो पार्ट आता असून नसल्यासारखा झाला ते बरेच झाले… सुरपारंब्या, विटी दांडू… गलोर… पळापळी… लपाछपी… काचेच्या गोट्या… हे सगळे खेळ तू संपवून टाकलेस तेही बरे झाले… विनाकारण त्यासाठी मुलं दिवस दिवस घराबाहेर राहायची… दमून आली की, घरात खायला मागायची. आई त्यांना पौष्टिक खाद्य म्हणून शेपूची भाजी, मुळा, ज्वारीची भाकरी असे काहीतरी खायला द्यायची… आता बाहेरच जायचे नसल्यामुळे दमायचा प्रश्न उरला नाही… तुझ्या रूपाने आम्ही बसल्या जागी कँडी क्रश, पत्ते, कॉइन मास्टर असे अनेक गेम खेळतो… आईला त्रास न देता पिझ्झा, बर्गर, पास्ता, नूडल्स एका क्षणात मागवतो… त्यामुळे आईचाही त्रास वाचलाय. तू किती चांगला आहेस… काही नतद्रष्ट लोकांना तुझे आमच्या आयुष्यातले स्थान बघवत नाही.
तुझ्यात अखंड बुडून गेलेल्या मुलांचे नुकसान होत आहे… त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत आहे… मुलांना ड्रग्सचे जसे ॲडिक्शन असते, तसे मोबाइलचे व्यसन जडले आहे.. अशी ओरड पुन्हा सुरू झालीय… तू त्याकडे लक्ष देऊ नकोस… आता ज्या वेगाने तू प्रगती करत आहेस तो वेग वाढव… तुला मुठीत घेऊन आम्हाला नको वाटणाऱ्या गोष्टी क्षणात नष्ट करायच्या आहेत… आवडणाऱ्या विचारांचे भरघोस पीक घ्यायचे आहे… मोठमोठ्या युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला जायची आता गरज उरली नाही… तुझी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी आम्हाला जगाचे ज्ञान देत आहे.
विनामूल्य… मुलाला जन्म देण्यापासून ते जन्मदात्या आईला कसे मारायचे, इथपर्यंतचे ज्ञान तू आम्हाला देत असताना, ज्यांना हे बघवत नसेल त्यांनी तुझ्यापासून फारकत घेऊन दाखवावी… त्यांनाही ते शक्य नाही. मात्र, आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत हे दाखविण्याच्या नादात काही नतद्रष्ट तुला बदनाम करत आहेत… जाता जाता एकच – लहानपणी आजीबाईचा बटवा आम्हाला माहिती होता. आमच्या संस्कृतीशी निगडित असंख्य गोष्टी त्या बटव्यातून बाहेर यायच्या. जाड्याभरड्या हाताने आजी गालावरून हात फिरवत ‘अडकुले मडगुलं… सोन्याचं कडगुलं…’ असं बडबड गीत गाऊन आमच्यावर प्रेम करायची, तो आजीचा थरथरणारा आवाज… पहिल्या पावसात येणारा मन सैरभैर करून सोडणारा मातीचा वास… गावात म्हशीच्या मागे टोपल्यात शेण गोळा करून त्याच्या गोवऱ्या थापताना येणारा थपाक थपाक आवाज… नवीन पुस्तक घरात आणून वाचताना कागदाचा होणारा स्पर्श आणि येणारा छपाईचा वास… गव्हाच्या कुरडईचा चीक, बाजरीच्या खारोड्या, बटाट्याच्या पापडांसाठी तयार केलेल्या ओलसर गोळ्याचा वास आणि चव अशा काही गोष्टी अजूनही मेंदूच्या कुठल्यातरी कोपऱ्यात घट्ट रुतून बसल्या आहेत… त्या एकदा डिलीट मार म्हणजे आम्ही पूर्णपणे तुझे झालो म्हणून समज… करशील ना एवढं… तुझ्या नव्या व्हर्जनमध्ये…
तुझाच,
बाबूराव
Comments