गुरुवार, १९ सप्टेंबर २०२४
19 September 2024

मुंबई कोणाची? विधानसभा निवडणुकीचा केंद्रबिंदू

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

दोन महिन्यांवर आलेल्या विधानसभा निवडणुकीचे मुख्य केंद्रबिंदू मुंबई आणि ठाणे असेल. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. मुंबईतून अधिकाधिक आमदार निवडून आणण्यासाठी महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटक पक्ष तयारीला लागले असून इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे…

विधानसभा निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. काँग्रेसने बैठकांचा जोर वाढवला आहे. मुंबईत विधानसभेच्या ३६ जागा आहेत. त्यातल्या कोणत्या जागा काँग्रेसला पाहिजेत, हे ठरविण्यासाठी येत्या ४ ऑगस्ट रोजी काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड, भाई जगताप, अस्लम शेख यांची एक बैठक मुंबईत होऊ घातली आहे. त्याच दिवशी महाराष्ट्रात काँग्रेसने किती जागा लढवायच्या यासाठीही एक बैठक महाराष्ट्रासाठी नेमलेल्या कमिटीसोबत चेन्नीथला घेतील.

बैठकीपूर्वीची तयारी चालू आहे. त्यानुसार, ३६ पैकी काँग्रेसने १५ ते १६ जागा लढवायच्या. उद्धवसेनेने १६ ते १७ जागा आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला २ तर समाजवादी पक्षाला १ असे जागावाटप करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच वेळी भाजपमध्ये अंतर्गत कुरबुरी वाढल्या आहेत. गोपाळ शेट्टी, मिहीर कोटेचा, प्रकाश मेहता अशा काही नेत्यांना विधानसभा लढवायची आहे, तर आशिष शेलार पासून काही जणांना आपले मतदारसंघ बदलून घ्यायचे आहेत. या अंतर्गत हालचालींमुळे काही विद्यमान आमदार, तसेच काही इच्छुक अडचणीत येऊ शकतात. ही गोष्ट भाजपसाठी त्रासदायक बनली आहे.

काँग्रेसने जे मतदारसंघ महाविकास आघाडीमधून लढविण्याची भूमिका घेतली आहे, त्यात अमीन पटेल यांचा मुंबादेवी, वर्षा गायकवाड यांचा धारावी, झिशान सिद्दिकी यांचा बांद्रा ईस्ट आणि अस्लम शेख यांचा मालाड वेस्ट या चार मतदारसंघांचा समावेश आहे. त्याशिवाय काँग्रेसने भाजपचे राहुल नार्वेकर यांचा कुलाबा, कालिदास कोळंबकर यांचा वडाळा, तमिळ सेलवन यांचा सायन कोळीवाडा, आशिष शेलार यांचा बांद्रा वेस्ट, अमित साटम यांचा अंधेरी वेस्ट, भारती लव्हेकर यांचा वर्सोवा हे मतदारसंघ मागितले आहेत. त्याशिवाय शिंदेसेनेचे दिलीप लांडे यांचा चांदीवली आणि रवींद्र वायकर यांचा जोगेश्वरी ईस्ट हे मतदारसंघ ही काँग्रेसला हवे आहेत. १३ मतदारसंघांची यादी काँग्रेसने केली असली, तरी यात एक-दोन बदल होऊ शकतात, शिवाय आणखी दोन ते तीन मतदारसंघ काँग्रेसला मुंबईत हवे आहेत.

लोकसभेच्या वेळी भाजपने जी रणनीती केली होती, त्याचा काँग्रेसला फायदा झाला. भाजपने एकनाथ शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे अशी लढत होईल, असे मतदारसंघांचे वाटप केले. काँग्रेस भाजपच्या विरुद्ध लढली. त्याचा फायदा महाराष्ट्रभर काँग्रेसला झाला. काँग्रेसचा लोकसभेत एक खासदार होता, तिथे त्यांचे १३ खासदार निवडून आले. विधानसभेला नेमकी हीच रणनीती काँग्रेसकडून आखली जात आहे. मुंबईतल्या ३६ पैकी १५ ते १६ विधानसभा मतदारसंघांत जास्त जागा काँग्रेस भाजपच्या विरुद्ध लढेल. काँग्रेसने जी १३ मतदारसंघांची यादी केली आहे, त्यातील ६ भाजपच्या विरोधात तर २ शिंदेसेनेच्या विरोधातील मतदारसंघ आहेत. मनसेने महाराष्ट्रात २५० जागा लढवण्याचे जाहीर केले आहे.

मुंबईत भाजप विरुद्ध काँग्रेस आणि उद्धव ठाकरे विरुद्ध मनसे आणि शिंदेसेना अशी लढाई पाहायला मिळेल. अजित पवार आणि शरद पवार या दोघांच्याही राष्ट्रवादीचे मुंबईत फारसे प्राबल्य नाही. त्यामुळे शरद पवार यांच्याकडून मुंबईत २ जागा मागितल्या जातील, असे चित्र आहे. झिशान सिद्दिकी जरी काँग्रेसमध्ये असले, तरी त्यांचे वडील बाबा सिद्दिकी अजित पवार गटात गेले आहेत, पण लोकसभेच्या निकालानंतर बदललेले चित्र पाहता, झिशान सिद्दिकी अजित पवार गटाकडून उभे राहण्याची शक्यता कमी आहे. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाने स्वतंत्रपणे विधानसभा लढवावी, असे भाजपतील काही नेत्यांचे मत आहे, तसेच झाले तर कदाचित झिशान अजित पवार गटाकडून उभे राहतील, अशी चर्चा आहे.

उद्धवसेनेचे ८ आमदार मुंबईत आहेत. आदित्य ठाकरे वगळले, तर ज्या आक्रमकपणे या आमदारांनी मुंबईत आपापल्या मतदारसंघात सत्ताधारी सरकारच्या विरुद्ध रान पेटवायला हवे तसे काहीही होताना दिसत नाही. पडद्यामागे सत्ताधाऱ्यांसोबत काही शांतता करार तर झाले नाहीत ना? अशीही दबक्या आवाजात चर्चा आहे. ही चर्चा खोटी असेल तर निवडणुका दोन महिन्यांवर आलेल्या असताना उद्धवसेनेचे आमदार मुंबईत काय करत आहेत? या प्रश्नाचे उत्तर त्यांनाच द्यावे लागणार आहे.

लोकसभेच्या वेळी जे विरोधी वातावरण होते त्याची धार आता काहीशी कमी झालेली आहे. पण भाजपमधील अंतर्गत कुरघोड्या महाविकास आघाडीच्या मदतीला येऊ शकतात. ती मदत घेण्याची तयारी महाविकास आघाडीत आहे की नाही? हा खरा प्रश्न आहे. काँग्रेसमधूनही वर्षा गायकवाड यांच्यासह प्रत्येक नेता एक दुसऱ्यावर प्रश्न उपस्थित करतो. तुम्ही असेच भांडणार असाल, तर मला कटू निर्णय घ्यावे लागतील, अशी भूमिका पक्षाचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी घेतली आहे. उद्धवसेनेतूनही काही नेते वाट्टेल ती विधाने करण्याच्या स्वभावाला मुरड घालू शकलेले नाहीत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. वेणूगोपाल मध्यंतरी मुंबईत आले होते. सगळे उमेदवार राज्यस्तरावर ठरतील.

दोन-चार जागांसाठी गरज पडली, तर दिल्ली हस्तक्षेप करेल, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. हा इशारा काँग्रेस नेत्यांसाठी आहे की महाविकास आघाडीतील घटक पक्षांसाठी हे समजण्याइतके नेते सुज्ञ आहेत. त्याचवेळी चेन्नीथला यांनी महाविकास आघाडीत कोणीही लहान भाऊ, मोठा भाऊ नाही. सगळे समान आहेत, असे सांगून स्वपक्षीय नेत्यांचे कान धरले आहेतच. या पार्श्वभूमीवर मुंबई विधानसभेची तयारी सर्व पक्ष करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *