७ बेटांची मुंबई ४ लाखांवरून २ कोटींवर गेली
मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी / 19 ऑगस्ट 2024
१५३४ ते १६६१ हा पोर्तुगीजांचा काळ होता. १५३४ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईच्या बेटावर नियंत्रण मिळवले. त्यांनी मुंबईच्या बेटावर चर्च आणि छोटे किल्ले बांधले. त्या काळात मुंबईला ‘बॉम्बे’ असे नाव दिले गेले. ‘बॉम बाहिया’ (चांगली खाडी) हा पोर्तुगीज शब्द. त्यावरून ‘बॉम्बे’ हे नाव पडले. १६६१ मध्ये पोर्तुगीजांनी मुंबईचे बेट ब्रिटिशांना हुंडा म्हणून दिले. पोर्तुगीज राजकुमारी कॅथरीनचे इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा यासोबत लग्न झाले. १६६८ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने ही बेटे वार्षिक दहा पॉडाच्या भाडेपट्टीवर घेतली.
ब्रिटिशांनी मुंबईला एक महत्त्वाचे व्यापार केंद्र म्हणून विकसित करण्यास सुरुवात केली. १७८२ साली गव्हर्नर विलियम हॉर्नबायने ‘हॉर्नबाय वेलार्ड’ नावाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू केला. या प्रकल्पांतर्गत, समुद्रात भराव टाकून बेटं जोडली गेली, ज्यामुळे जमीन उपलब्ध झाली. १८३८ पर्यंत या प्रकल्पामुळे मुंबईची भौगोलिक रचना बदलली आणि ती व्यापारीदृष्ट्या महत्त्वाची झाली.
सात बेटांची मुंबई हा एक ऐतिहासिक प्रवास आहे. हळूहळू त्याचा एकत्र आकार होत गेला आणि त्यातून आधुनिक महानगर जन्माला आले. मुंबईची सुरूवात सात वेगवेगळ्या बेटांपासून झाली होती. कुलाबा, वरळी, माहीम, माझगाव, परळ, बॉम्बे आणि ओल्ड वुमन आयलंड (लिट्ल कोलाबा). ही बेटे सुरूवातीला वेगवेगळी होती आणि तिथे दलदल, खाडी आणि समुद्र होता.
तेव्हा सात बेटांची मुंबई कुलाबा ते माहीम आणि शीव (सायन) इथंपर्यंतच होती, पण नंतर सायन व माहीम कॉजवेद्वारे मुंबई उपनगरांना जोडली. साष्टी बेटावर आजची सारी उपनगरे तेव्हा होती. १८५० च्या सुमारास मुंबईची लोकसंख्या अवघी ४ लाख होती. आज या मुंबईचे एम. एम. आर. म्हणजेच मुंबई महानगर क्षेत्र झाले असून, त्याची लोकसंख्या जवळपास अडीच कोटींच्या घरात गेली आहे. गमतीने सांगायचे तर मुंबईतल्या सगळ्या लोकल ट्रेन धावताना त्यातून एका वेळी जवळपास ६० ते ७० लाख लोक प्रवास करत असतात. १,८५० मध्ये सात बेटांचे मिळून मुंबईचे एकत्रित क्षेत्रफळ २२ चौरस किलोमीटर होते. आज मुंबईचा विस्तार झाल्यानंतर हे क्षेत्रफळ ६,३५५ चौरस किलोमीटर झाले आहे. म्हणजे मुंबईत भराव किती टाकला गेला, हे लक्षात येईल.
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात मुंबईत काही मोजक्या शाळा आणि कॉलेजेस् होती. आज मुंबईत १,५०० पेक्षा जास्त शाळा, २०० पेक्षा जास्त कॉलेजेस् आहेत. अनेक आंतरराष्ट्रीय शाळा, आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस, आयआयएम यांची त्यात भर पडली आहे. १९ व्या शतकाच्या मध्यापर्यंत मुंबईत मुख्यतः कापड उद्योग विकसित झाला होता, ज्यात शेकडो गिरण्या होत्या. कालाैघात गिरण्या गेल्या व त्या जागी मोठे मॉल्स आले. आज, मुंबईत आयटी, वित्तीय सेवा, बॉलिवूड आणि बँकिंग यासारख्या उद्योगांमध्ये हजारो कंपन्या आहेत. मुंबईचा जीडीपी सुमारे $३१० अब्ज (२०२१ नुसार) आहे.
मुंबईत पहिली रेल्वे लाइन १८५३ मध्ये चालवली गेली. त्यावेळी शहरात टांगा, बैलगाडी, ट्राम, सायकल अशी प्रवासाची साधने होती. आज, मुंबईत ३९० किमीपेक्षा जास्त लोकल रेल्वे मार्ग, ४०० किमीपेक्षा जास्त मेट्रो मार्ग प्रस्तावित आणि विकासाधीन आहेत. ३,५०० ते ४ हजार बेस्टच्या बसेस आहेत. आजही जवळपास ४२ टक्के लोक मुंबईत झोपडपट्ट्यांमधून राहतात.
Comments