गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४
21 November 2024

गुलाबी रंग अंगावर येताच अजितदादा प्रेमळ झाले…!

अधूनमधून / अतुल कुलकर्णी

प्रिय अजितदादा

आपले अभिनंदन ! आपल्या पक्षाने गुलाबी रंग स्वीकारला. आपल्या सभांमधून सर्वत्र गुलाबी रंगाची उधळण होऊ लागली. गुलाबी रंग हा प्रेमाचे प्रतीक. त्यामुळेच कदाचित आपल्यात कमालीचा बदल दिसत आहे. आपण अतिशय प्रेमळ झाला आहात. केलेल्या चुकांचा आपल्याला पश्चात्ताप होत आहे. बहिणीच्या विरोधात बायकोला उगाच उभे केले; ती चूकच झाली, असे आपण बोललात. विधानसभा निवडणुकीच्या आधीच आपण हे सांगून टाकले ते बरे झाले. नाही तर उगीच बारामतीकरांना वाईट वाटत राहिले असते. मात्र आपल्याच पक्षातील काही नेते आपण कबूल केलेल्या चुकीमुळे अस्वस्थ झाले आहेत. बहिणीच्या विरोधात पत्नीला उभे करणे ही जर चूक होती, तर पक्षातील अन्य काही ज्येष्ठ नेत्यांना राज्यसभा न देता आपण ती आपल्या सौभाग्यवतींना का दिली? असाही सवाल हे नेते करू लागले आहेत. ही आपली चूक नव्हती का? असा प्रश्न ते हळू आवाजात का होईना, विचारत आहेत.

धर्मराव बाबा आत्राम यांच्या जिल्ह्यात कार्यक्रमाला गेल्यानंतर त्यांच्या मुलीने धर्मराव बाबा यांच्याविरोधात भूमिका घेतली. तेव्हा तुम्ही केलेले भाषण ऐकून आम्हाला काय बोलावे तेच सुचेना. तुमच्या प्रत्येक वाक्यावर आमच्या मनात काही प्रश्न निर्माण झाले आहेत.

 “वडिलांचे जेवढे प्रेम लेकीवर असते, तेवढे प्रेम कोणीच करू शकत नाही…” प्रश्न – मग शरद पवार यांनी स्वतःच्या लेकीवर, सुप्रियावर प्रेम केले, ती चूक होती का..?  “असे असताना तुम्ही घरामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करताय, हे बरोबर नाही…” प्रश्न – मग तुम्ही राष्ट्रवादी पक्षाला घर मानत असताना, ते घर सोडून किंवा ते घर सोबत घेऊन निघून गेलात. घरातल्या वडीलधाऱ्यांना घरात एकटे सोडून गेलात. ते नेमके काय होते..?  “समाजाला हे आवडत नाही. आम्हीपण तो अनुभव घेतला आहे. मी त्यातून माझी चूक मान्य केली.” प्रश्न – धर्मरावबाबा यांच्या मुलीने ती चूक करू नये असा सल्ला आपण त्यांना दिला; पण चूक दुरुस्त करण्याचा तुम्ही का प्रयत्न केला नाही…? तुम्ही तुमच्या काकांकडे, बहिणीकडे परत का जात नाही? (हे आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनात पडलेले प्रश्न आहेत.)

काही असो, आपल्यामध्ये अचानक हा प्रेमळपणा, ममत्व, आपुलकी केवळ आणि केवळ गुलाबी रंग स्वीकारल्यामुळे आल्याची राज्यभर चर्चा आहे. गेल्या आठवड्यात बारामतीमध्ये भाषण करताना आपण जे बोलला, त्यामुळे तर आमचा या चर्चेवर ठाम विश्वास बसला आहे. आपण म्हणालात, “बारामतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कामे करूनही निवडणुकीत गंमत होणार असेल तर झाकली मूठ सव्वा लाखाची बरी. जिथं पिकतं तिथं विकत नाही. मी सोडून दुसरा कोणीतरी आमदार बारामतीकरांना मिळाला पाहिजे. मग तुम्हाला त्याच्याशी तुलना करता येईल आणि मी काय आहे हे लक्षात येईल…”

याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? आपण निवडणुकीला उभे राहणार नाहीत की बारामतीमधून निवडणूक लढणार नाहीत? हा प्रश्न आम्हाला नाही, तर आपल्या पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना पडला आहे. आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी अजित पवार हेच आमचे कॅप्टन आहेत, असे विधान केले आहे. मग कॅप्टन लढायच्या आधीच मैदानातून बाहेर जाणार का…? की आपण भावनिक साद घालून लोकांना काही वेगळा संदेश देत आहात..? आम्हाला तर काही कळत नाही.

मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजना वित्तमंत्री म्हणून आपण विधानसभेत अर्थसंकल्प सादर करताना आणली. त्याचे श्रेय आपलेच, असे होर्डिंग राज्यभर झळकले. मात्र होर्डिंगवर फक्त ‘लाडकी बहीण’ असाच उल्लेख होता. मुख्यमंत्री शब्द कदाचित प्रिंटिंग मिस्टेकमुळे उडून गेला असेल. भाजपने ‘देवाभाऊ’ असे होर्डिंग गावभर लावले. त्यातून नेमका आपलाच फोटो वगळला…! शिंदे शिवसेनेने ठिकठिकाणी बॅनर लावले. त्यातूनही आपला फोटो गायब झाला. एकमेकांना, एकमेकांच्या होर्डिंगवरून गायब करण्याची सुरुवात आपण केली की त्यांनी केली? आपल्याला ज्यांनी गुलाबी रंग वापरायचा सल्ला दिला, त्यांची तर ही कल्पना नसेल?

कोणीही, काहीही म्हणू देत. आपले काम अतिशय उत्तम सुरू आहे. आपण सगळ्यांशी असेच प्रेमाने वागा… ‘एकच वादा… आमचा दादा… प्रेमाने वागा…” हे स्लोगन आपल्याला कसे वाटते? निवडणुकीच्या तोंडावर चांगले क्लिक होईल. आम्ही आपले आमच्या बालबुद्धीला जे योग्य वाटले, ते सांगितले. आपण हुशार आहात. गांधीजींचे भरपूर ‘रंगीत फोटो’ देऊन आपण गुलाबी होण्याचा सल्ला घेतलेला आहे. आता फक्त गांधीजींसारखे एका गालावर मारले की दुसरा गाल पुढे करण्याचे बाकी आहे… अर्थात हे आम्ही म्हणत नाही… आपल्याच पक्षातील नेते सांगत आहेत. त्यांचा हा सल्ला आजमावून बघायला काय हरकत आहे…? आपल्याला खूप खूप शुभेच्छा…!

– आपलाच बाबूराव

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *