मंगळवार, ३ डिसेंबर २०२४
3 December 2024

गणपती गेले, आता फोडाफोडीला सुरुवात होईल?

मुक्काम पोस्ट महामुंबई / अतुल कुलकर्णी

दीड दिवसापासून सात दिवसांपर्यंतच्या गणपतींचे विसर्जन झाले आहे. सार्वजनिक गणपतींचे विसर्जन उद्या, मंगळवारी होईल. दरम्यानच्या काळात फोडाफोडीच्या शेतीसाठी मशागत करणे सुरू झाले आहे. बाप्पांचे विसर्जन होताच १८ तारखेपासून फोडाफोडीच्या बियाण्यांची पेरणी सुरू होईल. एकदा का पितृपक्ष संपला, की कापणीचा हंगाम येईल. कोणत्या भागात, कोणते पीक कसे व किती वाढू शकते, यावर त्या भागातील पिकाची कापणी करायची की नाही हे ठरेल. त्यातही पीक कापणारा कोण आहे? तो पिकांना किती ‘खत’ देऊ शकेल, यावरही विधानसभेच्या काळात येणाऱ्या पिकाचे उत्पन्न अवलंबून असेल.

लोकसभेला हवामान जसे होते तसे आता असेलच असे बिलकुल नाही. त्यामुळेच काही नवश्रीमंत शेतकरी वेगवेगळ्या ‘खतां’चा वापर करतील. मार्केटमध्ये सध्या ५ कोटी ते ३० कोटींंपर्यंत ‘खतं’ विकत घेण्याची तयारी काहींनी केली आहे. यंदाच्या विधानसभेदरम्यान आपलेच पीक सगळ्यांत जास्त कसे येईल, याची प्रत्येकाला चिंता आहे. त्यासाठी काहींनी ईडी, सीबीआय कार्यालयांच्या आजूबाजूला चांगली जागा पाहून नांगरणी सुरू केली आहे. या मोसमात सहा वेगवेगळे सधन शेतकरी आपलेच पीक कसे चांगले येईल यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. काहींनी विदर्भात नव्याने जमीन कसायला घेतली आहे; तर काहींनी पश्चिम महाराष्ट्रात पेरणीसुद्धा उरकून टाकली आहे. शिवाजी पार्कातील एक शेतकरी सगळ्या राज्यात पेरणी करण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या शेतीचे उत्पन्न त्यांनाच मिळेल, की दुसराच कोणी आयते आलेले पीक नोव्हेंबरमध्येच घेऊन जाईल, याविषयी इतर सधन शेतकऱ्यांच्या मनात शंका आहेत.

विदर्भातील शेतीतून दर ५ वर्षांनी ६२ पोती धान्य येते. त्यासाठी १०० वर्षांचा अनुभव असणाऱ्या एका शेतकऱ्याने या भागावर लक्ष केंद्रित केले आहे. यंदा विदर्भातून त्यांना दोन मित्रांच्या मदतीने किमान ५० पोती धान्य मिळेल, यावर त्यांचा ठाम विश्वास आहे. काहींच्या मते विदर्भाच्या जिवावर या १०० वर्षांचा इतिहास असणाऱ्या शेतकऱ्याला आत्ताच पीक विकून दारात पैशांच्या राशी आल्याची स्वप्न पडू लागली आहेत..! हा आत्मविश्वासच या शेतकऱ्याला अडचणीचा ठरू शकतो, असा वेधशाळेचा अंदाज आहे. नागपुरातून मुंबईत शेती करायला आलेला एक शेतकरी तर हुशार, संयमी आहे. ‘मी पुन्हा येईन’ यावर त्याचा विश्वास आहे. मात्र त्याच्यासोबत पार्टनरशिपमध्ये शेती करणारेच, त्याची अडचण करत असल्याची इतरांना शंका आहे. विदर्भातून किमान २५ पोती उत्पन्न मिळेल, यासाठी तो जिवाचे रान करत आहे.

पश्चिम महाराष्ट्रात ५८ पोती धान्य दर ५ वर्षांनी मिळते. त्यासाठी ‘जाणत्या’ शेतकऱ्याने पावसाचा अंदाज घेऊन आधीच पेरणी करून टाकली आहे. त्यामुळे या ‘जाणत्या’ शेतकऱ्यांच्या शेतात आपले बी रुजावे म्हणून आजूबाजूचे सधन शेतकरी आणि त्यांची मुलं त्यांच्या दारात गर्दी करत आहेत. हा ‘जाणता’ शेतकरी अनुभवी आहे. २४ तास शेती करणारा आहे; त्यामुळे तो कधी, कोणाचे पीक कसे कापून नेईल, याविषयी प्रत्येकाच्या मनात असंख्य प्रश्न आहेत.

कोकण, ठाण्यात ३९ पोती, तर मुंबईत ३६ पोती उत्पन्न येते. ‘मातोश्री’च्या आजूबाजूला शेती करणारा शेतकरी मुंबईवर विसंबून आहे. मुंबईतून त्याला किमान २० पोती उत्पन्न मिळेल असे वाटते. त्यासाठी धारावीतून पार्ल्यात गेलेल्या शेतकऱ्याची त्याला मोठी मदत होत आहे. सध्या दोघे इतके घट्ट आहेत, की धारावीतून पार्ल्यात गेलेला शेतकरी आपलाच आहे की ‘मातोश्री’चा..? यावर शंभर वर्षांची परंपरा असलेल्या शेतकऱ्याला प्रश्न पडला आहे. ठाणे, कोकणात आनंदमठावर श्रद्धा असणारा शेतकरी या भागातून उत्तम पीक काढेल, याविषयी कोणालाच शंका नाही. मात्र मुंबईतून आपल्याला एखाद्दुसरेच पोते उत्पन्न मिळेल, अशी शंका त्याला आहे. त्यासाठी त्यांनी महागातले महाग खत आणि दमदार बियाणे ‘खरेदी’ करण्याची जोरदार तयारी केली आहे.

या सगळ्या परिस्थितीत ज्यांनी वर्षानुवर्षे मशागत करून आपली स्वतःची शेती राखली आहे, त्यांना महागड्या ‘खतांची’ गरज पडणार नाही. मात्र ज्यांना आजच्या पिकासोबत भविष्यातील पिकाचीही चिंता आहे, त्यांच्यासोबत वाढणाऱ्या त्यांच्याच घरातल्या लहान-लहान पिकांचीही वाढ ज्यांना करायची आहे, अशांना या भारी-भारी ‘खतांचा’ मोह पडू शकतो.

असे असले तरी कवी यशवंत मनोहर यांची एक कविता सहा शेतकऱ्यांच्या पीकपरिस्थितीचा आढावा घेणाऱ्या सामान्य नागरिकांना सतत आठवत आहे :

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही

सदरहू पीक आम्ही आसवांवर काढले आहे

कालपर्यंत पावलांनी रस्त्यांपाशी तक्रारी मांडल्या नाहीत

झाडे करपली, माथी हरपली

नदीच्या काठाने मरण शोधीत फिरलो

आयुष्याच्या काठाने सरण नेसून भिरभिरलो

कालचा पाऊस आमच्या गावात आलाच नाही…

अशी काहीशी अवस्था त्या सामान्य नागरिकाची झाली आहे. सहा सधन शेतकरी बाजार समितीत जेव्हा आपला माल घेऊन जातील, तेव्हा कोणाच्या मालाला किती भाव येईल? कोणाची पोती, कोणत्या दराने, कोण विकत घेईल? कोणते धान्य, कोणाच्या गिरणीत दळायला जाईल? यावर त्या सर्वसामान्य नागरिकाला भाकरी-चपाती खायला मिळेल. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या…!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *