शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024

गँगवॉर, मर्डर, एन्काउंटर : सावधान मुंबई बदलत आहे

अतुल कुलकर्णी /  मुक्काम पोस्ट महामुंबई

मुंबईत गँगवॉरची कहाणी १९६० च्या दशकापासून सुरू झाली, तेव्हा हे शहर वेगाने वाढत होते. मुंबईत बंदर, फिल्म इंडस्ट्री, बांधकाम क्षेत्र यात प्रचंड पैसा फिरू लागला होता. कामगार वर्गातील संघर्ष, सट्टेबाजी, सोन्या-चांदीची तस्करी यावरून अनेक टोळ्या उदयाला आल्या होत्या. यात हाजी मस्तान, वरदराजन, मुदलियार करीम लाला ही नावे आघाडीवर होती. १९८०च्या दशकात दाऊद इब्राहिम मुंबईतला सर्वांत मोठा गँगस्टर म्हणून उदयाला आला. त्याने गुन्हेगारी क्षेत्रात पाऊल ठेवले. हाजी मस्तान आणि वरदराजन यांच्याशी संबंध प्रस्थापित केले. पुढे त्याचे नेटवर्क वाढत गेले.

डी गँगने मुंबईतच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर पाय रोवले. पुढे त्याने सर्वांत धोकादायक प्रतिस्पर्धी छोटा राजनसोबत गाठ बांधली. १९९३च्या बॉम्बस्फोटानंतर छोटा राजननी दाऊदची साथ सोडली. त्यातून छोटा राजन विरुद्ध दाऊद यांच्यात गँगवॉर सुरू झाले. या सगळ्या कालावधीमध्ये मुंबईत भरदिवसा खून होत होते. याच काळात अरुण गवळी हा मुंबईतील आणखी एक मोठा गँगस्टर पुढे आला.

१९९० च्या दशकाच्या शेवटी मुंबई पोलिसांनी गँगवॉर थांबवण्यासाठी एन्काउंटरची रणनीती आखली. त्यात अनेक गुंडांना ठार करण्यात आले. ज्यात लखन भैया, सुभाष ठाकूर, रवी पुजारी यासारख्या अनेक गुंडांचा समावेश होता. या रणनीतीमुळे काही प्रमाणात गँगवॉर थांबले. २००० या दशकात पोलिसांच्या कडक कारवाया, अनेक गँगस्टरचे मृत्यू किंवा अटक यामुळे गँगवॉरची तीव्रता कमी झाली, पण या सगळ्यात मुंबईतील गँगवॉरचा इतिहास भयंकर आणि हिंसक असा लिहिला गेला.

मूळ काँग्रेसचे आणि अजित पवार गटात गेलेले माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांचा खेरवाडी परिसरात गोळ्या घालून खून करण्यात आला. मुंबईत कोणालाही गँगवॉर करू देणार नाही, कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तत्काळ दिला. त्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा गँगवॉर हा शब्द चर्चेत आला आहे. गेल्या वर्षभरात मुंबई, ठाण्यात ज्या पद्धतीच्या घटना पाहता, हे आधुनिक गँगवॉर कोणते रूप धारण करेल हे कोणीही सांगू शकणार नाही.

शिंदे गटाचे नेते सदा सरवणकर यांनी गणपतीच्या काळात हवेत गोळीबार करून गोळीबाराचाच श्रीगणेशा केला म्हणायला हरकत नाही. त्यानंतर ठाण्यात भाजप आ. गणपत गायकवाड यांनी कल्याण पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला होता. त्यातून एक जण मरता मरता वाचला. उद्धवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर त्यांच्याच कार्यालयात फेसबुक लाइव्ह चालू असताना गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आरोपीने नंतर स्वतःवरही गोळ्या झाडून घेतल्या. चुनाभट्टी येथे अनेक वर्षे जेलमधून बाहेर आलेल्या पप्पू एरोणकर याच्यावर खुनी हल्ला केला. त्यात त्याचा मृत्यू झाला. अभिनेता सलमान खानच्या घरावर लॉरेन बिश्नोई गँगकडून गोळ्या झाडण्यात आल्या. काही दिवसांपूर्वी अजित पवार गटाचे नेते सचिन मुन्ना कुर्मी यांच्यावरती मेणांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात त्यांचा मृत्यू झाला आणि दसऱ्याच्या दिवशी संध्याकाळी बाबा सिद्दिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. यामागे एसआरए प्रकरणाचे धागेदोरे असल्याचे बोलले जाते. मुंबईमध्ये एसआरए प्रकल्पात अनेक घोटाळे आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी म्हाडा आणि एसआरएमधील भ्रष्टाचार थांबविण्यासाठी म्हाडाच समुद्रात बुडवले पाहिजे, असे विधान केले होते. एसआरएमध्ये कितीही भ्रष्टाचार असला, तरी कोणी कोणाचा जीव घेईल, अशी घटना आजपर्यंत घडलेली नाही. यामागे बिश्नोई गॅंगचे कनेक्शन आहे की एसआरए प्रकरण हे चौकशीतून समोर येईल.

मात्र, मुंबईत ज्या काही घटना घडामोडी घडत आहेत, ते पाहता विधानसभा निवडणुकीत महामुंबईत हाणामाऱ्या, गोळीबार याचे सत्र सुरू होईल की काय? अशी भीती सर्वसामान्य नागरिकांना वाटत आहे. फार पूर्वी भाजप जाहिरात करताना “कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा” अशी टीका काँग्रेसवर केली होती. हेच वाक्य आता काँग्रेसचे नेते भाजप नेत्यांना विचारत आहेत. ज्या पद्धतीने सध्या महाराष्ट्रात घटना घडत आहेत ते पाहिले, तर सामान्य माणसाने भयचकित व्हावे, असे वातावरण आहे.

एखाद्या उद्यानात किंवा पार्कात सकाळी पायी फिरताना आजूबाजूचे लोक राजकारणाशिवाय व्यक्तिगत आयुष्यावर, खाण्यापिणे, नाटक, सिनेमा, स्वतःची मुलं-बाळ या विषयावर जास्त बोलतात. कोणालाही राजकारणावर बोलायची इच्छाच उरलेली नाही. एकमेकांच्या विरुद्ध टोकाची असूया आणि दुश्मनीची भावना वाढीला लागली आहे. तुला बघून घेईल, अशी भाषा एकमेकांविरुद्ध नेते सर्रास वापरताना दिसत आहेत. हा असा महाराष्ट्र कधीच नव्हता.

मुंबईत एखादी दुर्घटना घडली तर लोक मदतीसाठी धावून जातात. बॉम्बस्फोट असो की २६/११ सारखी घटना; मुंबईकर पुन्हा नव्या जोशाने उभे राहतात. मुंबईकरांचे स्पिरिट म्हणून त्याचे कौतुकही होते. मात्र, लोकांमधल्या स्पिरिटची जागा आता भीतीने घेतली आहे. काही घडले आणि आपण मदत करायला जावे, तर आपले बरे-वाईट होईल का? अशी भीती प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात आहे. पोलिस विभागाचे अती राजकीयकरण झाले आहे. जिथे तीन पक्ष होते, तिथे आता सात पक्ष झाले आहेत. पोलिस अधिकारी नेत्यांना खेळवत आहेत की नेते पोलिसांना… हे कळायला मार्ग नाही. हे वेळीच थांबवावे लागेल, नाहीतर पुरोगामी महाराष्ट्र इतिहासातच शोधावा लागेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *