रविवार, २२ डिसेंबर २०२४
22 December 2024

मुंबईत ठाकरे गटच मोठा भाऊ

अतुल कुलकर्णी / मुंबई डायरी

विधानसभेच्या मुंबईतील ३६ जागांपैकी सर्वाधिक २० ते २२ जागा उद्धव ठाकरे शिवसेना तर १२ ते १३ जागी काँग्रेस उमेदवार उभे करेल. एक जागा समाजवादीला तर एक शरद पवार गटाला दिली जाईल. असा फॉर्म्युला पुढे आला आहे.
ठाकरे गटाचे १५ पैकी ८ आमदार मुंबईतील आहेत. त्यात आदित्य ठाकरे (वरळी), अजय चौधरी (शिवडी), संजय पोतनीस (कलीना), सुनील प्रभू (दिंडोशी), ऋतुजा लटके (अंधेरी पूर्व), रमेश कोरगावकर (भांडुप), सुनील राऊत (विक्रोळी) आणि प्रकाश पातर्फेकर (चेंबूर) यांचा समावेश आहे. काँग्रेसचे मुंबईत ४ आमदार आहेत. त्यात अमीन पटेल (मुंबादेवी), वर्षा गायकवाड (धारावी), झिशान सिद्दिकी (बांद्रा पूर्व) आणि असलम शेख (मालाड पश्चिम). वर्षा गायकवाड लोकसभेवर निवडून आल्यामुळे आणि झिशान सिद्दिकी अजित पवार गटात गेल्यामुळे या दोन जागा काँग्रेसकडे सध्या नाहीत.

नसीम खान यांच्यासाठी चांदिवली मतदार संघ काँग्रेसला हवा आहे. त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंकडून निवडून आलेले दिलीप लांडे शिंदे गटात आहेत. वर्सोव्याचा मतदारसंघ काँग्रेसला माजी मंत्री सुरेश शेट्टी यांच्यासाठी हवा आहे. या जागी भाजपच्या भारती लव्हेकर विद्यमान आमदार आहेत. ठाकरे गटाने हे दोन मतदारसंघ काँग्रेससाठी सोडायची तयारी दर्शवली आहे. वर्सोव्यात उद्धव ठाकरे गटाकडे राजूल पटेल, यशोधर फणसे ही दोन नावे आहेत मात्र सुरेश शेट्टींसाठी हा मतदार संघ काँग्रेसला दिला जाईल, असे सांगितले जाते.

कुलाबा मतदारसंघातून भाजपचे राहुल नार्वेकर तर भायखळामधून शिंदे गटाच्या यामिनी जाधव विद्यमान आमदार आहेत. कुलाबा मतदारसंघही ठाकरे गटाने काँग्रेससाठी द्यायची तयारी दर्शवली आहे. काँग्रेसकडे या मतदारसंघासाठी ॲॅड. रवी जाधव, पुरण दोशी, हिरा देवासी असे काही उमेदवार आहेत. यामिनी जाधव लोकसभेत हरल्या. विधानसभेतही शिंदे गटाचा पराभव करण्यासाठी भायखळा मतदारसंघ उद्धव ठाकरे यांना हवा आहे. त्यासाठी त्यांच्याकडे मनोज जामसुदकर, रमाकांत रहाटे, गीता गवळी हे तीन उमेदवार आहेत. ठाकरे गटाने जामसुदकर यांच्यासाठी या जागेचा आग्रह धरला आहे. जोगेश्वरी पूर्वमधून अमोल कीर्तिकर यांच्या उमेदवारीसाठी शिवसेनेत चर्चा आहे. वांद्रे पूर्व काँग्रेसने ठाकरे यांच्यासाठी सोडल्याने त्यांच्याकडून रश्मी ठाकरे यांच्या बहिणीचे चिरंजीव वरूण सरदेसाई यांना उमेदवारी देण्याचे निश्चित केले आहे. आ. अनिल परब यांनी एका कार्यक्रमात सरदेसाईंचे नाव जाहीर केले आहे.

अंतिम निर्णय दिल्लीतूनच होणार
आज काँग्रेसच्या सल्लागार मंडळाची बैठक मुंबईत होणार आहे. मुंबईत विषय बऱ्यापैकी पुढे गेला असला तरी, संजय राऊत, नाना पटोले यांच्यातील वादात महाविकास आघाडीत तणावात असल्याच्या बातम्या आल्या. पण अंतिम निर्णय दिल्लीतून होईल, असे दोन्ही बाजूने सांगितले जात आहे.

३६ पैकी ४ जागा काँग्रेस लढविणार?
ठाण्यातल्या १८ पैकी ऐरोली, भिवंडी पश्चिम, तर पालघरमधील वसई, मीरा-भाईंदर अशा ४ जागा काँग्रेसने तर उरलेल्या सर्व जागा उद्धव ठाकरे गटाने लढवाव्यात यालाही तत्वतः मान्यता देण्यात आली आहे. रायगडमधील उरणची आणि रत्नागिरीमधील लांजा-राजापूर या दोन जागा काँग्रेसने मागितल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *