शनिवार, ४ जानेवारी २०२५
4 January 2025

चिऊताई चिऊताई दार उघड, थांब माझ्या लेकराला…

मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी

‌गेले काही दिवस मुंबईकर (Mumbaikar) धुळीत अडकून गेले आहे. श्वासाचे आजार वाढल्यामुळे हॉस्पिटल्समध्ये रुग्णांची गर्दी आहे. रस्त्यावर फिरताना श्वास घेणारा प्रत्येक मुंबईकर श्वासासोबत नायट्रोजन ऑक्साईड, ओझोन, सल्फर डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड आणि पार्टिक्युलेट फुकटात सेवन करत आहेत. कोमॉर्बिडिटी असणारे मुंबईकरही या फुकटच्या सेवनाने मोठ्या आजारांना सामोरे जात आहेत. जे काही आपल्या शरीरात जात आहे त्यामुळे आपल्या पुढे कोणत्या आजारांची मालिका वाढवून ठेवली आहे, याची कल्पनाही करता येणार नाही. इतके गंभीर आजार यामुळे मुंबईकरांना होऊ घातले आहेत. मुंबईचे ६० ते ७० टक्के प्रदूषण (Mumbai Pollution) बेसुमार सुरू असलेल्या बांधकामांमुळे आणि जागोजागी होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे होत आहे.

मुंबई आयआयटीने (Mumbai IIT) काढलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. मुंबईत मुंगीच्या गतीने चालणाऱ्या गाड्या, ठिकठिकाणी होणारी वाहतूककोंडी यामुळे १० लाखापासून २ कोटीच्या कारपर्यंत सगळ्यांचा ॲव्हरेज स्पीड दहा ते बारा किलोमीटर प्रतितास आहे. रस्त्यात गाड्या तासनतास थांबून राहतात. थांबलेल्या गाड्या दूर सोडतात. त्यातून होणारे प्रदूषण इथल्या हवेत मिसळते. जर मुंबईची वाहतूक सुरळीत झाली आणि गाड्या ३० किलोमीटर प्रतिघंटा या वेगाने धावू लागल्या तरी ही प्रदूषण कमी होण्यास मदत होऊ शकते. हा निष्कर्ष केवळ फाइलीत न ठेवता त्याची अंमलबजावणी करण्याचे काम वेगवेगळ्या विभागांचे आहे. या प्रकरणात वाहतूक सुरळीत होण्याचे काम एकट्या वाहतूक पोलिसांचे नाही. त्याला महापालिकाही तेवढीच जबाबदार आहे. लोकांना चालण्यासाठी फुटपाथ उरलेले नाहीत. त्यावर लाखो फेरीवाल्यांनी स्वतःचे दुकान थाटले आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग हा मुंबईचा कधीही न सुटणारा प्रश्न बनला आहे. त्याच्या जोडीला मेट्रो, मोनो अशा वेगवेगळ्या मार्गाने रस्ते खोदून ठेवले आहेत. प्रत्येकाने आपली जबाबदारी नीट पार पाडली तरीही हे प्रश्न पूर्णपणे सुटणार नाहीत, मात्र काही प्रमाणात याची तीव्रता कमी होईल. पण करायचे कोणी, हा प्रश्न प्रत्येक विभागाने स्वतःला विचारायचा आहे.

फेरीवाले नियंत्रणात आणले तर फुटपाथवरून चालायला जागा राहील. त्या ठिकाणी होणाऱ्या काही टक्के प्रदूषणाचे प्रमाण कमी होईल. रस्त्याच्या दुतर्फा थांबलेल्या गाड्या वाहतूक विभागाने निर्दयपणे हटवल्या तर वाहतूक सुरळीत होईल. वाहतूक सुरळीत झाली तर वाहनांमुळे होणारे प्रदूषण नियंत्रणात येईल. मुंबईत ८५० बेकऱ्या आहेत. त्यापैकी ६० ते ७० बेकऱ्या सीएनजीवर चालतात. बाकी ठिकाणी जे जळू शकते ते सगळे साहित्य वापरून बेकऱ्या चालवल्या जातात.

५० ते ६० हजार तंदूर भट्ट्या कोळसा आणि लाकूड वापरून मुंबईकरांना तंदूर रोट्या खायला देतात. कोणी कोणावर नियंत्रण आणायचे? कोणी कोणाला जाब विचारायचा..? प्रत्येक जण आपण कसे बरोबर आहोत एवढेच सांगत राहतो. आपल्या दिशेने आलेला चेंडू दुसऱ्या दिशेला कसा टोलवायचा याच कामात प्रत्येक विभाग असतो. महापालिका आणि पोलिसांनी ठरवले तर आठ दिवसात मुंबईतले अतिक्रमण, बेकायदा पार्किंग, कोळशावर चालणाऱ्या भट्ट्या बंद होऊ शकतात. नियम धाब्यावर बसवून चालू असलेल्या बांधकामांना धडा शिकवता येतो. पण ते का होत नाही हे ओपन सिक्रेट आहे. हे म्हणजे लहान मुलांच्या काऊ चिऊच्या गोष्टी सारखे आहे. कावळा चिमणीच्या घरात येतो. चिमणीवर प्रेम दाखवत चिऊताई चिऊताई दार उघड असे म्हणतो. चिमणी हुशार असते. कावळ्याचा हेतू ती ओळखते. त्यामुळे दार न उघडता ती आतूनच, थांब माझ्या लेकराला अंघोळ घालू दे… थांब माझ्या लेकराला कपडे घालू दे… थांब माझ्या लेकराला भात खाऊ दे… असे म्हणत राहते. कंटाळून कावळा उडून जातो… आणि चिमणीचा हेतू साध्य होतो… अशी गोष्ट लहानपणी शाळेत शिकवली जायची. हे शिकवता शिकवता आजी किंवा आई मुलांना न आवडणारे पदार्थही हळूच खाऊ घालायची… वाहतूक विभाग, महापालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ हे सगळे आपापल्या जागी चिमणीच्या भूमिकेत आहेत. या महानगरीत राहणारे लोकांना त्यांनी कावळे करून टाकले आहे…

लोकांनी रस्त्यावर खड्डे आहेत सांगितले, की महापालिका एमएमआरडीएकडे बोट दाखवते. प्रदूषण वाढले अशी ओरड झाली की वाहतूक किती वाढली असे उत्तर देते. वाहतूकवाल्यांना विचारले की ते फेरीवाल्यांकडे बोट दाखवतात. प्रदूषण नियंत्रण मंडळाला विचारले की ते महापालिका आणि वाहतूक विभागाला पाठवलेल्या नोटिसा दाखवतात… भांबावलेला मुंबईकर कधी महापालिकेकडे, कधी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तर कधी वाहतूक पोलिसाकडे बघत राहतो… या सगळ्यातून दिवस काढताना त्याला श्वास घेणे कठीण होत जाते… मग तो डॉक्टरकडे जातो. डॉक्टर प्रदूषणाची भीती दाखवून महागडी औषधे त्याला देतात… औषध घेऊन घरी आराम करणारा मुंबईकर सगळ्या व्यवस्थेला शिव्या शाप देत गप गुमान पडून राहतो…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *