शनिवार, १९ एप्रिल २०२५
19 April 2025

मुंबईत काँग्रेसचे पाच नगरसेवक तरी निवडून येतील का?

मुक्काम पोस्ट महामुंबई/ अतुल कुलकर्णी 

मुंबईत काँग्रेसचे अस्तित्व आहे का? असा प्रश्न पक्षाच्या नेत्यांनाच पडला आहे. मुंबई काँग्रेसमध्ये नवीन काही घडताना दिसत नाही. कुर्ल्यातील मदर डेअरीमध्ये बोटॅनिकल गार्डन करणे, सायन पुलाच्या अनास्थेविषयीची निदर्शने, गावठाण आणि कोळीवाड्यांची ओळख ठेवून पुनर्विकास धोरण जाहीर करा, अशा काही मोजक्या गोष्टी सोडल्या तर काँग्रेसला बळकटी मिळेल, असे कोणतेही आंदोलन, कार्यक्रम मुंबईत झाले नाही, हे काँग्रेसचेच नेते मान्य करत आहेत.

गेल्या दोन ते तीन महिन्यांत मुंबई काँग्रेस फक्त धारावी आणि अदानी या मुद्द्यापुरतीच सीमित राहिली आहे का? अशी शंका वाटावी, इतपत परिस्थिती आहे. मुंबईतील रस्त्यांची कामे, नालेसफाई, महापालिकेतील भ्रष्टाचार यावर आंदोलने व्हायला हवी होती, ती झाली नाहीत. आंदोलने झाली नाहीत, तर पक्षाला उभारी कशी येणार?

औरंगजेब, कुणाल कामरा, दिशा सालियन, राहुल सोलापूरकर, प्रशांत कोरटकर हे आणि असेच विषय मुंबईच्या माध्यमांमध्ये, राजकारण्यांमध्ये चर्चेत राहिले. एखादा मुंबईकरांच्या जिव्हाळ्याचा विषय घेऊन मुंबई ठप्प करणारे किंवा मुंबईकरांचे लक्ष वेधून घेणारे एकही आंदोलन गेल्या काही महिन्यात मुंबई काँग्रेसने केले नाही. त्यासाठी मुंबई काँग्रेस रस्त्यावर उतरली, असे चित्र नाही. त्या उलट आदित्य ठाकरे वेगवेगळ्या प्रश्नांवर अधिकाऱ्यांना, मंत्र्यांना भेटत आहेत. छोटी-मोठी आंदोलने करत आहेत. ज्या विषयावर आदित्य ठाकरे यांनी आंदोलन केले, त्या विषयावर संबंधितांना पत्र देण्यापलीकडे मुंबई काँग्रेस काही करताना दिसत नाही. माजी अध्यक्ष भाई जगताप आणि विद्यमान अध्यक्ष खा. वर्षा गायकवाड यांच्यातील वादात कोणीही मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद घ्यायला तयार नाही.

मुंबई काँग्रेसला विभागीय काँग्रेस कमिटीचा दर्जा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवकपदासाठी उमेदवारांना पक्षाचे एबी फॉर्म देण्यापलीकडे त्यांना दुसरा अधिकार नाही. मुंबईचे जिल्हाध्यक्ष, उपाध्यक्ष, ब्लॉक काँग्रेस कमिटीसाठी पक्षाच्या प्रभारींकडे फक्त नावे सुचवण्याचा अधिकार मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षांना आहे. निवडणुकीचे अधिकार पक्षाच्या प्रभारींना आहेत. या पलीकडे मुंबई काँग्रेसला तसे फार अधिकार नाहीत. मात्र, या आधीच्या कितीतरी अध्यक्षांनी आपल्या कामातून मुंबई काँग्रेसचा वेगळा ठसा निर्माण केला होता. तो आता होताना दिसत नाही. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीत मुंबईचाही समावेश आहे.

मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष हे प्रदेश काँग्रेस कमिटीमध्ये उपाध्यक्ष असतात. याचा अर्थ महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हे राज्यासाठी सर्वोच्च आहेत. असे असताना ते मुंबईत फारसे लक्ष घालत नाहीत. मुंबईच्या अध्यक्षांना मुंबई काँग्रेस स्वतंत्र आहे, या नावाखाली प्रदेशाध्यक्षांचा हस्तक्षेप चालत नाही. त्यामुळेच आजपर्यंत कुठल्याही प्रदेशाध्यक्षांनी मुंबईत लक्ष घातले नाही.

२००९ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत मुंबईत काँग्रेसचे ५ खासदार आणि १६ आमदार होते. २०२४ मध्ये काँग्रेसचे ३ आमदार आणि १ खासदार उरला आहे. २००७ मध्ये मुंबईत काँग्रेसचे ७५ नगरसेवक होते. २०१७ ला ते ३२ वर आले. ज्या पद्धतीचे वातावरण आज आहे ते पाहिले, तर महापालिका निवडणुका होतील तेव्हा ५ नगरसेवक तरी निवडून येतील का, असा प्रश्न काँग्रेस नेत्यांच्याच मनात आहे.

मुंबई प्रदेश कार्यालयाचे भाडे थकले आहे. कॅन्टीनचे पैसे, वीजबिल, कर्मचाऱ्यांचा पगार यातला विलंब चिंताजनक आहे. मुंबई काँग्रेसवर ५० ते ६० लाख रुपयांचे कर्ज आहे. त्यामुळे स्वतःहून कोणी मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष पद मागायला तयार नाही. पद घ्यायचे आणि जुन्या नेत्यांनी करून ठेवलेले कर्ज फेडायचे, हा व्यवहार कोणालाही मान्य नाही.

विधानसभा निवडणुकीत मुंबईतील उमेदवारांनी भरलेले डिपॉझिट देखील मुंबई काँग्रेसने प्रदेशाध्यक्षाकडून भांडून घेतले होते. पक्षाचे प्रभारी येतात. सूचना देतात, पण त्याची पुढे अंमलबजावणी होते की नाही, याकडे कुणाचे लक्ष नाही. महापालिका निवडणुकांसाठी कोणतीही पूर्वतयारी नाही. कोणत्या वार्डातून कोणाला उभे करायचे याचे नियोजन नाही.

विधानसभा निवडणुकीपूर्वी आणि नंतर काही नेत्यांनी पक्ष सोडला. त्या पदावर काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्याची लगेच नेमणूक करायला हवी होती, पण तेही झाले नाही. दोन-दोन वर्षे काही जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष यांच्या रिक्त पदांवर नियुक्त्या नाहीत. जिल्ह्याध्यक्ष फक्त नावापुरते उरले आहेत. त्यांना पक्षाकडून कोणताही कार्यक्रम दिला जात नाही.

सध्या कुणी कुणाचे तोंड बघायला तयार नाही, अशा भावना अनेक नेते बोलून दाखवतात. पण उघडपणे कोणीही स्पष्ट बोलायला तयार नाही. शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत शिल्लक नाही. अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधून एकमेव सना मलिक निवडून आल्या, त्यात नवाब मलिकांचे श्रेय जास्त. त्यामुळे येत्या काळात मुंबईमध्ये भाजप विरुद्ध दोन शिवसेना अशीच लढाई झालेली दिसली, तर आश्चर्य नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *