आमचे गुरुजी आणि चिंटूचे सर…
चिंटू तुला काय सांगू आमच्या गुरुजींचं कौतूक… अरे आमचे गुरुजी समोरुन चालले तर आडवं जायचं हिम्मत व्हायची नाही आमची…
पण बाबा, आमचे सर समोर आले तर आम्ही त्यांना काय, सर, नवीन शर्ट दिसतोय असं विचारतो… तुम्ही घाबरत होतात का तुमच्या गुरुजींना…
अरे चिंटू, आमच्या मनात आदर असायचा त्यांच्याबद्दल…
यू मीन रिस्पेक्ट… तो तर असतो ना बाबा. पण त्यासाठी समोर जायचं नाही म्हणजे जरा अती वाटत नाही का…
अरे आमचे गुरुजी कधीही कोणत्याही मुलाला कुठे अभ्यासात अडचण झाली तर घरी बोलावून शिकवायचे. समजावून द्यायचे. म्हणून आम्ही अभ्यासात हुषार…
पण बाबा, तुमचे गुरुजी फुकटात शिकवायचे. त्यामुळे त्याची किंमत नव्हती तुम्हाला. आमचे सर पहा, शाळा सुटली की थेट ट्यूशन घ्यायला जातात. मी त्यांच्या ट्यूशनला असल्यामुळे मला वर्गात चांगली वागणूक मिळते शिवाय त्यांचे विशेष लक्ष असते माझ्याकडे.
चिंटू आमच्या गुरुजींना कोणी शिकवणी लावल्याची माहिती जरी मिळाली तरी ते त्याला उभं आडवं फोडून काढायचे…
पण बाबा माझा मित्र मोंटू आमच्या सरांकडे ट्यूशनला येत नाही तर सर त्याला मारतही नाहीत आणि त्याच्याकडे ढूंकून पहात देखील नाहीत…
अरे आम्ही डब्बा खाताना बाजूने गुरुजी चाललेले असले तर आमच्या डब्यातला एक घास खाऊन बघायचे. सकाळचा डब्बा; दुपारपर्यंत खराब झाला असेल तर स्वत:जवळचा डब्बा द्यायचे…
बाबा, आमचे सर असलं काही करत नाहीत बरंका… आणि आता शाळेत खिचडी मिळते आम्हाला. आमचे सर, आम्हाला थोडी खिचडी देतात आणि बाकी खिचडीचं सामान त्यांच्या मुलांसाठी घरी देखील नेतात. त्यांच्या मुलांना नको का खिचडी सांगा बरं…
अरे पण चिंटू आमच्या गुरुजींचं अक्षर मोत्यासारखं होतं. ते आम्हाला पाटीवर लिहून द्यायचे आणि तसचं गिरवायला लावायचे… म्हणून तर माझं अक्षर सुंदर आहे आणि त्यामुळे माझं किती कौतूक होत असतं सगळीकडे…
बाबा काय फन करतायं… अहो आमच्या सरांनी बोर्डवर लिहीलेलं त्यांनाच परत वाचता येत नाही. ते मग आम्हाला विचारतात सांगा, हे काय आहे… नाही सांगितलं की लगेच पुसून टाकतात आणि दुसरचं काहीतरी लिहीतात…
चिंटू अरे आम्हाला गुरुजी पाढे पाठ करुन घ्यायचे. अगदी पावकी पर्यंत…
हे काय असतं बाबा, आमचे सर तर पटकन मोबाईल काढतात खिशातून. त्यातल्या कॅल्क्यूलेटरवर हिशोब करतात आणि सांगतात आम्हाला… आणि बाय द वे बाबा, आता पावकी म्हणजे काय हो…
पण काय रे चिंटू, आई सांगत होती, तू काल सुपारी खाल्लीस म्हणून… बरोबर नाही हे राजा…
बाबा, आता त्यावरुन नका सांगू आमचे गुरुजी देखील सुपारी खात नव्हते म्हणून…
अरे खरचं. आमचे गुरुजी कधी सुपारी खायचे नाहीत, आमची काय टाप होती त्यांच्या समोर असं करायची…
पण यू नो बाबा, आमचे सर तर आम्हालाच सुपारी, सिगारेट आणायला सांगत असतात. उगाच आता बंद करा बरं तुमच्या गुरुजींचं पुराण… मला सिरीयल पहायचीयं…
Comments