टेस्टिमोनियल

उद्धव ठाकरे
या सदरातचा उपहासात्मक परिचय तसा आमचा नवा नाही. अधूनमधून आम्ही देखील याचा आस्वाद घेत असतो. राजकीय उपहास त्याचा लहेजा कायम राखून मांडण्याची आपली पध्दत वेगळी आणि चांगली आहे. राजकारण्यांना चिमटे काढण्याचा छंद आपण चांगला जपला आहे. काही वेळेला आपली टीका बोचरी होत असली तरी त्यामुळे राजकारण्यांतील माणुसकी जागावी हा आपला सदहेतू असल्याने त्याबाबत फारसं कोणाला वाईट वाटत नसावे. या सदरातून आपली प्रगल्भता आणि अभ्यास नियमीतपणे दिसतो. जागल्या म्हणून काम करणारा आपला दादासाहेब वाचनाचा मनमुराद आनंद देऊन जातो.

शरद पवार
अतुल कुलकर्णी यांचं ‘लोकमत’मधील अधून मधून सदर हे नियमितपणे वाचनात येते असं नाही. पण जेव्हा केव्हा वाचलं जातं तेव्हा ते मनाला भावतं, हृदयाचा ठाव घेतं आणि समाजहितास्तव जागतं असं हे लिखाण सातत्यानं चालू राहिलं पाहिजे असं मला वाटतं. अचूकपणे उणिवा, दोषांवर बोट ठेवून नर्मविनोद शैलीतल्या या लेखनाने माणसांची मनं दु:खी होणार नाहीत पण त्यांच्या विचार व कर्म करण्याच्या पध्दतीत निश्चित बदल होईल, असा विश्वास मला वाटतो. कुलकर्णीनीं लेखणीतून सतत चांगला पहारा ठेवावा.

राज ठाकरे
हे लिखाण खुसखुशीत, नर्मविनोदी आणि व्यंगात्मक असल्याने वाचनीय आणि लोकप्रिय आहे. सामान्य माणसाच्या आयुष्यात असलेली दु:ख आणि वेदना यांना टीकात्मक अथवा विनोदाची फोडणी देऊन आपण एक प्रकारे दांभीक राजकीय मुखवटाच जनतेसमोर आणता. खरे म्हणजे अशा उपहासात्मक लिखाणातून महाराष्ट्रातील नेत्यांनी राजकीय शहाणपणच शिकले पाहिजे. यापुढेही राजकारणातील व्यंगाला आणि ढोंगाला उघडे पाडून आपण असेच लेखन करीत रहावे. जेणेकरुन महाराष्ट्रातील जनतेची सामाजिक आणि सार्वजनिक जीवनातील प्रगल्भता वाढेल.

आर आर पाटील
अतुल कुलकर्णी यांनी मला सत्तेत नसतानाही कार्यक्रमाला बोलावले. ते देखील ज्या घटनेमुळे माझे मंत्रीपद गेले त्याच घटनेवरील पुस्तकाच्या प्रकाशनाला. पुस्तकात देखील त्यानी वस्तूस्थिती मांडताना मला कोठेही माफ केलेले नाही. अभ्यासू वृत्तीने पत्रकारिता करणार्यांचे प्रमाण दिवसेन्दिवस कमी होत असताना अतुल कुलकर्णी यांची पत्रकारिता माझ्या सारख्या राजकारण्यांना कायम महत्वाची वाटत आली आहे.
(26/11 ऑपरेशन मुंबई पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीच्या भाषणातून)

विजय जे. दर्दा
अधून मधून हे सदर मला व्यक्तिगत खूप आवडले. त्यामुळे मी लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांना सांगून हे सदर लोकमत व लोकमत समाचारच्या सर्व आवृत्त्यांना प्रकाशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. माझा निर्णय अतुलने त्याच्या लिखाणातून योग्य ठरवला याचे मला कौतूक आहे. राजकीय, सामाजिक घटना घडामोडींवर उपहासात्मक व वंगात्मक लिखाण आता कमी होत चालले आहे. अशा काळात अतुलने ही शैली जोपासली आहे. ज्या गोष्टीची बातमी होत नाही पण त्या गोष्टी समोर याव्या वाटतात त्या त्याने या सदराच्या माध्यमातून मांडल्या व लोकांना राजकारण्यांची दुसरी बाजूही दाखविली आहे. सुदैवाने आजचे राजकारण आणि समाजकारण ही दोन्ही क्षेत्रे उपहास आणि व्यंग यांना प्रोत्साहन देणारीच ठरत आहेत. नेत्यांचे वागणे आणि बोलणे यातील अंतर, समाजाची नीतीमुल्ये आणि त्याची प्रत्यक्ष वर्तणूक व आदर्श आणि व्यवहार यात निर्माण होत असलेले अंतर हे सर्व विनोदी व विडंबनकार लेखकांसमोर असलेले चांगले व आमंत्रक आव्हान आहे. अतुलने हे आव्हान आणखी जोरात स्वीकारावे व महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक जीवन पारशर्दक होईल यासाठी प्रयत्न करावा.

अभिनंदन थोरात
महाराष्ट्रातील तरुण, अभ्यासू व धडाडीचे पत्रकार अतुल कुलकर्णी यांनी औरंगाबादहून मुंबईला येऊन पत्रकारितेत आपला वेगळा ठसा उमटवला आहे. राज्यातील राजकारण्यांची व या क्षेत्रात घडणार्या अनेक बारीकसारीक घटनांची नोंद घेऊन त्यावर अधूनमधून नावाचे एक खुमासदार व्यंग सदर ते लोकमतमध्ये लिहीत आहेत. यात अनेक नेत्यांच्या गुणदोषांचे परखड विश्लेषण व्यंगात्मक शैलीत त्यांनी सादर केल्याने त्याची लोकप्रियता वाढली आहे. असे व्यंगात्मक लिखाण करताना कधी तोल जाऊन कडवट अर्थ निघणारे लिखाण होईल सांगता येत नाही पण सुदैवाने अतुल यांनी हे लिखाण करताना आपला समतोल भाव कायम राखला हे विशेष. यातील लेख कधीही वाचले तरी परत परत वाचावेसे वाटतात यात शंका नाही.

राजीव खांडेकर
“भेदक… पण रसरशीत, तिरकस… पण खुसखुशीत,
बोचरं… पण न दुखणारं, टोचणारं असूनही हवहवसं वाटणारं…
अतुल कुलकर्णींच्या ‘अधूनमधून’ची ही वैशिष्ट्य आहेत. दर आठवड्याला असं लिहिणं ही सोपी गोष्ट नाही….”

जे.फ.रिबेरी
२६/११ ऑपरेशन मुंबई पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगीच्या भाषणातून
२६/११ हे पुस्तक एक आरसा आहे, काय घडले, कसे घडले याचा हा मोठा दस्तावेज आहे. असे लिखाण कधीही जूने होत नाही. त्यातील अनेक गोष्टी या सिस्टीमवर प्रहार करणा:या आहेतच शिवाय त्यात काय व्हायला हवे हे देखील सांगणा:या आहेत. हे पुस्तक म्हणूनच अत्यंत महत्वाचे असे पुस्तक आहे.”