अॅडमिशन कोणाचे, ताप कोणाला?
मंडळी आवरा लवकर… वेळेवर गेलो नाही तर ते कोचिंग क्लासवाले अॅडमिशन देणार नाहीत. मग बसावं लागेल घरातच अभ्यास घेत…
निघाले हो… जरा म्हणून दम नाही. सगळा वेळ तुमच्या हातात हातात देण्यात गेला… माझा शर्ट कुठायं… सॉक्स कुठयतं… लेस कुठयं… आणि पुन्हा माझ्या नावानं बोटं मोडता… अण्णा येऊ द्यात घरी. मग सांगते की नाही बघा…
मला नको देऊस अण्णांची धमकी. मी काय सरकार वाटलो काय अण्णाना घाबरायला… ते देखील मावशीला असंच म्हणत असतात… माझा झब्बा कुठयं… माझी काठी कुठयं…
कुठे ते अण्णा आणि कुठे तुमचे अण्णा… हे आपले बसतील पेपरात तोंड खुपसून. सगळ्या जगाची दुखणी वाचत, आणि ते, सगळ्या जगाच्या दुखण्यावर इलाज करायला गेलेत… कधी कामी येतील कोणास ठावूक तुमचे अण्णा…
अगं असा त्रागा कशाला करतेस. आपल्या अण्णांचं वय झालयं. सगळं आयुष्य त्यांचं साहेबांच्या पुढे पुढे करण्यात गेलं. नोकरीच तसली. कधी प्रमोशन मिळालं नाही की कधी बॉसगिरी करायला भेटली. बिचारे अण्णा… तरीही आम्हा पोरांना वाढवलं. मला चांगला सहकारी बँकेत हेडक्लर्क केला… पै पै करुन फ्लॅट घेतला म्हणून आपण आता सुखानं राहू तरी शकतो. आणखी काय करायला हवं त्यांनी… असतं एखाद्याचं नशीब… त्याला काय करणार कोण…
बरं, आता नका लेक्चर देत बसू… चला. पुन्हा अॅडमिशन नाही मिळाली तर माझ्या नावानं बोटं मोडायला मोकळे आहातच…
(शामराव आणि सौभाग्यवती कोचींग क्लासच्या कार्यालयात पोहोचतात…)
काय नाव मुलाचं…
चैतन्य शामराव…
बास… बास… मासिक उत्त्पन्न किती…
अहो अजून शिकला नाही तर नोकरी कशी लागेल…
मी त्याचं नाही तुमचं उत्त्पन्न विचारतोय.
ग्रॉस तीन लाख साठ हजार…
अन्य काही मार्गाने…
छे हो, वेळच मिळत नाही नोकरीतून…
पण फी कशी भरणार तुम्ही… वर्षाला दीड लाख भरावी लागेल… तुमचा तर पगार तेवढा नाही…
होईल व्यवस्था. अण्णांना सांगेन… ते देतील काही पैसे…
काय म्हणालात… अण्णांना सांगता. अण्णा कोण तुमचे…
कोण म्हणजे काय… वडील माझे. याचे आजोबा… पण हल्ली खूप बिझी आहेत ते.
अहो आधीच नाही का सांगायचं… अण्णा तुमचे पिताश्री आहेत ते…
तुम्ही कुठे पूर्ण नाव सांगू दिलं…
अहो, फीचं सोडा… तुमचा चैतन्य आजपासून आमचा झाला. कसली फी घेऊन बसलात… अण्णांच नाव केवढं… कार्य केवढं… मी ओळखतो त्यांना… ये दगडू… थंड पाणी आण रे… चहा सांग दोन… काय वहिनीसाहेब, काही काळजी करु नका पोराची… चांगला नंबर वन काढू आम्ही त्याला. निकालाच्या दिवशी मात्र अण्णांना आणा आमच्या संस्थेत… त्यांचे पाय लागले आमच्या संस्थेला तर… तेवढेच आम्हाला पूण्य पदरी पडेल…
(दोघे बाहेर पडतात…)
बघं मी म्हणालो नव्हतो तुला, अण्णा कामी येणार म्हणून. तुझा विश्वासच नाही.
अहो पण, त्यांना खरं कळालं तर…
तोपर्यंत होईल ना पैशांची व्यवस्था…
Comments