बँक खाते गोठविल्यामुळे जि.प.चा कारभार विस्कळीत
औरंगाबाद, दि. १0 (लोकमत ब्युरो) – आयकर विभागाने जिल्हा परिषदेचे बँक खाते गोठविल्यामुळे गेल्या ५ दिवसांपासून कार्यालयातील सर्व व्यवहार ठप्प झाले आहेत. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या जि.प. शाखेत या कार्यालयाची जवळपास १४ कोटींच्या वर रक्कम अडकून पडली आहे.
मागच्या चार वर्षांपूर्वी कंत्राटदारांकडून आयकराची कपात केलेली रक्कम भरण्यास जि.प.च्या बांधकाम विभागाने विलंब केल्यामुळे आयकर खात्याने मागच्या ५ दिवसांपूर्वी जि.प.चे बँक खाते गोठविले होते. त्यामुळे जि.प.च्या कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यास अडचण निर्माण झाली होती. काही कर्मचाऱ्यांनी मुख्य लेखा व वित्त अधिकारी प्रकाश पाटील तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांना भेटून वेतनाचा प्रश्न तात्काळ सोडविण्याचा आग्रह धरला. आज (सोमवारी) कर्मचाऱ्यांना पगाराचे वाटप न झाल्यास उद्या मंगळवारी सकाळी कार्यालयात निदर्शने किंवा धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कर्मचारी संघटनांनी घेतला होता.
दरम्यान, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बँकेच्या व्यवस्थापकाला कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्याची सूचना दिली होती. आयकर खात्याने ठोठावलेल्या दंड व व्याजाची रक्कम बँकेत सुरक्षित ठेवून उर्वरित रकमेतून वेतन देण्यात यावे, असेही सूचित केले होते. मात्र, आयकर खात्याचा आदेश बँकेला टाळता येऊ शकत नाही. तसेच आयकर खात्याने बँकेलाही नोटीस बजावून जि.प.चे खाते गोठविण्याचे आदेशित केलेले आहे. नोटिशीत फक्त दंड व व्याजाची रक्कम गोठविण्याचे किंवा तेवढीच रक्कम सुरक्षित ठेवून उर्वरित रकमेचा व्यवहार सुरू ठेवावा, असे कुठेही नमूद केलेले नाही. त्यामुळे आयकर खात्याचे पत्र आणल्यास आम्ही गोठविलेले खाते ताबडतोब सुरू करू, असे बँक अधिकाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विजय सिंघल यांना सांगितले.
बँक अधिकारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नाही, हे लक्षात आल्यानंतर सिंघल यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता बी.एस. पांढरे यांना आयकर कार्यालयात पाठवून खाते पूर्ववत सुरू ठेवण्याचे पत्र आणण्यास सांगितले.
बँकेने खाते गोठविल्यामुळे जि.प. कर्मचाऱ्यांचे वेतन, विविध योजनांचा शासकीय निधी, जमा महसूल आदी मिळून जवळपास १४ कोटी ४६ लाख २७ हजार रुपयांची रक्कम खोळंबली असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. सायंकाळी मात्र, आयकर विभागाने १५ दिवसांच्या मुदतीवर बँक खाते गोठविण्याचा निर्णय मागे घेतला आहे. मात्र, दिलेल्या मुदतीच्या आत दंड व व्याजाची रक्कम न भरल्यास पुन्हा बँक खाते गोठविले जाईल, असे सूचित केले आहे. सायंकाळनंतर मात्र बँकेत पगार उचलण्यासाठी कर्मचाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती.
Comments