शनिवार, २१ डिसेंबर २०२४
21 December 2024
अधून मधून
  • भाषा:मराठी
  • लेखक:अतुल कुलकर्णी
  • वर्ग:माहितीपर
  • प्रकाशन:स्पंदन प्रकाशन (रत्नागिरी)
  • पृष्ठे:१९२
  • बाइंडिंग:पेपरबॅक

राजकीय सटायर. लोकमतमधून जवळपास सात वर्षे सतत पॉलीटिकल, सोशल सटायर असा कॉलम चालवल्यानंतर त्याच कॉलमधील निवडक लेखांचे संपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले आणि ‘अधून मधून’ हे पुस्तक आकाराला आले. राजकीय घडामोडींवर अचूक भाष्य करणारे हे पुस्तक त्यावेळी खूप गाजले. 1 जानेवारी 2011 रोजी हे पुस्तक प्रकाशित झाले. राजकीय सटायर ज्या व्यक्तीवर लिहीलेले असते त्या व्यक्तीला त्याबद्दल काय वाटते हे विचारुन त्यांची प्रतिक्रीया पुस्तक काढताना देण्याची पध्दती इंग्रजीत रुढ आहे, पण मराठीत तसा प्रयोग कोणी केला नव्हता. या पुस्तकात तो प्रयोग केला गेला. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे, यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ पत्रकार माजी खा. भारतकुमार राऊत, महाराष्ट्र टाईम्स व लोकमतचे माजी संपादक माजी खा. कुमार केतकर, एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर, जयदेव डोळे, लोकमतचे माजी समूह संपादक दिनकर रायकर, अभिनेता प्रशांत दामले, प्रधान सचिव भूषण गगराणी, अभिनंदन थोरात यांनी आपल्या प्रतिक्रीया दिल्या होत्या. शिवाय ज्येष्ठ दलित साहित्यिक डॉ. गंगाधर पानतावणो यांनी या लिखाणाचे उत्तम वेिषण लिहून दिले होते. अशोक नायगावकर यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना दिली होती. तर ज्येष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी पुस्तकाच्या मलपृष्ठासाठी मजकूर लिहून दिला होता. पाडगावकर आपल्या मनोगतात म्हणतात –

”वर्तमानपत्रतील सदरे बहूतेकवेळा अधून-मधूनच वाचनिय असतात. त्यांच्या वाचनीयतेत सातत्य नसते. अतुल कुलकर्णी यांचे सदर याला अपवाद आहे. त्याच्या वाचनीयतेत सातत्य आहे. पुष्कळवेळा अशी सदरे त्या दिवसापुरतीच ताजी असतात. त्यानंतर कायमचे शिळेपण त्यांच्या वाटय़ाला येते. हे सदर त्यालाही अपवाद आहे. ते पुन्हा पुन्हा वाचले जाण्याची साहित्यिक गुणवत्ता त्यात आहे. राजकीय उपरोध हा या सदराचा रोख आहे. हा उपरोध सर्वसामान्य वाचकांना खूष आणि जाणता करणारा आहे. राजकीय नेत्यांनी हे सदर वाचले असेल काय? आणि वाचले असेल, तर त्यांची व्यावसायिक गेंडय़ाची कातडी निदान वाचताना तरी जराशी हळवी झाली असेल काय?
कंडम बर्गडय़ांच्या जनतेवरी,
स्मगलर, बिल्डर, गुंड राज्य करी..
प्रत्येक नेता खिसे भरी, हाती धरोनि तयांसि..
असे या समाजाचे प्राक्तन असल्यामुळे, ज्यांच्यावर अतुल कुलकर्णी यांनी हा उपरोध रोखला आहे त्या गेंडय़ाच्या कातडीची कुंडली कोणी मांडावी? एवढे खरे की, जनतेला हा उपरोध रुचेल. मलाही तो रुचला आहे.”

हे पुस्तक आजही बुकगंगा वरती उपल्बध आहे.