विजय जे. दर्डा
अधून मधून हे सदर मला व्यक्तिगत खूप आवडले. त्यामुळे मी लोकमतचे समूह संपादक दिनकर रायकर यांना सांगून हे सदर लोकमत व लोकमत समाचारच्या सर्व आवृत्त्यांना प्रकाशित करण्याच्या सूचना केल्या होत्या. माझा निर्णय अतुलने त्याच्या लिखाणातून योग्य ठरवला याचे मला कौतूक आहे. राजकीय, सामाजिक घटना घडामोडींवर उपहासात्मक व वंगात्मक लिखाण आता कमी होत चालले आहे. अशा काळात अतुलने ही शैली जोपासली आहे. ज्या गोष्टीची बातमी होत नाही पण त्या गोष्टी समोर याव्या वाटतात त्या त्याने या सदराच्या माध्यमातून मांडल्या व लोकांना राजकारण्यांची दुसरी बाजूही दाखविली आहे. सुदैवाने आजचे राजकारण आणि समाजकारण ही दोन्ही क्षेत्रे उपहास आणि व्यंग यांना प्रोत्साहन देणारीच ठरत आहेत. नेत्यांचे वागणे आणि बोलणे यातील अंतर, समाजाची नीतीमुल्ये आणि त्याची प्रत्यक्ष वर्तणूक व आदर्श आणि व्यवहार यात निर्माण होत असलेले अंतर हे सर्व विनोदी व विडंबनकार लेखकांसमोर असलेले चांगले व आमंत्रक आव्हान आहे. अतुलने हे आव्हान आणखी जोरात स्वीकारावे व महाराष्ट्राचे राजकीय, सामाजिक जीवन पारशर्दक होईल यासाठी प्रयत्न करावा.
Comments