हरितपट्ट्यांवरील अतिक्रमणांना सिडको प्रशासनाचा वरदहस्त?
औरंगाबाद, दि. २४ (लो.वा.से.) – सिडको परिसरात अनेक ठिकाणी सोडण्यात आलेल्या हरितपट्ट्यांवर चांगली झाडे लावावीत व रस्त्याच्या दुतर्फा हिरवागार परिसर निर्माण करावा, या चांगल्या हेतूने सोडण्यात आलेल्या हरितपट्ट्यांवर आज मोठ्या प्रामणावर अतिक्रमण होत आहे. सिडको प्रशासनाला याची जाणीव असूनही कार्यवाही मात्र काहीच होत नाही, असे चित्र सध्या दिसून येत आहे. सिडको प्रशासनाची ‘मूकसंमती’ असल्यानेच हे होत आहे, असे काहींचे याबाबत म्हणणे आहे.
जळगाव रोडवर अनेक ठिकाणी या हरितपट्ट्यांवर असणाऱ्या काटेरी तारांचे कुंपण बाजूला सारून लोकांनी तेथे कायमस्वरूपी टपऱ्या थाटलेल्या आहेत. अनेकांनी पंक्चरची दुकाने त्या ठिकाणी लावली आहेत. मात्र, ही सारी अतिक्रमणे रोजरोसपणे तेथेच आहेत. तारेचे कुंपण काढून त्या ठिकाणी छोटी छोटी दुकाने थाटेपर्यंत या साऱ्या प्रकाराची कुणकुण सिडको प्रशासनाला कशी लागली नाही, हे आश्चर्यच आहे.
गरवारेसमोरील आकार या कम्युनिटी हॉलसमोरील तारेचे कुंपण तर तारा व त्याच्या खांबासह पळविण्यात आले आहेत. हॉटेल विंडसर कॅसलसमोर असणारे कुंपण पूर्णपणे काढून आता ती जागा दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. अनुराधा-अनुपमा चित्रपटगृहांपासून ते एसटी महामंडळाच्या कार्यालयापर्यंत अनेक ठिकाणी हरितपट्ट्यांवर अतिक्रमण करण्यात आलेले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण परिसर सिडकोच्या मुख्य कार्यालयासमोर येतो, त्या परिसराची ही अवस्था आहे तर इतर ठिकाणच्या हरितपट्ट्यांबद्दल न बोललेलेच बरे, अशी अवस्था निर्माण झाली आहे.
मध्यंतरी असे हरितपट्टे खाजगी संस्थांना विकसित करण्यासाठी देण्यात यावेत व त्या संस्थांनी त्या ठिकाणी झाडे-झुडपे लावून तो परिसर स्वच्छ व नेटका ठेवावा. त्याच्या मोबदल्यात त्यांन त्यावर आपल्या संस्थेची जाहिरात करावी, अशा प्रकारची एक योजना सिडकोने आखली होती. मात्र त्याचे काहीच झाले नाही. स्टेट बँक ऑफ हैदराबादसमोरील जागा मात्र त्या वेळी बँकेसमोर अतिक्रमण होऊ नये या भीतीने विकसित करण्यासाठी म्हणून ताब्यात घेतली. त्या ठिकाणी स्वत:चा फलक लावला. थोडीबहुत झाडे लावली. त्यामुळे तो भाग तसा थोडा स्वच्छ असला तरी त्याच्याही देखभालीची गरज निर्माण झाली आहे.
जळगाव रोडवर तसेच दीपाली एक्झिक्युटिव्ह हॉटेलपासून ते एपीआयसमोरील पेट्रोल पंपापर्यंत देखील अशाच प्रकारची अतिक्रमणे झाली आहेत. यातील काही हरितपट्ट्यांच्या जागा खाजगी प्रवासी बस वाहतूकदारांनी स्वत:च्या बस उभ्या करण्यासाठी सर्रास वापरणे सुरू केले आहे. या ठिकाणी मुंबईला जाणाऱ्या बसगाड्या, दुधाच्या टपऱ्या तसेच पानठेले आरामात विसावलेले आहेत. सिडको प्रशासनाला या साऱ्या अतिक्रमणांची वार्ता लागत नाही, हे म्हणणे किती सत्य असेल अशी प्रतिक्रिया या परिसरातील नागरिक बोलून दाखवत आहेत.
या हरितपट्ट्यावर कुंपण करावे व हरितपट्टे स्वच्छ ठेवून विकसित करावेत, अशी मागणीही या परिसरातील नागरिक करीत आहेत. मात्र, सिडको प्रशासन कधी एकदा हस्तांतरण होते व सुंदर आणि स्वच्छ सिडको अशी ख्याती असणारा हा भाग आहे त्या अवस्थेत महानगरपालिकेच्या गळ्यात कधी मारता येईल, याच्या प्रतीक्षेत आहे. सिडकोला मुख्य प्रशासक म्हणून कृष्णा भोगे यांनी थोडीबहुत शिस्त लावण्याचा प्रयत्न केला, पण त्यांच्या बदलीनंतर आलेल्या अधिकाऱ्यांनी मात्र सिडको आणि तेथील रहिवासी यांच्यात कायम विसंवादी सूर कसा राहील, याचीच जास्त काळजी घेतली आहे, असे आता लोक उघडपणे बोलून दाखवीत आहेत.
Comments