रविवार, ५ जानेवारी २०२५
5 January 2025

हे वागणे ‘फेअर’ नव्हे

‘फेअर’ म्हणजे गोरा की नि:पक्षपातीपणे वागणारा? अर्थ ज्याचा त्याने काढायचा आहे. दिसण्याचा आणि बुध्दीमत्तेचा संबंधच नाही. पण शेवटी या दिसण्यालाच भावनेची जोड देत व्यापार केला जातो. नाव बदलण्याची वेळ देखील नेमकी हीच कशी असते..?

पुढच्या पिढीचा व्यवहार दिसण्यावरच जास्त होईल, असे ६२ वर्षापूर्वी ग.दि. माडगूळकरांना कळाले असावे. त्यामुळेच त्यांनी
‘एका तळ्यात होती बदले पिले सुरेख,
होते कुरूप वेडे पिल्लू तयात एक’
हे गाणे लिहीले असावे. गदिमांवर सुंदर आणि कुरुपतेचा संस्कार ‘पी हळद हो गोरी’ अशा म्हणींनी केला असावा असे वाटेलही, पण गदिमां थोडेच म्हणींवर विसंबून बसले? स्वत:चे रुपडे न पाहणाऱ्या त्या कुरूप पिलास त्यांनी पाण्यात चोरुन पहायला लावलेच..! आणि काय आश्चर्य,
‘एके दिनी परंतु, पिल्लास त्या कळाले,
भय वेड पार त्याचे, वाऱ्यासवे पळाले,
पाण्यात पाहताना चोरूनिया क्षणैक,
त्याचेच त्या कळाले, तो राजहंस एक..!
जे गदिमांना तेव्हा कळाले ते अजून आम्हाला उमजले देखील नाही. त्यामुळेच तर ‘फेअर’ नसणारे स्वत:ला गोरे गोमटे समजू लागले आणि ‘लव्हली’ नसणारे स्वत:ला ‘फेअर’ समजू लागले. आता कोणी म्हणेल की याच गदिमांनी
‘गोरी गोरी पान, फुलासारखी छान, दादा मला एक वहिनी आण…’
हे गीत लिहीलं ना. पण ते बालगीत होतं. बालकांच्या कल्पनाशक्तीला साजेसं होतं. आपण मात्र समाज म्हणून पुन्हा पुन्हा ‘गोरी गोरी पान’ मध्ये अडकत जातो आणि अजूनही आपण बालबुध्दीतच आहोत हे सिध्द करत रहातो. आपल्याला संधी मिळूनही आपण बालबुध्दीच्या पलीकडे जात नाही.

कृष्णवर्णीय जॉर्ज फ्लॉईडच्या मृत्यूनंतर जगात वांशिक रुढीबध्दतेविरुध्द आवाज उठताना जागतिक पातळीवरच्या हिंदुस्थान युनिलिव्हर कंपनीने सहानुभूतीची गुंतवणूक करत आपले ‘प्रॉडक्ट’ नव्याने विकण्यास काढले. यातच सगळे काही आले. चर्चा सुरु झाली ती ‘फेअर अ‍ॅन्ड लव्हली’ या ब्रँड नेममधून ‘फेअर’ शब्द काढण्याच्या निर्णयामुळे. वंशवादविरोधी चळवळीचा आणि नाव बदलण्याचा काहीही संबंध नाही, आम्ही ब्रॅन्डच्या उत्क्रांतीवर अनेक वर्षापासून काम करत आहोत, असे कंपनी सांगते, मात्र वंशवादविरोधी चळवळ वेगात असतानाच नाव बदलण्याचा निर्णय घेते. यामुळे कंपनीची प्रतिमा ‘फेअर’ होईल आणि प्रॉडक्ट ‘लव्हली’ वाटेलही. हे समजण्यासाठी अ‍ॅडगुरुची गरज नाही. मुळात ‘फेअर अ‍ॅन्ड लव्हली’ हे फक्त प्रॉडक्टचे नाव नाही. तो एक विचार आहे आणि तो जास्त घातक आहे. सिनेमातला हिरो, नाचणारी अभिनेत्री, रिएलिटी शो मधील स्पर्धक सुध्दा गोरे गोमटे असण्याची अदृष्य अटच याच विचारातून आलेली असतेच की. आपल्याकडे बुध्दीजीवी, श्रमजीवी, रुपजीवी आणि परोपजीवी असे चार प्रकारचे लोक आढळतात. आपण कोणत्या प्रकारात मोडतो याचा विचार कधी होतच नाही. उलट दिसायला बरे नसणारे न्यूनगंडात आणि रुपजीवी समजणारे अहंगडात जगत आल्याची असंख्य उदाहरणे आहेत.

‘फेअर’ शब्दाचे न्याय, सचोटीचा, प्रामाणिक, नियमानुसार वागणूक देणारा, नि:पक्षपाती असे अनेक अर्थ आहेत. पण वर्षानुवर्षे या शब्दाने, सुंदर आणि नितळ एवढेच अर्थ जगाला सांगितले. त्याच्या जोडीला ‘लव्हली’ शब्द आला आणि या दोन शब्दांनी सौंदर्याची व्याख्याच बदलून टाकली. अमूक साबण वापरला की वयाचा पत्ता लागत नाही अशी जाहीरात असो की अमूक क्रीम वापरल्यावर तुम्ही गोरे दिसलाच म्हणून समजा असा दावा असो. आजवर एकही व्यक्ती खऱ्या आयुष्यात साबण वापरुन तरुण आणि क्रीम वापरुन गोरी झाली नाही. दिसण्याचा आणि बुध्दीमत्तेचा संबंध नसतोच. अनेक क्षेत्रातल्या रथीमहारथींनी आपल्या कार्याने ते सिध्द केले आहे. त्यांची नावे सांगून त्यांच्या कामाला कमी लेखणे योग्य होणार नाही. पण दिसण्याला भावनेशी जोडून रग्गड कमाई करणाऱ्या कंपन्यांनी याच भावनेचा बाजार थेट आपल्या घरापर्यंत आणला. एकाच वर्षी भारतात मिस इंडिया आणि मिस युनिर्व्हस असे दोन किताब इथली बाजारपेठ काबिज करण्यासाठी दिले गेले. कंपनी कशासाठी का असेना, त्यांच्या नावातून ‘फेअर’ शब्द काढण्याचा निर्णय घेत असेल, पण आपण आपल्या आयुष्यातून ‘फेअर’ म्हणजे फक्त गोरा हा अर्थ कधीतरी पूसून नको का टाकायला…?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *