झोत १
आरोग्याची काळजी वाहणाऱ्या घाटीचेच आरोग्य धोक्यात
औरंगाबाद, दि. १४ – गोरगरीबांना अत्यल्प खर्चात आरोग्यविषयक सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात म्हणून उभारण्यात आलेल्या घाटी इस्पितळाला सध्या अनेक समस्यांनी ग्रासलेले आहे. स्वच्छता, पाणी, केरकचरा, सफाई या मुद्यांकडे कधीच लक्ष द्यायचे नाही, असेच जणू धोरण असल्यासारखे सारे वागत आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची अवस्था मात्र तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे.
येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आधीच त्यांच्यावर आलेल्या आजारामुळे त्रस्त असतात व परिस्थिती त्यांना साथही नसते. आपण अमूक सुविधा नाही म्हणून ओरड केली तर कोण जाणे आपणास उपचार करायलादेखील येथील डॉक्टर्स नकार देतील की काय, अशी भीती त्यांच्या मनात असतेच. त्यामुळे ते बिचारे काहीच बोलत नाहीत. त्यामुळे प्रशासनाचे देखील याकडे लक्ष जात नाही. असाच त्यातून अर्थ काढला जातो.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत असणाऱ्या समस्या म्हणजे दिव्याखाली अंधार असाच प्रकार आहे. मुख्य प्रशासकीय इमारतीत कॅन्टीनकडे जाताना सार्वजनिक स्वच्छतागृह लागते. गेल्या कित्येक महिन्यांपासून ते बंद आहे. तेथे लाईट नाही, पाणी नाही. साधी झाडझूडही नाही. त्यामुळे सारे स्वच्छतागृह जाळ्याजळमटांनी भरून गेले आहे. कॅन्टीनकडे जाताना असणारे विद्यार्थ्यांसाठीचे लॉकर्स तर किती वर्षांपासून बंद आहेत याची कथाच वेगळी आहे. या महाविद्यालयात विद्यार्थी म्हणून शिकून त्याच महाविद्यालयात आता डॉक्टर म्हणून काम करायला आलेले डॉक्टरदेखील सदर लॉकर्स आपण विद्यार्थी असतानापासून बंद असल्याचे कौतुकाने सांगतात. यासारखी वाईट गोष्ट कोणती असू शकते, अशी मल्लीनाथीही करतात.
येथे असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लॉकर्सची गरज नाही तर ते काढून तरी टाकावेत किंवा मुलांना ते नव्याने सुरू करून द्यावेत, असे काहींनी सांगितले.
इस्पितळाचा संपूर्ण परिसर बकाल आणि अस्वच्छ ठेवण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न असल्याचे येथे दिसून येते. हा सारा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काही प्रयत्न होताहेत, याचे पुसटसेही चित्र येथे दिसून येत नाही.
इस्पितळाची व मुख्य प्रशासकीय इमारतीची देखभाल व डागडुजीच्या कामाची विभागणीदेखील करण्यात आलेली आहे. येथील पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते, इमारतींची फेरफार व दुरूस्ती, रंगरंगोटी व ड्रेनेजची देखभाल याची जबाबदारी बांधकाम विभागाकडे असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. त्यांच्या अधिकारात ८ प्लंबर व मजूर वर्ग आहे. तसेच तत्कालीन कामासाठी मजूर लावण्यासाठी त्यांना कोणाची मान्यतादेखील घ्यावी लागत नाही.
या संपूर्ण परिसरासाठी इलेक्ट्रीक इंजिनीअरचे स्वतंत्र पदही आहे. त्यांच्या अधिकारात विजेबाबतच्या अडचणी, जनरेटर्स, कुलर्स आदी बाबी येतात. तसेच ६ इलेक्ट्रीशियन देखील त्यांच्याकडे असल्याचे वृत्त आहे. हा कर्मचारी वर्ग अपुरा आहे की, पुरेसा आहे याचीही कधी माहिती दिली जात नाही. या संबंधितांची अधिष्ठातांसमवेत बुधवारी एक बैठकही होते. ज्यात परिसरातील सोयीसुविधांबाबत विचारविनिमय होतो. मात्र, त्याचे पुढे काय होते ते माहीत नाही. अस्वच्छ घाटीकडे पाहावयास कोणाला वेळ नाही, असेच चित्र सध्या दिसत आहे, हे खरे.
Comments