झोत २
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ‘औषधांनी’ घाटीचे आरोग्य बिघडले…
औरंगाबाद, दि. १५ – घाटी रुग्णालयाचे आरोग्य धोक्यात कसे आले आहे, हे आपण काल वाचलेच. आरोग्य धोक्यात येण्याच्या कारणांचा शोध घेतला असता, रुग्ण घाटीत आणि उपचार सार्वजनिक बांधकाम विभागात, अशी अवस्था निर्माण झाल्याचे दिसून येते. सार्वजनिक बांधकाम खाते स्वत:च्या मनाला येईल ती ‘औषधे’ वाट्टेल तेव्हा देत असल्यानेच घाटीवर ही अवस्था ओढवल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. तर याबाबत सा.बां. विभागाचे म्हणणे विचारण्यासाठी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता एकही वरिष्ठ अधिकारी भेटू शकला नाही.
घाटीतील दुरवस्थेबद्दल अनेक प्रश्न आहेत, अनेक समस्या आहेत. आज वृत्त प्रसिद्ध होताच, अधिष्ठाता डॉ. व्ही.एल. देशपांडे यांनी सकाळी ८.४५ ते ११.३0 असा संपूर्ण विभागाचा दौरा केला. सदर प्रतिनिधीने त्यांची भेट घेतली असता ते म्हणाले, आम्ही आमच्या वतीने योग्य ते प्रयत्न करीत आहोतच. वृत्ताची आम्ही दखल घेतलीच आहे. मात्र, या परिसराची देखभाल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. असे असले तरी आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांकडून योग्य ती सुधारणा करून घेत आहोत, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक शौचालय नाही
घाटी परिसरात दररोज किमान पाच ते सात हजार लोक येतात. सुमारे ९८ एकर एवढ्या विस्तीर्ण जागेत हे इस्पितळ उभे आहे. मात्र, या साऱ्या परिसरात रुग्णांच्या नातेवाईकांसाठी एकही सुलभ सार्वजनिक शौचालय नाही. त्यामुळे येणारे लोकही लोकलाज बाजूला सारून नाईलाजास्तव दिसेल येथे नैसर्गिक विधी उरकतात.
बास्केट बॉल की बास्केट मनी
घाटी इस्पितळात प्रवेश करताच डाव्या बाजूला असणाऱ्या मोकळ्या जागेत बास्केट बॉलचे मैदान करण्यात आले आहे. तेथेच एका बाजूला क्रिकेटचेही मैदान बनविण्यात आलेले आहे. कोणीही, कधीही न खेळता सदर बास्केट बॉलचे मैदान आजपर्यंत तीन वेळा खराब झाले व त्याची तीन वेळा दुरुस्तीही करण्यात आली. मैदान कशामुळे खराब झाले, खराब झाल्याची तक्रार कोणी केली व दुरुस्ती केली म्हणजे नेमके काय केले, याविषयीची उत्तरेदेखील अनुत्तरीतच आहेत. सर्वात मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे या मैदानावर असणाऱ्या बास्केट बॉलच्या पोलवर आजपर्यंत कधी बास्केटही बसवलेली नाही व त्याची जाळीही. तरीही लोक तेथे खेळले… गुत्तेदारांना पोसणाऱ्या या बास्केट बॉलचे नाव आता तेथील लोकांनी ‘मनी बास्केट’ (गुत्तेदारांना वेळो वेळी पैसे देणारी बास्केट) असे ठेवलेले आहे.
अधिष्ठातांचाच रंगरंगोटीचा पत्ता नाही…
मध्यंतर घाटी परिसरात मोठ्या प्रमाणावर रंगरंगोटी करण्यात आली. त्या वेळी रंग कोणी लावला, त्यास कामाच्या पूर्ततेचे प्रमाणपत्र कोणी दिले, त्याचे बिल किती आले, त्याबाबत अधिष्ठातांनी रंगरंगोटीची मागणी केली होती का, या साऱ्या प्रश्नांबाबत खुद्द अधिष्ठाताच अंधारात होते. एका अधिकाऱ्याने सदर रंगरंगोटीचे बील ६६ लाख झाल्याचे वृत्त आहे. अपघात विभागास रंगरंगोटी केल्याचे बाजूच्या छायाचित्रात दिसत आहे. तसेच अपघात विभागाच्या समोर तरी वाहने ठेवू नयेत, याचेही साधे नियम येथे पाळले जात नाहीत. सुरक्षारक्षक ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांवर शिट्या मारीत फिरत असतात. पण त्यांच्याही नजरेतून ही बाब कशी सुटते कोण जाणे? अनेकांना अशा विभागातच आपल्या गाड्या ठेवण्याची सवय जडलेली आहे.
१) घाटीत गेल्यानंतर डाव्या हाताला असणाऱ्या झुणका भाकर केंद्राच्या मागील बाजूचे हे छायाचित्र.
२) सार्वजनिक बांधकाम विभागाच्या गुत्तेदारांनी कामानंतर मोकळ्या जागेत टाकून दिलेले हे बांधकामाचे साहित्य.
Comments