झोत ४
दोषी ठेकेदारांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करणार
घाटीत बांधकाम साहित्य हटविण्यास प्रारंभ, बास्केटबॉल मैदान झाडले…
औरंगाबाद, दि. १७ – घाटी इस्पितळाच्या दुरवस्थेची मालिका प्रकाशित होताच सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागे झाले असून, घाटी परिसरात पडलेले बांधकाम साहित्य देखील उचलण्या प्रारंभ झाला आहे. तर बहुचर्चित बास्केटबॉल मैदान देखील साफ करण्याचे काम सुरू झाले. दोषी ठेकेदारांवर कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार असल्याचे या वेळी बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता सी.डी. फकीर यांनी सदर प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले, या साऱ्या प्रकाराबद्दल प्रथमच माहिती मिळाली. असे जर काही असेल तर त्याची योग्य ती माहिती घेऊन कार्यवाही केली जाईल. घाटीत आमचे स्वतंत्र सेवा कक्ष आहे. त्यामुळे याची चौकशी करण्यात येईल, असेही फकीर या वेळी म्हणाले.
दरम्यान, बांधकाम खात्याने आज आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला व सार्वजनिक बांधकाम खात्याच्या आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अखत्यारीत कोणकोणती कामे आहेत याची यादीच त्यांनी दिली आहे. बांधकाम उपविभाग क्रमांक १ च्या उपविभागीय अभियंता व प्रभारी कार्यकारी अभियंता बी.बी. इखे यांनी आज ‘लोकमत’कडे आपली बाजू मांडली. त्यांनी असेही सांगितले की, मालिकेत उल्लेख झालेल्या कामांची पाहणी करणे सुरू केले आहे. जी कामे निकृष्ट दर्जाची आहेत त्यांची शहानिशा करून त्याची दखल घेण्यात येईल व संबंधिच ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
बास्केट बॉल मैदानाचे कामे प्रगतिपथावर असून, त्यापोटी ठेकेदाराला अद्याप एकही पैसा दिलेला नाही. ३१ मार्च २000 चे बजेट पूर्ण होण्यापूर्वी जानेवारी ते मार्च महिन्यात ४0 कामांची बिले मंजूर झाल्याचे खात्याने त्यांची बाजू मांडताना म्हटले आहे. इमारतीच्या बाहेर ड्रेनेज साफसफाईचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याशी संबंधित आहे. पण ड्रेनेज साफसफाईचे वेळापत्रक नाही. इमारतीबाहेरची मुख्य ड्रेनेज लाइनची दुरुस्ती व देखभालीचे काम खात्याकडे असून, त्याबाबत आवश्यकतेनुसार दुरुस्ती व देखभाल करण्यात येते, असे त्यात म्हटले आहे. अनेक ठिकाणी पसरलेले बांधकाम साहित्य तसेच राहिल्याचे निदर्शनास आल्यानंतर उचलण्याचे काम हाती घेतल्याचेही त्यांनी सांगितले.
निकृष्ट दर्जाच्या कामाची गंभीर दखल घेण्यात येत असून, संबंधित ठेकेदारावर कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. घाटी परिसरात रंगरंगोटीचे काम अधिष्ठातांच्या सांगण्यावरून घेण्यात आले, असे बांधकाम खात्याने सांगितले असले तरी अधिष्ठाता डॉ. देशपांडे यांनी त्याचे खंडन केले. ते म्हणाले, आम्ही रंग लावावा असे कधीही लेखी कळविले नव्हते. तर बांधकाम खात्याने मात्र, दर तीन वर्षांनी रंगरंगोटी करावी, असा नियम असल्याचे सांगितले. त्यापोटी किती खर्च आला ते मात्र त्यांनी सदर पत्रात सांगितलेले नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे एक सेवा केंद्र घाटी परिसरात आहे. त्या ठिकाणी दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी कनिष्ठ अभियंत्याची एक जागा आहे. त्या पदावर एस.बी. बिरारे काम पाहतात. त्या केंद्रात २ रोड कारकून, २ सुतार, ३ प्लंबर व १0 मजूर असे कर्मचारी आहेत. (सदर सेवा केंद्रात १६ सुतार, १५ गवंडी, १७ प्लंबर व ९0 मजूर एवढी गरज असल्याचे समजते.) हे सारे असूनही एवढे प्रश्न कसे निर्माण होतात, असा सवालही घाटीतील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्याने काय होते, अशी वक्तव्ये या केंद्रात बसून केली जातात, असेही समजते. या प्रकरणी सदर प्रतिनिधीने जाधव यांच्याशी संपर्क साधला असता ते सुटीवर असल्याचे सांगण्यात आले.
आजही दिवसभर बांधकाम खात्याचे अधिकारी व अधिष्ठाता, डॉक्टर्स यांच्यात बैठक झाल्या. घाटीच्या अखत्यारीत असणारी कामे न करणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे व त्यांच्या नोंदी ठेवण्याचे आदेशदेखील या वेळी देण्यात आल्याचे समजते.
घाटीत होणारी कोणती कामे कोणाकडे याचा बांधकाम खात्याने दिलेला तपशील असा आहे…
- अंतर्गत साफसफाई, बाह्य परिसर साफसफाई, स्वच्छता नियमित करणे….
- वॉर्ड रुग्णालय, स्वच्छतागृहाची सफाई करणे चोकअप्स काढणे आदी…
- अतिक्रमण हटविणे व थांबविणे, सुरक्षारक्षक
- बांधकाम साहित्य हटविणे
- पाणीपुरवठा सोडणे व बंद करणे
- दुरुस्ती, देखभाल, रंगरंगोटी
- कंपाऊंड वॉलची देखभाल
- नवीन कंपाऊंड बांधणे, नवीन बांधकामाची भिंत बांधणे, संडास, बाथरूम बांधणे
- रंगरंगोटीच्या कामास मान्यता देणे
- इमारतीअंतर्गत तुटलेल्या फरशा बदलणे, खिडक्या, दरवाजे दुरुस्त करणे, वॉश बेसीन बदलणे, संडास दुरुस्ती, नळाची तोटी बदलणे, पाईप बदलणे तत्सम दुरुस्तीची कामे
- इमारतीबाहेरील आवारातील बांधकाम साहित्य हटविणे वगळता स्वच्छता, संरक्षण, गवत काढणे आदी तत्सम कामे.
त्या मोकळ्या जागेत उद्यान विकसित करावे
सार्वजनिक बांधकाम खात्याने गेल्या अनेक वर्षांपासून बांधकामाच्या उरलेल्या साहित्याचे ढिगारे घाटीतील एका मोकळ्या जागेत टाकले होते. लोक त्या ढिगाऱ्याच्या आडोशाने आपले प्रातर्विधी उरकत असत. आता तेथील ढिगारे काढल्यानंतर मोकळ्या झालेल्या त्या मैदानाची डागडुजी करून तेथे उद्यान विकसित करावे. जेणे करून जागेचा चांगला उपयोग होईलच. शिवाय घाटीत येणाऱ्या रुग्णांच्या हजारो नातेवाईकांना बसण्यासाठी जागा देखील होईल, अशी सूचना येथील काही रुग्णांच्या नातेवाईकांनी केली आहे.
Comments