पहिली ते चौथीच्या मुलांना मोफत पुस्तके
दि. १३ मे १९९२ रोजी लोकमतमध्ये एक बातमी दिली. त्याचा मथळा होता, पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या किमती कडाडल्या. त्या बातमीच्या आधारावर अॅड. जी.एम. जाधव यांनी औरंगाबाद उच्च न्यायालयात जनहित याचिका ३० मे १९९२ रोजी दाखल केली. त्याची सुनावणी होऊन दि. १४ ऑगस्ट १९९२ रोजी न्या. बी.एन. देशमुख आणि न्या. नरेंद्र चपळगावकर यांच्या खंडपीठाने त्याबाबत निर्णय दिला. त्यानंतर पुस्तक पेढीला जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी जात असे व त्यातून मुलांना पुस्तके मिळत होती. २००० साली सर्व शिक्षा अभियान आले. व २००१ सालापासून सरकारने पहिली ते आठवीच्या सर्व मुला मुलींना मोफत पुस्तके देणे सुरु केले. या निर्णयाची सुरुवात १३ मे १९९२ रोजी दिलेल्या बातमीने केली होती. त्यावेळी आलेल्या बातम्या अशा –
पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या किमती कडाडल्या; नववीच्या पुस्तकांचा संच ५२ रुपयांनी महागला, गरीब विद्यार्थ्यांसाठी ८६ लाखांची पुस्तकपेढी योजना
अतुल कुलकर्णी
औरंगाबाद, दि. १२ (अतुल कुलकर्णी यांजकडून) – पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांच्या किमती यंदा प्रचंड कडाडल्या असून इयत्ता नववीच्या पुस्तकांचा संच तर तब्बल ५२ रुपयांनी महागला आहे. मात्र, आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी जिल्हा परिषदेमार्फत मोफत पुस्तकपेढी योजना राबविण्याचे ठरले असून त्यासाठी ८६ लाख २३ हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या येथील विभागीय कार्यालयामार्फत ही पुस्तके देण्यात येणार असून ही योजना जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणार आहे. या पुस्तकपेढी योजनेत मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना ८६ लाख २३ हजारांची पुस्तके वाटप करण्यात येणार असून आर्थिक दुर्बल घटकातील व मागासवर्गीयांना ही पुस्तके पुरविली जातात. या वर्षी इयत्ता पहिली ते चौथी व इयत्ता दहावीसाठी ही योजना राबविण्याचे ठरविण्यात आले आहे. तसेच जिल्हानिहाय यासाठी तरतूदही करण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्यासाठी १४.0९, जालना जिल्ह्याकरिता ८.१९ तर बीड ११.६६, परभणी १0.५९, नांदेड १२.७२, उस्मानाबाद ९.११ व लातूर १९.८७ इतकी तरतूद या योजनेंतर्गत करण्यात आलेली आहे. सर्वात जास्त तरतूद लातूर जिल्ह्यासाठी १९ लाख ८७ हजार इतकी करण्यात आली आहे.
चौथीची पुस्तके बदलली तसेच या वर्षीपासून नव्या शैक्षणिक धोरणाचा एक भाग म्हणून इयत्ता चौथीची सर्व पुस्तके बदलण्यात आली असून या वर्षीपासून चौथीला नवीन अभ्यासक्रम ठेवण्यात आला आहे.
किमतीत वाढ
या वर्षी पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या किमतीत देखील भरमसाठ वाढ झाली असून पाच-सहा वर्षांपासून शासकीय कागद सबसिडीच्या दरात मिळत नसल्यामुळे पुस्तकांच्या किमतीत वाढ झाल्याचे सांगण्यात येते. तसेच खुल्या बाजारातून कागद घेऊनच पुस्तके तयार करण्यात येत असल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येते. इयत्ता पहिली ते दहावीच्या पुस्तकांच्या सेवांची किंमत गेल्या वर्षी किती होती व या वर्षी किती आहे. तसेच त्यात कितीने वाढ झाली आहे हे दर्शविणारा तक्ता सोबत दिलाच आहे.
पाठ्यपुस्तक मंडळाच्या विभागीय कार्यालयातून औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, चाळीसगाव, अहमदनगर जिल्ह्यातील भाग व बुलढाणा जिल्ह्यातील काही भागात पाठ्यपुस्तके पुरविली जातात. तर लातूर येथील उपविभागीय कार्यालयातून लातूर, उस्मानाबाद, नांदेड हे तीन जिल्हे तसेच बीड व सोलापूर जिल्ह्याच्या काही भागांत पाठ्यपुस्तके वितरीत केली जातात, असे येथील विभागीय व्यवस्थापक श्री. रामराव सूर्यवंशी यांनी सांगितले.
या वर्षी पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ३३ लाख १३ हजार २२२ पुस्तके मागविण्यात आली असून त्याची अंदाजे किंमत २ कोटी ८१ लाख ३८ हजार ५८२ रुपये ७0 पैसे इतकी आहे.
पाठ्यपुस्तकांच्या किमतीत झालेली ही विक्रमी वाढ
इयत्ता गतवर्षीची या वर्षीची फरक
किंमत किंमत
पहिली | १३.00 | २0.१0 | ७.१0 |
दुसरी | ११.00 | १४.६0 | ३.६0 |
तिसरी | १६.३0 | ३१.४0 | २५.१0 |
चौथी | १७.५0 | ३५.३0 | १७.८0 |
पाचवी | २५.६0 | ५७.५0 | ३१.९0 |
सहावी | ३0.४0 | ६६.४0 | ३६.00 |
सातवी | ३३.३0 | ७0.९0 | ३७.६0 |
आठवी | ४७.२0 | ९४.१0 | ४६.९0 |
नववी | ५५.५0 | १0७.४0 | ५१.९0 |
दहावी | ७८.९0 | ११५.00 | ३६.१0 |
Comments