पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ करण्याच्या निर्णयास औरंगाबाद खंडपीठात आव्हान
औरंगाबाद, दि. १२ (नगर प्रतिनिधी) – इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या क्रमिक पाठ्यपुस्तकांच्या किमतीत वाढ करण्याच्या निर्णयास येथील विधीज्ञ अॅड. जी.एम. जाधव यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात लोकहितवादी याचिका दाखल करून आव्हान दिले आहे.
ही याचिका काम सुटीतील न्यायमूर्ती दाणी यांच्यासमोर दाखलपूर्व सुनावणीस आली असता त्यांनी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळ, पुणे व महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ व महाराष्ट्र शासन यांना नोटीस पाठवून सदर याचिका दाखल का करून घेऊ नये? यासंबंधीचा खुलासा जूनच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत देण्याचा आदेश दिला आहे.
लोकमतच्या वृत्तावरून याचिका
पाठ्यपुस्तकांच्या किमतीत भरमसाठ वाढ होणार असल्यासंबंधीचे वृत्त दैनिक लोकमतने १३ मेच्या अंकात प्रसिद्ध केले होते. या वृत्तात वाढीव किमतीबाबत सविस्तर माहिती देण्यात आली होती. या माहितीचा आधार घेऊन अॅड. जी.एम. जाधव यांनी लोकहितास्तव ही याचिका दाखल केली आहे.
Comments