गुरुवार, २१ नोव्हेंबर २०२४
21 November 2024

राज्याचे अनेक विभाग प्रभारी

मुंबई दि. ११ – राज्यातील अनेक विभागांचे सर्वच्या सर्व वरिष्ठ अधिकारी प्रभारी झाले आहेत. एमपीएससीकडे जागा भरण्याची मागणी वारंवार करुनही त्याला गती येत नाही आणि दुसरीकडे अधिकार नसताना अनेकांना अतिरीक्त पदभाराच्या नावाखाली प्रमुखपदी बसायला मिळत असल्याने ही पदे पूर्णपणे भरली जावीत असा आग्रह अधिकारी देखील धरताना दिसत नाहीत. या सगळ्या प्रकारामुळे याच नव्हे तर शासनाच्या अनेक विभागाची ‘केडर बेस सिस्टीम’च धोक्यात आली आहे.

मुळात हा दोष जेवढा विभागांचा आहे त्याहीपेक्षा जास्त दोष एमपीएससीचा आहे. शिवाय या विभागाला सहकार्य न करणारे सामान्य प्रशासन विभाग देखील त्याला तेवढेच जबाबदार असल्याचे काहींचे मत आहे.

एमपीएससीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार झाल्याची घटना घडल्यानंतर जवळपास ४ ते ५ वर्षे हा विभाग ठप्प झाला. त्यावर शासनाने श्वेतपत्रिका देखील काढली. दरम्यानच्या काळात शासनाचे नोकरी भरतीच्या बंदीचे धोरण आले आणि आधीच उल्हास त्यात फाल्गून मास अशी या विभागाची अवस्था झाली. काही कालावधीनंतर या विभागाचे काम हळूहळू का होईना सुरु झाले पण ज्या गतीने निवृत्त होणाऱ्यांची संख्या वाढत गेली त्या गतीने भरती मात्र झालीच नाही. शासनाने लीन मंजूर करण्याचे धोरण स्विकारले त्याचाही फटका अनेक विभागांना बसला. दुसरीकडे युपीएससीच्या परीक्षांचे निकाल वर्षभरात लागत असताना एमपीएससीचे निकाल मात्र दोन दोन वर्षे न लागण्याचेही प्रकार घडले. परिक्षकांना नाममात्र मानधन देणे, संगणकांच्या वापराला विरोध असे प्रकारही घडत गेले.

आज अनेक विभागाचे सेवा नियम देखील अंतीम नाहीत याचाही फटका या सगळ्या प्रक्रियेला बसला आहे. त्या त्या विभागाने आपले सेवानियम तयार करुन ते सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवले पाहिजेत. नंतर त्याचे नोटीफिकेशन निघायला हवे. सेवा नियम तयार करुन त्याचे गॅझेट निघेपर्यंतचा प्रवास तर मंत्रालय स्तरावर जीवघेणा आहे. एकेका विभागाच्या फाईली अनेक वर्ष तशाच पडून आहेत. तर अनेकांचे सेवानियमच आजही अंतीम नाहीत.

त्यामुळे जागा असून त्या भरल्या जात नाहीत किंवा त्याला एमपीएससीने जशी गती द्यावी तशी दिली जात नाही. तत्कालिन मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या दोघांनीही एमपीएससीच्या ऑफीसला भेट देऊन याचे गांभीर्य अधोरेखीत केले पण जे अधिकारी प्रभारी आहेत त्यांच्या अधिकारात नसलेल्या पदाचे फायदे त्यांना मिळत असल्यामुळे ते देखील एमपीएससीला सहकार्य करीत नसल्याचे धक्कादायक वास्तवही काहींनी बोलून दाखवले आहे. हवालदाराला फौजदार केले की तो जसा रुबाब दाखवतो तसा प्रकार यातून घडत आहे परिणामी ज्याचे जे काम आहे ते सोडून तो दुसऱ्यांची कामे करण्यातच स्वत:ला धन्य मानत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *