राष्ट्रवादीला ५३ विधानसभा मतदारसंघांत आघाडी
मते वाढली, पण पश्चिम महाराष्ट्रातच राष्ट्रवादीचे संख्याबळ घटले !
मुंबई, दि. ३० – नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला केवळ ५७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. राष्ट्रवादीच्या विधानसभेच्या ६८ जागा आहेत. त्याचा विचार करता राष्ट्रवादीला ११ विधानसभा मतदारसंघांत कमी मताधिक्य मिळाले आहे. एकीकडे मतांच्या संख्येत जरी वाढ झाली असली तरी राष्ट्रवादीची पीछेहाट पक्षालाच चिंताजनक आहे.
राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या बंडखोरीमुळे राष्ट्रवादीला केवळ ३१ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. कोकण आणि विदर्भात केवळ ७ जागांवर तर मराठवाड्यात ६, मुंबईत ५ आणि खानदेशात एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे.
विदर्भात समाधानकारक यश नाही
विदर्भात भंडारा-गोंदिया ही जागा राष्ट्रवादीने महत्प्रयासाने जिंकली. तेथे पक्षाच्या व्यूहरचनेचा त्यांना फायदा झाला आणि बंडखोर नाना पटोले यांनी भाजपाची मते खाल्ल्याचाही त्यांना फायदा झाला. अमरावतीत मात्र गवईंसाठी मेहनत करूनही राष्ट्रवादीला ती सीट जिंकता आली नाही. नंतर या अपयशाचे खापर गवईंनी सुनील देशमुख यांच्यावर फोडून टाकले. बुलढाण्याची जागा सहज येईल, असे गृहीत धरणाऱ्या राष्ट्रवादीला शिवसेनेचे प्रताप जाधव चांगलेच भारी ठरले. त्यामुळे विदर्भात राष्ट्रवादीला म्हणावे तसे यश मिळाले नाही.
पश्चिम महाराष्ट्रात जबरदस्त फटका
पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार आणि सुप्रिया सुळे ही दोघे स्वतच्या करिश्म्यावर निवडून आले तर उदयनराजे भोसले हेदेखील व्यक्तिगत प्रतिमेमुळे विजयी झाले. कोल्हापूर, हातकणंगले, मावळ, शिरुर, अहमदनगर या जागा राष्ट्रवादीला अतिशय वाईट पद्धतीने गमवाव्या लागल्या. कोल्हापुरात सदाशिवराव मंडलिक आणि राजू शेट्टी यांची बंडखोरी राष्ट्रवादीला महागात पडली. नाशिकमध्ये मराठा आणि ओबीसी असे सरळ दोन गट पडले. त्यातही शांतिगिरी महाराजांनी अर्ज मागे घेतल्यामुळे समीर भुजबळ यांना त्याचा फायदा झाला. अन्यथा, त्यांचीही जागा धोक्यात आली होती. शिर्डीची रामदास आठवले यांची उमेदवारी दोन्ही काँग्रेसला मान्य नव्हती. त्यातही राष्ट्रवादीने आठवलेंच्या अपयशाची पावती काँग्रेसच्या नावाने फाडण्यात मुत्सद्देगिरी दाखवली. नगरमध्ये अजित पवारांनी ज्या पद्धतीने निरोप दिल्याच्या बातम्या आल्या त्यावरून ही जागा राष्ट्रवादीच्याच नेत्यांना नको होती की काय, असे चित्र समोर आले. या सगळ्यांचा परिणाम पश्चिम महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या अनेक जागांवर होण्याची शक्यता आहे. येथे ८५ पैकी केवळ ३१ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीला आघाडी मिळाली आहे.
खानदेशात दारुण स्थिती
खानदेशात जळगाव आणि रावेर या दोन जागा राष्ट्रवादीने लढल्या. मात्र, दोन्ही ठिकाणी पक्षाची अवस्था विस्कळीत होती. वसंतराव मोरे, रवींद्र पाटील यांच्यावर असणारी मदार फारशी कामी आली नाही. त्यातही सुरेशदादा जैन यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे खानदेशात राष्ट्रवादीला खिंडारच पडले. भरीस भर म्हणून की काय, काँग्रेसनेही खानदेशात फारशी साथ दिली नाही. परिणामी, खानदेशातील २० विधानसभांपैकी केवळ एका विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे. खानदेशात राष्ट्रवादीची जी अवस्था झाली, तेवढी दारुण अवस्था इतर कोणत्याही पक्षाची झालेली नाही.
कोकणात सात विधानसभांमध्ये मताधिक्य
कल्याणचे आनंद परांजपे यांची प्रतिमा राष्ट्रवादीच्या वसंत डावखरेंपेक्षा उजवी ठरली. त्यामुळे डावखरेंना पराभव पत्करावा लागला. ठाण्याची जागा मात्र राष्ट्रवादीला नव्याने मिळवता आली. त्यातही शिवसेनेच्या उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा जास्त मदतीला आली. कोकणात ३९ विधानसभेच्या जागा आहेत. त्यापैकी केवळ ७ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादीला मताधिक्य आहे.
मराठवाड्यात राष्ट्रवादीचा फडशा
मराठवाड्यात राष्ट्रवादीने सहा मंत्री दिले. १ केंद्रीय राज्यमंत्री दिला. मात्र, केवळ मंत्रिपद देऊन विभागाचा विकास मात्र झाला नाही. मंत्रिपदे मराठवाड्याला, कामे मात्र पश्चिम महाराष्ट्रात, ही राष्ट्रवादीची भूमिका त्यांच्याच अंगाशी आली. पर्यायाने परभणीत सुरेश वरपुडकरांनी केलेले प्रयत्न वाया गेले. हिंगोलीत शिवसेनेने राष्ट्रवादीला पराभवाचा जबर झटका दिला. बीडमध्ये राष्ट्रवादी संपल्यात जमा झाली. केवळ उस्मानाबादची एकमेव जागा, तीदेखील निसटत्या मतांनी राष्ट्रवादीला सांभाळता आली. पर्यायाने मराठवाड्यातील ४६ विधानसभांपैकी केवळ ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीला मताधिक्य मिळाले आहे.
मुंबईत लोकसभेची केवळ एक जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्णय घेतला होता. मनसे फॅक्टरमुळे ही जागा राष्ट्रवादीला जिंकता आली मात्र त्यातही केवळ एका विधानसभा मतदारसंघांमध्येच त्यांना आघाडी मिळवता आली. बाकी मुंबईत काँग्रेसनेच आघाडी मिळवली आहे. अनेक महत्त्वाची खाती, मोठमोठ्या नावाचे मंत्री असूनही राष्ट्रवादीला या निवडणुकीत मोठा फटका बसला आहे. विद्यमान विधानसभेत राष्ट्रवादीचे ६८ आमदार असताना राष्ट्रवादीला केवळ ५७ विधानसभा मतदारसंघांत मताधिक्य मिळाले आहे. ही राष्ट्रवादीसाठी चिंतेची बाब आहे.
विदर्भातील ११ जागी राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर आहे तर मुंबईत ४ विधानसभा मतदारसंघांत, पश्चिम महाराष्ट्रात २५ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे. मराठवाड्यातही १६ विधानसभा मतदारसंघांत, खानदेशात १० विधानसभा मतदारसंघांत आणि कोकणात ६ विधानसभा मतदारसंघांत राष्ट्रवादी दुसऱ्या क्रमांकावर गेली आहे.
Comments