रिंगरोडपासून १ कि.मी. ‘नो डेव्हलपमेंट झोन’ होणार का ?
आणखी एका लवासावर अनेक प्रश्न अनुत्तरीतच
मुंबई दि. १२ – पुण्यातील वाहतुकीची कोंडी दूर करण्याच्या नावाखाली रिंगरोड करुन त्याच्या भोवतीच सॅटेलाईट टाऊनशिप उभी करण्याच्या निर्णयावर अनेक सवाल आता उपस्थित होऊ लागले आहेत. मुळात या रस्त्याचे व गुंतवणुकीचे उद्देश सफल व्हावेत यासाठी रस्त्याच्या हद्दीपासून १ किलोमिटर ‘नो डेव्हल्पमेंट झोन’ निर्माण केला जाणार आहे का? हा खरा सवाल आहे. जर असे झाले तर दोन्ही उद्देश सफल होतील असे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
रिंगरोडच्या नावाखाली पुण्याला आणखी एका लवासाचा वेढा या विषयी दोन दिवसापासून लोकमतने प्रकाशित केलेल्या मालिकेवर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. मालिकेच्या निमित्ताने आम्ही काही प्रश्न येथे देत आहोत. याची उत्तरे मिळावी म्हणून आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळालेला नाही. या प्रश्नांची उत्तरे मिळाली तर हा प्रकल्प पारदर्शी आहे की हे देखील लोकांना स्पष्ट होईल. प्रश्न असे-
- रिंगरोडपासून १ कि.मी. हद्दीत ‘नो डेव्हल्पमेंट झोन’ होणार का?
- पुण्याच्या बाहेर हा जो रस्ता होत आहे तो रिंग रोड आहे की बाह्य वळण रस्ता आहे. कारण दोन्हीच्या व्याख्या वेगळ्या असल्याचे अधिकारी सांगतात मात्र या प्रस्तावावर दोन्हींचा उल्लेख असण्याचे कारण काय?
- अशा प्रकारच्या विशेष प्रकल्पांना केंद्र सरकार मदत देत असते. या प्रकल्पासाठी राज्याने केंद्राकडे मदत मागितली होती का? त्यांनी नकार दिला म्हणून राज्याने हा रस्ता बीओटीवर करण्याचा निर्णय घेतला का?
- मुंबई-नाशिक-औरंगाबाद-पुणे असा सूवर्ण चतु:कोन याआधीच नियोजनात असताना तो मार्ग या रिंगरोडच्या जवळून जाणार आहे का? असेल तर हा वेगळा खटाटोप कशासाठी केला जात आहे?
- २०० मिटरचा प्रस्तावित विकास करताना त्यातून पुण्याच्या वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे की पुण्याबाहेर सव्वा आठ कोटी चौ. फुटाच्या वापरातून नवीन उपनगर उभारले जाणार आहे?
- प्रस्तावित सॅटेलाईट टाऊनशिपसाठी २०० मिटरचा पट्टा ज्या भागातून जाणार आहे त्या गावांमध्ये व आजूबाजूला कोणाच्या मालकीच्या किती जमिनी आहेत याची आकडेवारी व तपशिल पारदर्शकता व जनहितासाठी उपलब्ध होणार आहे का?
- कारण नसताना अनेक वाहने पुण्यातून बाहेर जातात, पर्यायाने पुण्यात वाहतुकीची कोंडी होते म्हणून हा रस्ता तयार केला जात असेल तर अशा किती गाड्या रोज पुण्यात येतात याचा सर्व्हे कोणी केला आहे का? असेल तर त्याची आकडेवारी कोठे उपलब्ध आहे का?
- पुण्याची कोंडी दूर करण्यासाठी रिंगरोड (की बाह्यवळण रस्ता) एवढा एकच पर्याय अंतीम आहे का? हा रिंगरोड झाल्यास पुण्यातील वाहतुकीची कोंडी दूर होणार आहे का? तसे कोणते सर्व्हे सांगतात?
- टाऊनशिप उभी करण्याने रिंगरोडच्या मुळ संकल्पनेलाच छेद जातो का?
- पाणी, वीज, अंतर्गत रस्ते, मल:निस्सारण यंत्रणा या गोष्टी सॅटेलाईट टाऊनशिप उभी करणाऱ्या यंत्रणेनेचे करायच्या असे याच्या संकल्पनेतच अपेक्षीत आहे. त्याची पूर्तता यात कशा पध्दतीने होणार आहे? रिंगरोडच्या भोवती जी सॅटेलाईट टाऊनशिप प्रस्तावित दाखवली आहे त्याच ताण पुण्याच्या व्यवस्थेवर होणार आहे का?
या दहा प्रश्नांची उत्तरे मिळाली तर हा प्रकल्प कशापध्दतीने व कोणत्या हेतूने राबवला जात आहे हे स्पष्ट होऊ शकेल. यावर आजही काही प्रतिक्रीया उमटल्या आहेत. पुण्याचा विकास आराखडा व नव्याने विकसीत झालेला प्लॅन यांची पूर्तता करण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करुन योजनाबध्द भ्रष्टाचाराची प्रक्रिया राबविणारे समोर यायला हवेत. अन्यथा पुणेकरांना मोठे आंदोलन उभे करावे लागेल असे मत सिटूचे सचिव अजित अभ्यंकर यांनी नोंदवले आहे.
Comments